नील्स बोर

भौतिकशास्त्रज्ञ

जन्म – ऑक्टोबर ७, १८८५

संशोधन
नील हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ – १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.

बोरने कोपनहेगन विद्यापीठात इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सची (आता तिला नील्स बोर इंस्टिट्यूट म्हटले जाते) स्थापना केली. तिथे हान्स क्रेमर्स, ऑस्कर क्लाइन, जॉर्ज द हेवेसी , वर्नर हायझेनबर्ग असे विद्यार्थी घडवले, आणि त्यांच्याबरोबर काम केले. झिर्कोनियम सारखे गुणधर्म असलेल्या नव्या मूलद्रव्याचे त्यांनी भाकीत केले. ते सिद्ध झाल्यावर त्याचे नाव कोपेनहेगनच्या लॅटिन नावावर आधारले असे हाफ्मियम ठेवले गेले. या मूलद्रव्याचा शोध कोपनहेगन येथे झाला म्हणून हे नाव. खुद्द बोरच्या नावावर बोरियम या मूलद्रव्याची नोंद आहे.

१९३० च्या दशकात बोर नाझीवादाने पिडलेल्या शरणार्थींना मदत करत असत. नाझींनी डेन्मार्क व्यापल्यानंतर बोरची जर्मन अणुबाँब प्रकल्पाच्या प्रमुखपदी असलेल्या वर्नर हायझेनबर्गबरोबर भेट झाली होती. सप्टेंबर १९४३ मधे त्यांच्या कानी आले की जर्मन्स त्यांना अटक करण्याच्या विचारात आहेत, तेव्हा ते स्वीडनला पळून गेले. तेथून त्यांची रवानगी ब्रिटनला करण्यात आली. त्यांनी ब्रिटिश ट्यूब अँलॉइज न्युक्लिअर प्रोजेक्टमधे भाग घेतला, आणि पुढे त्यांचा समावेश मॅनहटन प्रोजेक्टला जाणार्‍या ब्रिटिश चमूत झाला.

युद्ध संपल्यावर बोरने आण्विक ऊर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोग व्हावा म्हणून प्रयत्‍न केले. CERN च्या आणि RisՓ डॅनिश अटॉमिक एनर्जी कमिशनच्या संशोधन संस्थेच्या स्थापनेमधे त्यांचा सहभाग होता. ‘नॉर्डिक इंस्टिट्यूट ऑफ थिअरिटिकल फिजिक्स’ या संस्थेचे ते १९५७ साली पहिले चेअरमन बनले.

नील बोरनी अणूच्या रचनेवर सिद्धान्त मांडला. त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतीमध्ये अामूलाग्र सुधारणा सुचवल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली. पुंजयामिकीमधील कोपेनहेगन विवेचनची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

अणुभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जित न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसर्‍या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धांताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धांताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले. हे शोधून काढण्यासाठी बोरने ‘बोर्स क्लाऊड चेंबर’ नावाचे उपकरण वापरले.

बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणार्‍या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकावते.