अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेलं राजेश पाटील लिखित ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे ओडिशारख्या पूर्ण अनोळखी, मागास भागांत मानल्या जाणाऱ्या राज्यात एक आयएएस अधिकारी कसं काम करतो. तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागांत काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट. याच पुस्तकातील काही मजकूर वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
आदिवासींना समजून घेताना
___________
नारायणपाटनाच्या घटनेमुळे अचानक माझी कोरापुतला बदली झाली होती. कोरापुतमधले पहिले काही महिने त्या समस्येवर उपाय योजण्यातच गेले. त्यानंतरच कोरापुतच्या आदिवासींशी, त्यांच्या संस्कृतीशी जवळून ओळख करून घेण्याची संधी मला मिळाली.
आदिवासी भागात काम करण्याची माझी सुरुवातीपासून इच्छा होती, ती कोरापुतमध्ये पूर्ण झाली असं म्हणायला हवं. कोरापुतचं निसर्गसौंदर्य सुपरिचित आहे, तसंच इथलं अद्भुत आदिवासी जीवनही प्रसिद्ध आहे. इथे आदिवासींच्या बऱ्याच जमाती आहेत. प्रत्येक जमात काही विशिष्ट भागात वस्ती करून राहताना दिसते. प्रत्येक जमातीच्या चालीरीती, परंपरा, वेशभूषा, नृत्य आणि भाषा इतरांपासून पूर्णपणे वेगळ्या असतात. इतकंच नव्हे, तर त्यांच्यातले सामाजिक बंध, अनुशासनाच्या पद्धती, न्यायव्यवस्था यांतही बराच फरक दिसतो. काही बाबतींमध्ये मात्र सर्व जमातींत साधर्म्य आढळतं; विशेषत: सामाजिक आणि धार्मिक चालीरीती, उदरनिर्वाहाची साधनं, शिकार करण्याच्या पद्धती, स्थलांतरित शेती, इत्यादी. शिक्षणाचा पूर्ण अभाव आणि दारिद्य्र मात्र यांच्या पाचवीला पुजलेलं आहे.
मी प्रांताधिकारी म्हणून काम करत असताना जिल्ह्यातल्या आदिवासी गावांना भेट देण्याची एकही संधी दवडायचो नाही. माझा तेव्हाचा ड्रायव्हर अभी म्हणजे एक चालताबोलता माहितीकोश होता. गाडी चालवत असताना वाटेत लागणारी गावं, बाजार, वेगवेगळ्या पोशाखांतले आदिवासी यांच्याबद्दल तो बरीच माहिती सांगायचा. माझ्याकडे कामानिमित्त आलेल्या आदिवासी लोकांशी मी कामाव्यतिरिक्त इतरही बऱ्याच गप्पा मारायचो. कधी त्यांच्या भाषेतले मला माहिती असलेले शब्द गप्पांमध्ये वापरायचो. ते ऐकल्यावर त्यांचा चेहरा खुलून जायचा.
कोरापुतमधल्या कोणत्याही महत्त्वाच्या आठवडी बाजारात (हाट) फेरफटका मारला तर रंगीबेरंगी पोशाखातले वेगवेगळ्या जमातींचे आदिवासी स्त्री-पुरुष दिसतात. जिल्ह्यात कंध, परजा, गदबा, भातुडी, दुरुवा इत्यादी जमातींचे आदिवासी राहतात. त्यांच्या भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळ्या. त्यामुळे त्यांच्या समस्या एकसारख्या असूनही त्याविरोधात ते कधी एकत्र येऊ शकले नाहीत.
आदिवासींच्या जीवनात नृत्याला वेगळंच स्थान असतं. कोरापुतला पारंपरिक आदिवासी नृत्याचं माहेरघर म्हणायला हवं. ढेमसा, रिन्झोडी आणि दुरुआ ही इथली प्रमुख नृत्यं. त्यातही ढेमसा हे सर्वांत लोकप्रिय नृत्य आहे. ते प्रत्येक गावात बघायला मिळतं. कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषाला सामील होता येईल असा हा नृत्यप्रकार आहे. यात नर्तक एकमेकांच्या कमरेभोवती हात घालून एक साखळी करतात आणि विशिष्ट चालीवर, विशिष्ट लयीत नृत्य करतात. सुरेल गाणी, रंगीबेरंगी पारंपरिक पोषाख, दागिने यांच्यासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर होणारं ढेमसा नृत्य बघणं म्हणजे एक पर्वणीच असते.
माझ्या प्रशासकीय दौऱ्यादरम्यान मी एखाद्या गावात शिरलो की आदिवासी गावकरी डफ आणि ढेमसा नृत्यानेच माझं स्वागत करायचे. कधी मी एखाद्या छोट्या कामाच्या पाहणीसाठी जायचो, किंवा कधी जनसंपर्क शिबिरासारखा मोठा कार्यक्रम असायचा. रानफुलांचा गुच्छ देऊन स्वागत करणारे, हसऱ्या चेहऱ्यांनी ढेमसाच्या तालावर नाचणारे गावातले आबालवृद्ध बघितले की त्यांच्याबद्दल अधिकच आपुलकी वाटायची. बऱ्याचदा ते मलाही डफाच्या तालावर थिरकायला भाग पाडायचे.
हे आदिवासी साधी-निष्पाप राहणी, सचोटीची सामाजिक व्यवस्था, न्यायपद्धती, सामाजिक आणि लैंगिक समानता या बाबतीत इतरांपेक्षा खूप उजवे आहेत. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे असलेलं कलाकुसरीचं कसब. आदिवासींची वेशभूषा, अलंकार, चित्रांकन, लाकडाची कलाकुसर, ते तयार करत असलेली वेगवेगळ्या प्रकारची खेळणी यातून त्यांची कल्पकता, कलानिपुणता आणि संवेदनशीलता दिसते. सौरा, कोया आणि कंध जमातीतले लोक वेगवेगळी फुलं, पक्षी आणि भौमितिक आकारांचा वापर करून आपली घरं रंगवतात. सौरा आदिवासींची चित्रं त्यांचे धार्मिक विचार सुचवणारी असतात. कंध आदिवासींचं लाकडी कोरीवकाम आणि भातुडी जमातीचं धातुकाम अतिशय आकर्षक असतं. नैसर्गिक डाय वापरून विणलेल्या साड्या आणि कपडे म्हणजे त्यांच्या समृद्ध परंपरेचे जिवंत नमुने म्हणता येतील. बोंडा स्त्रियांचे दागिने त्यांच्या कलात्मक, सौंदर्यात्मक दृष्टीचं दर्शन घडवतात.
या आदिवासींची शेती परंपराही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पारंपरिक सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली हळद, आलं आणि इतर भाजीपाला, तसंच इतर ठिकाणी मागे पडत चाललेली विविध प्रकारची कडधान्यं, डाळी म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. अलीकडे उद्यानशेतीत त्यांनी केलेली प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे.
प्रत्येक आदिवासी गावात एक पारंपरिक गावकमिटी असते. गावकमिटीचा मुख्य हाच गावाचा मुख्य म्हणून काम करत असतो. हा मुखिया बहुधा सर्वांत वयस्कर, अनुभवी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा असतो. बहुतेक सर्वच जमातींमध्ये त्याला ‘नायक’ म्हटलं जातं. त्याचा एक मदतनीस असतो, त्याला ‘चलान’ म्हणतात. गावकमिटीची सभा बोलावण्याचं काम ‘बारीक’ करतो. गावात पूजेचं काम करणाऱ्याला ‘देहुरी’ म्हणतात. गावच्या मुखियाला मात्र वेगवेगळ्या जमातींमध्ये वेगवेगळं नाव आहे. उदा. ‘कोया’ जमातीच्या मुखियाला ‘वर्दे’ म्हणतात, ‘परजा’ मुखियाला ‘मुदुली’ आणि ‘सौरा’ मुखियाला ‘गमंगो’ म्हटलं जातं.
आदिवासी समाज आजही त्यांच्या पुरातन सामाजिक व्यवस्थेत बांधलेला दिसतो. या भागात काम करायचं म्हणजे आदिवासींची मानसिकता जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना आपल्या समस्यांचा बाऊ करणं, समस्यांच्या पाठपुराव्यासाठी रस्त्यावर उतरणं वा काय वाट्टेल ते करून आपलं काम साधणं जमत नाही. ते साधेपणाने विचार करतात. प्रशासनाबद्दलही त्यांच्या माफक अपेक्षा असतात. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा का केला नाही म्हणून त्यांना विचारलं तर ‘साहेब, दहा वर्षांपूर्वी याविषयी आम्ही निवेदन दिलं होतं’ असं म्हणत ते जुना कुठलातरी संदर्भ देतात. म्हणजे त्या निवेदनानुसार काम व्हावं अशी अपेक्षा बाळगून दहा वर्षांत त्यांनी परत कुणाकडे दाद मागितलेली नसते. यामुळे त्यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम आखताना ते त्याबद्दलच्या तक्रारी घेऊन आपल्यापर्यंत येणार नाहीत, हे कायम लक्षात ठेवावं लागतं.
कोरापुतमधले आदिवासी निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या समजुतीनुसार निसर्गात सर्वशक्तिमान परमात्म्याचा अंश असतो. ते निसर्गाच्या तीन रूपांना विशेष महत्त्व देऊन पुजतात- जमीन म्हणजे माता, सूर्य सर्वशक्तिमान, तर पाणी जीवन देणारं. देवांची पूजा मुख्यत: त्यांची कृपा मिळण्यासाठी, पूर्वजांना खूष करण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी केली जाते. कोणतंही कार्य सुरू करण्याआधी देवाची आराधना करण्यात येते- मग ते घराचं बांधकाम असो किंवा शिकार.
या भागात आदिवासी अनेक पर्वं पाळतात. चैत्र पर्व, पौष पर्व, सिम पर्व, आम पर्व आणि लग्न ही त्यांपैकी महत्त्वाची पर्वं आहेत. चैत्र पर्व आणि पौष पर्व हे सर्वच आदिवासींचे मोठे उत्सव असतात. कोरापुतच्या आदिवासींच्या ‘चैत परब’दरम्यान जवळजवळ एक महिना सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. संपूर्ण महिना नातेवाइकांच्या भेटीगाठी, पाहुणचार, दिवसा सामूहिक शिकार तर रात्री मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचगाणं यांत जातो. या दरम्यान होणारी सामूहिक शिकार किंवा ‘अखंड शिकार’ म्हणजे जंगल विभागासाठी मोठी डोकेदुखी असते. ‘पौष परब’ही खूप उत्साहाने साजरा होतो. गेल्या काही दशकांपासून आदिवासींवर हिंदू धर्माचे संस्कार झाल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यामुळे ते आता काही हिंदू सणही साजरे करताना दिसतात. काहीही असलं, तरी त्यांच्या या उत्सवांमध्ये साधेपणा असतो. सर्वांना सामील करून घेण्याची भावना असते. चैत्र महिन्यात महिलांचे गट मुख्य रस्त्यांवर येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवतात आणि त्यांच्याकडून पर्व पाळण्यासाठी देणगी मागतात. प्रथमदर्शनी हा प्रकार विचित्र वाटतो; मात्र त्यांना खूप काही देणगीची अपेक्षा नसते. माझी लाल दिव्याची गाडीही त्या नि:संकोचपणे अडवायच्या. पण त्यांच्या झोळीत एक रुपयाचं नाणं टाकलं तरी त्या खूष व्हायच्या.
एकूणच, या आदिवासींशी दोन शब्द बोलल्यावर त्यांच्या साधेपणाची जाणीव होते. बऱ्याचदा त्यांना बोलतं करण्यासाठी सुरुवातीला खूप प्रयत्न करावा लागतो. त्यांना जाणून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्यासारखा आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. त्यांच्याशी बोलताना मला बऱ्याचदा आपलं ज्ञान आणि शिक्षण तोकडं असल्याची जाणीव व्हायची.
एकीकडे त्यांचं असं साधेपण, कलापरंपरेची समृद्धी; तर दुसरीकडे त्यांचं मागासलेपण. आधी म्हटलं तसं, कोरापुत हा के-बी-के विभागातला (कोरापुत-बोलांगिर-कळाहंडी) एक महत्त्वाचा आणि सर्वांत मोठा जिल्हा आहे. हा भाग दारिद्य्र, उपासमारी यासाठी पूर्वीपासून कुख्यात आहे. नीती आयोगाने तयार केलेल्या 115 सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये या तीनही जिल्ह्यांचा समावेश होतो. केरळच्या आकाराचा हा जिल्हा 1993 साली कोरापुत, नवरंगपूर, मलकानगिरी आणि रायगडा या चार जिल्ह्यांमध्ये विभागला गेला. विभाजनानंतरही उर्वरित कोरापुतजिल्हा बराच मोठा आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भाग, दळणवळणाची अविकसित साधनं, निरक्षरता, आदिम पद्धतीने केली जाणारी शेती, उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव आणि प्रशासकीयदृष्ट्या असलेला अवाढव्य आकार, यांमुळे या भागाचा फारसा विकास होऊ शकला नव्हता. ब्रिटिश काळात आर्थिकदृष्ट्या तितकंसं महत्त्व नसल्यामुळे हा भाग मागास राहिला. स्वातंत्र्यानंतरच्या पंचवार्षिक योजनाही इथल्या मौलिक, पायाभूत समस्यांना हात घालू शकल्या नाहीत.
एका अर्थाने या परिस्थितीमुळेच नारायणपाटनामध्ये अर्जुन लिंगाचं आंदोलन आणि इतर घडामोडी आकाराला आल्या होत्या. मी कोरापुतचा प्रांताधिकारी म्हणून सहा महिने काम केलं. त्या दरम्यान नारायणपाटना म्हणजे देशभर चर्चेचा विषय झाला होता. त्यापूर्वी पश्चिम बंगालच्या जंगलमहाल या भागात लालगड इथे माओवाद्यांनी काही स्थानिक लोकांना हाताशी धरून सरकारला आव्हान दिलं होतं. नारायणपाटना म्हणजे दुसरं लालगड होतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे कोरापुतमधली कायदा-सुव्यवस्था आणि माओवाद्यांविरुद्धची मोहीम हे मुख्य चर्चेचे विषय बनले होते. नारायणपाटना आणि त्या लगतच्या काही तालुक्यांमधून अनेक लोक विस्थापित झाले होते. जीवाच्या भीतीने कुणी कुटुंबकबिल्यासहित लक्ष्मीपूरला, तर कुणी थेट कोरापुतला येऊन पोहोचले होते. साहजिकच जिल्हाप्रशासनावर त्याचा ताण पडत होता. लोकांना विश्वासात घेऊन दैनंदिन समस्यांचं निराकारण करू शकेल अशी संवेदनशील प्रशासन यंत्रणा गरजेची होती. पण जिल्ह्यात अनेक महत्वाची प्रशासकीय पदं रिक्त होती. दुर्गम, नक्षलप्रभावित तालुक्यांमध्ये कुठे बीडीओ नव्हता, तर कुठे तहसीलदार नव्हता. बऱ्याच ठिकाणचे अधिकारी असून नसल्यासारखे होते.
अशी एकंदर परिस्थिती असताना माझ्यावर कोरापुतचा जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. जिल्हा मुख्यालयातच एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये माझी बढती झाली. एका बाजूला विस्थापितांचे प्रश्न, दुसऱ्या बाजूला धगधगतं नारायणपाटना आणि लोकांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास, अशा नाजूक परिस्थितीत मी जिल्ह्याची सूत्रं हातात घेत होतो. जमेची बाजू म्हणजे मी सहा महिन्यांपासून तिथेच काम करत असल्यामुळे जिल्ह्याविषयीचं माझं आकलन चांगलं होतं. आदिवासी लोक मला ओळखू लागले होते आणि कार्यालयातही जम बसलेला होता.
किंमत – २५० रु टपाल ३५₹ एकूण २८५₹