उगवतीचे रंग

‘ तेच ते…’

बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘ तेच ते…’ ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीवरून कदाचित त्यांना असे वाटले असते –

तेच लोक, तीच निवड, तीच आवड तीच नावड

तेच विषय तेच वाद, वक्तव्याचे गंभीर पडसाद

तीच भाषणे, तेच हारतुरे

तेच सत्कार त्याच शाली, तेच हॉल

तीच पुस्तके, तेच स्टॉल

कोरोनाच्या बाबतीत त्यांना वाटले असते –

तोच व्हायरस तेच हाल, तीच लोकांच्या जगण्याची कमाल

तोच मास्क तेच टास्क, सॅनिटायझर आणि रुमाल

तेच लॉकडाऊन तेच क्वारंटाईन

तीच नर्स तीच व्हॅक्सिन

त्याच परीक्षा त्याच शाळा

जगण्याचाच मोठा घोटाळा.

असे अनेक विषय विंदांनी हाताळले असते.

विंदांची कविता मानवी जीवनातील असहायतेवर कोरडे ओढते. वास्तव समोर आणते. ( म्हणूनच आपल्याला नाविन्याची ओढही असते. ) पण जाऊ द्या. तो आपला विषय नाही. आपण उगीचच गंभीरतेकडे चाललोय.

आज मलाही थोडंसं विनोदी अंगानं तुम्हाला वास्तवतेकडे घेऊन जायचंय. थोडा वेळ आपली करमणूक व्हावी आणि ती होता होता थोडंसं भाषेच्या वापरातील आणि मानवी जीवनातील विसंगतीकडेही आपलं लक्ष वेधावं एवढाच माफक हेतू.

जीवनात जशा त्याच त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यांचा आपल्याला कंटाळाही येतो, तसाच आपण न कंटाळता त्याच त्या शब्दांचा वापर करत असतो. एखादं नाणं जसं वापरून वापरून गुळगुळीत व्हावं ( आता आपण नाणी फार कमी वापरतो तो भाग वेगळा ! ), वापरून वापरून नोटाही हुळहुळीत व्हाव्या तसे शब्द देखील वापरून वापरून गुळगुळीत ( पुन्हा तोच शब्द ! क्षमस्व ! ) होतात. म्हणजे नेमकं काय होतं ? आपला मूळ अर्थ गमावून बसतात. आपल्या बऱ्याचशा प्रथा, परंपरांचं असंच होतं नाही का ? एक किस्सा आठवला. एक गुरु होते. आपल्या शिष्याना ते शिकवत ( अर्थात शिकवणं हेच त्यांचं काम ! दुसरे लोक दुसरं काही करत असतील तर माहिती नाही ) असत. तर शिकवताना व्हायचं काय की एक मांजर त्यावेळी तेथे येऊन त्यांना त्रास द्यायचं. मग ते गुरु आपल्या शिष्यांना त्या मांजराला बांधून ठेवायला सांगत आणि आपले शिकवणे सुरु करीत. पुढे काही काळानंतर ते गुरु निवर्तले. त्यांची जागा त्यांच्या एका शिष्याने घेतली. तो गुरुपदी जाऊन बसला. पण नियमानुसार तो आपले प्रवचन सुरु करण्याआधी त्या मांजराला त्याच्या शिष्यांना बांधून ठेवायला सांगत असे. पुढे ते मांजरही मेले. शिष्यांनी दुसरे एक खास मांजर धरून आणले. ते बांधले आणि मग प्रवचन सुरु झाले. अशा या काही काही गमतीदार (आणि निरर्थकही )परंपरा !

आपण कोणत्याही सरकारी कचेरीत ( शुद्ध मराठीत ऑफिसात ! ) गेलो की तेथील अधिकारी, कर्मचारी आपल्याला कोणत्याही कामासाठी ‘ विहित नमुन्यात ‘ अर्ज करायला सांगतात. अर्थात ‘ विहित नमुन्यात ‘ अर्ज केल्यानंतर तुमचे काम ‘ विहित नमुन्यातच ‘होईल असे काही सांगता येत नाही. ( काही वेगळे मार्ग तुम्हाला अवलंबावे लागू शकतात ! ) अगदी तलाठी कार्यालयात गेले तरी तो आपल्याला विहित नमुन्यात अर्ज करायला सांगतो. मग माझ्यासारखा थोडंफार चार बुकं शिकलेला पण सरकारी कामांशी फारसा परिचित नसलेला माणूस विचारतो, ‘ भाऊसाहेब, विहित नमुन्यात म्हणजे कसा हो ? ‘ यावर भाऊसाहेब अत्यंत दयाळू, कृपाळू वगैरे होऊन माझ्यासारख्या माणसाच्या अज्ञानाची कीव करत मला तो विहित नमुना दाखवतात. ( का कुणास ठाऊक, पण मला दोन विहित नमुने दिसत असतात ! ) मग माझ्या डोक्यात प्रकाश पडतो.

‘ अच्छा ! असं आहे का ? द्या बरं मला तो विहित नमुना. मी आपल्याला भरून देतो. ‘ पुन्हा माझं अज्ञान प्रकट होतं. भाऊसाहेब पुन्हा कृपाळू वगैरे होऊन आणि प्रयत्नपूर्वक तोंडातील बार सांभाळून ( आता मी अज्ञानी आहे हे त्यांना माहित झालेलं असल्याने ) मला समोरच्या झेरॉक्सच्या दुकानाकडे बोट दाखवून सांगतात, ‘ तिथे मिळेल तुम्हाला तो अर्ज. ‘ मी आपला जातो तिथे. तो विहित नमुन्यातील अर्ज चतकोर कागदावर झेरॉक्स केलेला असतो. झेरॉक्सवाला माझ्याकडून तेवढ्याचे केवळ नाममात्र पाच रुपये शुल्क घेऊन तो अर्ज मला देतो. मला तो अर्ज पाहिल्यावर वाटते, ‘ अरेच्या ! हे इतकं सोपं आहे होय ! हे तर मी पण एखाद्या कागदावर लिहून देऊ शकतो. कशाला त्या चतकोर कागदाच्या तुकड्यासाठी पाच रुपये घालवायचे ? ‘ पण हे पुन्हा म्यां पामराचे केवढे अज्ञान ! ‘ अहो, असा हाताने लिहिलेला अर्ज चालत नाही. तो विहित नमुन्यातच हवा. ‘ असे उद्गार ( चेहेऱ्यावर मूर्ख कुठला ! असे भाव आणून ) मला ऐकावे लागले असते म्हणून मी तसं विचारण्याची हिंमत करत नाही.

खरोखरच असे किती ‘ विहित नमुने ‘ आपल्याला असे जागोजागी दिसतात ! आपल्या विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी जीव तोडून, आपली शक्ती, बुद्धी पणाला लावून काम करणाऱ्या डिसले गुरुजी, वारे गुरुजी यांच्यासारख्या ध्येयनिष्ठांना अशाच ‘ विहित नमुन्यात ‘ काम केले नाही म्हणून केवढा त्रास भोगावा लागतो. झाडे लावणाऱ्या एखाद्या सयाजी शिंदे सारख्या व्यक्तीला ‘ विहित नमुन्यात ‘ अर्ज करून परवानगी घेतली होती का असे विचारले जाते ! खरे तर अशा चाकोरीबाहेर जाऊन काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रशासनाने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला पाहिजे. पण लाल फितीचा कारभार आणि त्याच्याकडून असली अपेक्षा ! अर्थात अशा चाकोरीबाहेर जाऊन काम करणाऱ्या व्यक्तींना मदत करणारे अधिकारी सुद्धा असतात. तेही त्यांना चाकोरीबाहेर जाऊन मदत करतात. पण अशा अधिकाऱ्यांची संख्या नगण्य. अडवणारेच जास्त. कारण ‘ विहित नमुना ! ‘

निवृत्त झालेल्या लोकांना ज्या बँकेत त्यांचं पेन्शन असेल त्या बँकेत नोव्हेंबर महिन्यात जाऊन हयातीचा दाखला द्यावा लागतो. पण एखादी व्यक्ती जर काही कारणाने नोव्हेंबर महिन्यात जाऊ शकली नाही आणि फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये बँकेत गेली, तर त्या व्यक्तीला नोव्हेंबर महिन्यात तुम्ही हयात होता, तो दाखला हवा असतो. आता जी व्यक्ती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हयात असते ती नोव्हेंबर मध्ये असणारच. पण नियम तो नियम. बँकेचा विषय निघाला म्हणून सांगतो. आमच्या चाळीसगाव मधील काही बँका सेवानिवृत्तांना एटीएम कार्ड सुविधा देत नाहीत. कोणीतरी एखाद्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचा गैरवापर केला असेल, म्हणून सर्वानांच त्या सुविधेपासून वंचित ठेवले जाते. कारण विचारले तर वरून ट्रेझरीकडूनच आदेश आहेत की एटीएम कार्ड देऊ नका असे सांगितले जाते. बिचाऱ्या पेन्शनरांना रांगेत पैसे काढण्यासाठी उभे राहावे लागते. त्यातही गंमत अशी की पैसे काढण्याची स्लीप चालत नाही, त्यासाठी चेक द्यावा लागतो. दोष कदाचित त्या कर्मचाऱ्यांचा नसेलही. वरून आलेल्या आदेशाचे ते पालन करतात पण त्रास होतो तो मात्र ज्येष्ठ नागरिकांना. एखादी सेवानिवृत्त व्यक्ती जर निवृत्तीनंतर आपल्या मुलामुलीकडे इतर जिल्ह्यात राहायला गेली तर तिकडे पेन्शन लवकर ट्रान्स्फर होत नाही. आजच्या या सगळ्या ऑनलाईनच्या जमान्यात हा सगळा केवढा अन्याय !

आता भाषेच्या वापरातील काही गमतीजमती पाहू. आमचे एक सहकारी बोलताना नेहमी ‘ मला काय म्हणायचं आहे ‘ असं म्हणत. मी मनातल्या मनात म्हणायचो, ‘ आता तुम्हीच बोलताय आणि पुन्हा मला काय म्हणायचं कशाला ! ‘ तर काही मंडळी बोलत असताना ‘ खरं सांगू का ? ‘ असं विचारतात. आता समोरची व्यक्ती तुमच्याकडून ‘ खरे बोलण्याचीच ‘ अपेक्षा करत असते हे यांना कोण सांगणार ! आणखी काही व्यक्तींना ते बोलत असताना समोरच्यालाच ‘ काय झालं माहिती आहे का ‘ असं विचारण्याची सवय असते. आता त्या समोरच्या व्यक्तीला कसं काय माहिती असेल की तुमच्याकडे काय झालं असेल ते !

इंग्रजी आणि मराठी भाषेच्या गमतीदार मिश्रणातून तयार होणारे विनोद तर मजेदार असतात. आमचे एक सहकारी त्यांना काही त्रास झाला की ‘ डोक्याला नसता हेडेक ( ? ) म्हणायचे. आता हेडेक डोक्यालाच होणार ना ! डोक्याला हेडेक म्हणणे म्हणजे पोटाला स्टमकेक, पाठीला बॅकेक असे म्हणण्यासारखे आहे. असे ‘ एकेक ‘ काय सांगावे !

सकाळचे ‘ मॉर्निंग वॉक ‘ हा ही असाच एक प्रकार. एकदा तर एक गंमत घडली. माझा एक थोडा कमी शिकलेला मित्र आपले वजन वाढल्यामुळे डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विचारले, ‘ तुम्ही मॉर्निंग वॉक ‘ घेता का ? तेव्हा तो म्हणाला, ‘ सकाळी मला जमत नाही पण मी संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जातो. आता बोला ! ‘ फॅक्ट ‘ हा शब्द मुळातच एखादी गोष्ट सत्य आहे म्हणून वापरला जातो. पण तेवढं कमी की काय म्हणून बरीचशी मंडळी ‘ ट्रू फॅक्ट ‘ असं म्हणतात. म्हणजे सत्याबद्दल मुळीच शंका नको ( ? ) येताना पाण्याची ‘ वॉटरबॅग ‘ सोबत असू द्या हे ही असंच मजेशीर.

एखादी व्यक्ती आपल्या व्यवसायात किंवा कामात यशस्वी झाली किंवा एखाद्या विशिष्ट वेळेपासून त्यांच्या चांगल्या कारकिर्दीला सुरुवात झाली तर ‘ नंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही,’ हे शब्द हमखास वापरले जातात. ‘ ज्यांना पुढे जायचं आहे तो कशाला मागे वळून पाहील ? ‘ एखादी व्यक्ती निवृत्त झाली किंवा निधन पावली तर ‘ त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे अशक्य आहे ‘ असे उद्गार काढले जातात. अशा सगळ्या पोकळ्या कायम राहिल्या असत्या तर केवढे निर्वात वातावरण निर्माण झाले असते याची कल्पना करवत नाही ! एखाद्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना ‘ त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे ‘ असे शब्द हमखास असतात. बोलणाऱ्याच्या भावना प्रामाणिक असतात. पण त्याच त्या शब्दांची पुनरावृत्ती न करता ‘ त्यांच्यावर आलेली ही मोठी आपत्ती, आलेले संकट ‘ असेही म्हणता येऊ शकते.

असे शब्द काय किंवा जीवनात आलेला ‘ तोच तो ‘ पणा काय ! सारखेच आहे. हा ‘ तोच तो ‘ पणा जर घालवायचा असेल तर नव्याचा शोध घेतलाच पाहिजे. त्यासाठी थोडी बुद्धीला चालना द्यायला हवी. काम करण्याचे, व्यक्त होण्याचे नवनवीन पण अर्थपूर्ण मार्ग शोधून काढता यायला हवेत. नाहीतर मग विंदांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे ‘ तेच ते अन तेच ते…’ असं म्हणत बसण्याची पाळी येईल.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव