आईमुलीचं नातं
मला वाटतं, या साध्याशा दोन ओळीत आई मुलीच्या नात्याचं सारं सार सामावलं आहे.
पुत्र जन्मानं सामाजिक उंची लाभत असली तरी भावनांच्या हिंदोळ्यावर उंच उंच अनुभव देते ती कन्याच.
किती ही लाडाकोडानं जोपासा, पण मुलगा हा आपल्या विश्वात रमणारा, आपली वाट चालतांना कळत नकळत नाळेपासून वेगळा होणारा. अन् मुलगी? ती गगनाला गवसणी का घालेना, पतंगासारखी जोडली असते जमीनीशी, आपल्या जन्मदात्यांशी. सुरवातीची काही वर्षं पित्याकडे कल असणारी मुलगी, मोठी होता होता आईच्या कष्टांना, तिच्या भावनांना, तिच्या विचारसरणीला, तिच्या कुटुंबातल्या, समाजातल्या स्थानाला समजू लागते . स्त्री सुलभ कोमलता, कणव, माया, आणि आईबरोबरची एकरूपता यामुळे आईला समंजस सोबत देऊ लागते, आईची कड घेऊ लागते, आईची काळजी घेऊ लागते, ती कायमचीच.
म्हणूनच, जगात डावी ठरविली गेली आणि लेकीच्या भविष्याबद्दल जराशी साशंक असली, तरी ही, मुलीच्या जन्मानंतर आई आपल्या स्वत:च्या भावविश्वा बद्दल निश्चितच नि:शंक होते. दूर माहेरी सोडून आलेल्या आपल्या आई, बहिणी, मैत्रिणी या सर्वांसारखं ‘या हृदयीचे त्या हृदयी’ कळणारा कुणी तरी हक्काचा जीव आपल्याला जन्मभरासाठी लाभलाय, या विचाराने ती तरारून येते. मुलीच्या संगोपनात रमते, हिरीरीने तिला घडवते, सक्षम बनवते.
आपल्या या नाजुक गुलाब कळीचं टप्पोरं फुल व्हावं आणि त्याच्या घमघमटानं आसमंत दाटून जावा अशी मनिषा ती कायम उरात बाळगते. त्यानुसार तिची निगा राखते, तिला उत्तम खतपाणी पुरविते, उगाच वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्यांना छाटते आणि वेळप्रसंगी बोचऱ्या काट्यांचं कुंपण घालून तिची रक्षा ही करते. या सर्व प्रवासात कधी आनंदते, कधी चिंतातूर होते, कधी दु:खी होते तर कधी नाराज ही होते. पण, या संवर्धन सोहळ्याच्या विविध छटा सांभाळण्यातच तिचं आईपण खुलून येतंय हे ही ती जाणते. मायेनं ओथंबलेलं तिचं हृदय क्षणमात्र किती ही कठोर झालं तरी त्याला पुन्हा पुन्हा वात्सल्याचा फुटलेला पाझर ती आकंठ अनुभवते आणि आपल्या लेकी पर्यंत तो पोचवते ही.
या लोभस प्रवासात ती डोळे लावून बसलेली असते त्या दिवसाकडे, जेव्हा तिच्या लेकीची सावली तिच्यापेक्षा मोठी होते. लेक सुजाण, सुघड झाली याचे दाखले मिळू लागले की माय आपल्या कष्टांचं चीज झालं समजते. हरखून जाते. पण कोडकौतुक करण्याचा तिचा ओघ न संपणारा! आपलं दुखणं खुपणं, कुरकुरणारं शरीर, मरगळणारं मन साभाळते आणि लेकीसाठी आपला हुरूप जपून ठेवते. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते…!’
आणि अशा या लेकीत गुंतलेल्या मातेला तिची छबि तसाच उबदार प्रतिसाद देते. एकीचं हसू दोन गाली पसरतं तर एकीचा आसू दोन गाली ओघळतो. या काळजाचे ठोके तिथे वाजतात तर या जीवाचं शल्य त्याला खुपतं. मग मोठेपणाचा अंगरखा पांघरून मुलगी आईला जवळ घेते, कधी शिकवते, कधी सल्ले देते, कधी कान टोचते, तर कधी नुसती शांतपणे तिचं हृद्गत ऐकून घेते. आपल्या विस्तारलेल्या पंखांखाली दुबळ्या होत जाणाऱ्या आईला सामावून घेते. हे हक्काचं पुन्हा नव्यानं मिळालेलं माहेरघर आंजारत गोंजारत आई समाधानानं शांत समईसारखी तेवत असते, स्निग्धता पसरत असते, तेलाचा शेवटचा थेंब संपेपर्यंत!