मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ आजूबाजूला वेळ पाळणारी, काटकसरीने जगणारी, स्वतःची दैनंदिन कामे करणारी कामे करणारी माणसे असतील तर मुलं पण तशीच होतात. मुलांना जर वैविध्यपूर्ण व समृद्ध अनुभव मिळाले तर त्यांच्या आकलनाचा आवाका देखील आपसूक वाढतो.
थोडक्यात मुलांच्या वागण्यावर दूरगामी परिणाम करणारी माणसं ही त्यांच्या जवळची माणसं असतात, आणि त्यांना आयुष्यभर लक्ष्यात राहणारे अनुभव हे त्यांच्या जवळच्या विश्वातील अनुभव असतात, सिनेमा आणि मालिकांमधील माणसं आणि अनुभव नव्हे!
म्हणूनच मुलांकडून जे वर्तन आपल्याला अपेक्षित आहे ते वर्तन आपण अंगिकरणे आणि त्यांना समृद्ध अनुभव मिळू शकतील असे वातावरण तयार करणे एवढा आणि एवढाच “संस्कार” आपण करू शकतो..
चेतन एरंडे.