मुलांशी काय बोलायचं? भाग २
मागच्या भागात आपण मुलांशी संवाद सुरु करायला मदत करतील अशा पाच गोष्टींची माहिती करून घेतली होती.
आज या दुसऱ्या व शेवटच्या भागात आपण पुढच्या पाच गोष्टींची माहिती करून घेऊ.
६. असे कोणते प्रसंग आहेत, ज्यामध्ये तू “आऊट ऑफ कंट्रोल” होतोस असं तुला वाटतं?
हे असं आऊट ऑफ कंट्रोल होणं हे अनेकदा मुलांनाही आवडत नाही. पण असे जर प्रसंग जर आपल्याला कळाले तर आपण अशा वेळी भावना नियंत्रित कशा कराव्यात, यासाठी त्यांची मदत करू शकू.
७. तुझ्यामध्ये कोणती “बेस्ट क्वालिटी” आहे असं तूला वाटतं?
आपण असं मानतो की प्रत्येक मूल हे “युनिक” आहे. हा युनिकनेस शारीरिक ठेवणीमुळे जसा येतो तसा व्यक्तिमत्वातल्या पैलूंनी सुद्धा येतो! मुलांशी संवाद करता करता मुलांना स्वतःच्या अंगभूत क्षमतांविषयी आणि कौशल्यांविषयी काय वाटते हे समजून घेऊन, ती कौशल्ये व क्षमता स्वतःच्या आणि जगाच्या चांगल्यासाठी कशा वापरता येतील, याविषयी आपण त्यांना मदत करू शकतो.
८ एखादी गोष्ट तुला सोडून द्यावीशी वाटते, तेव्हा तू तुझ्या मनाला काय सांगतोस?
मुलांची धरसोड वृत्ती हा अनेक पालकांच्या चिंतेचा विषय असतो. अशा वेळी ही धरसोड का होते? त्यावेळी मुलांच्या मनात काय चालू असते? हे आपल्याला समजले तर एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी लागणारे सातत्य आणि एखादी न आवडणारी गोष्ट न करण्याचे स्वातंत्र्य या दोन्हीचा “मिलाफ” करण्यासाठी मुलांना मदत करणे आपल्याला जमू शकेल!
९. एखादी मोठी गोष्ट जसं की वार्षिक परीक्षेची तयारी किंवा स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवणे, किल्ला बनवणे या गोष्टी करायच्या आधी तू काय तयारी करतोस?
या मोठ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या पायऱ्यांचा तू कसा विचार करतोस? नियोजन ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. या संवादातून मुलांना नियोजनाची सवय लावण्यासाठी आपल्यला मदत करता आली तर त्याच्या आयुष्यभर मुलांना कसा उपयोग होऊ शकेल? हे वेगळे सांगायला नको!!
१०. शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला माझ्याकडून काय हवंय?
हा प्रश्न खूप काळजीपूर्वक विचारला पाहिजे कारण तू माझी आई असून किंवा बाबा असून सुद्धा तुला मला काय हवंय, हे कळत नाही का? असा बिनतोड प्रश्न मुलं विचारू शकतात! त्यामुळे मुलाला अत्यंत विश्वासात घेऊन हा प्रश्न विचारणे आणि या संवादाच्या मदतीने मुलांना मी कोणत्याही प्रसंगात तुझ्या सोबत आहे, हा विश्वास देणे महत्वाचे आहे.
या दहा प्रश्नांचा पालक म्हणून आपल्याला कायमस्वरूपी मदत होईल, असे मला वाटते.
चेतन एरंडे.