बाळाला औषध देताना ,0.5 ml आणि 5 ml ह्यात फरक न समजलेले आई बाप बघतांना ,शाळेत गणिताचा तास किती महत्वाचा असतो ,ह्याची जाणीव होते मला

दात यायच्या वेळी गळ्यात दातपट्टा घालून आणणारे आईबाप बघतांना शाळेत शास्त्राचा तास किती महत्वाचा होता ह्याची ही जाणीव होते मला



मूल व्हावे म्हणून नवस करून ,आणि ते झाले म्हणून तो नवस फेडायला गेल्यावर, बाहेरचे अन्न खाऊन जुलाब झालेल्या बाळाला बघून , जीवशास्त्राचा तास किती महत्वाचा होता हे ही जाणवते मला 



आपला नंबर नसतांना उगाच मध्ये घुसू पाहणाऱ्या आई बापांना बघून समाजशास्त्र किती महत्वाचे आहे ते ही जाणवते मला 



शाळेत मार्क कमी येत आहेत म्हणून बुद्धीवर्धक औषधे मागणाऱ्या आईबापांना बघून त्यांच्याच बुद्धी ची कीव करावी की त्यांना, त्यांच्या शाळेतील दिवसांची आठवण करून द्यावी हेच कळत नाही मला 



आपल्या लेकरांसमोर सिगारेट दारू गुटखा इत्यादी व्यसने करणाऱ्या आईबापांना बघून शाळेतील संस्कारवर्गाचा किती महत्वाचा ह्याची देखील जाणीव होते मला 



ह्या सर्वांना परत एकदा लहान करून ,शाळेत घालावे वाटते मला ! ह्यांचा सर्व बेसिक मध्ये राडा आहे हे जाणवते ! शास्त्रीय दृष्टिकोन ,चांगले विचार , योग्य सामाजिक व्यवहार ,हे सर्व यायला शाळा आणि आजूबाजूचे वातावरण खूप महत्वाचे असते ,आणि महत्वाचे असते वय ! लहान वयात जे आपण शिकतो ते म्हातारपणा पर्यंत साथ देते
एकदा का वयाचा तो टप्पा ओलांडला की काही उपयोग नाही!

आपल्या मुलांवर योग्य संस्कार करा , शाळेचा ह्यात खूप मोठा वाटा असतो , चांगले शिक्षक हे चांगले राष्ट्र निर्माण करणारे ,आणि आपल्या मातीच्या गोळ्याला आकार देणारे असतात . त्यांचीच संख्या कमी होत आहे



शिक्षण आणि शिक्षकांचे महत्व जो राजकारणी जाणेल त्याला निवडून दिले तर काही भविष्य आहे आपल्याला ……..
….
….
..
.
. नाहीतर इतिहासाच्या तासाला बसून कायम इतिहासात च राहू आपण !!
kalpana sangale