नवं पालकत्व
तो वयात येताना…
आपण नेहमीचं किशोरवयीन मुलींबद्दल बोलत असतो पण मुलांबद्दल फारस बोलल जात नाही. असे असताना मुलगा वयात येताना त्याला येणाऱ्या अडचणी मांडण्याचा हा प्रयत्न.
सतरा वर्षांचा अक्षय अचानक आईच्या गळ्यात पडून रडू लागला. अचानक त्याला रडताना पाहून आई पुरती भांबावून गेली. मग मात्र अक्षयला शांत करून; डोक्यावरून मायेने हात फिरवत,”काय झालं ते तरी सांग.”असं विचारल्यावर अक्षयचा बांध आणखी फुटला एक तर मुलांचे (पुरुषांचे) रडणे मान्य नसलेल्या भवतालात आपला मुलगा असा स्फुंदून स्फुंदून रडताना पाहून आईला अवघडल्या सारखे झाले होते.
वयात येणारा अक्षय अचानक शरीरात होणाऱ्या बदलांनी पुरता गोंधळून गेला होता. आताशा त्याला त्याचे नेहमीचे खेळ कंटाळवाणे वाटू लागले होते. अंगातून येणारा घामाचा वास अधिक तीव्र झाला होता. अंघोळीसाठी गेला तर काखेत थोडे केस उगवून आले होते. हळूहळू हात पाय छाती सर्वत्र राठ केस आले होते. त्याला ते अजिबात आवडत नसत. आवाज सुद्धा थोडासा जाड, भसाडा झाला होता. त्याला बोलायची सुद्धा लाज वाटू लागली. यावर भरीस भर म्हणून काय तर गळ्यावर Adams apple चा टणक उंचवटा डोकावू लागला होता. टीव्ही वर एखादं रोमँटिक गाणे बघताना अक्षयची नजर आता नायिकेवर स्थिरावू लागली होती. मैत्रिणींचे सुप्त आकर्षण वाटू लागलं होत. काही मैत्रीणी तर स्वप्नात सुद्धा येत. टीव्ही वर रोमँटिक सीन बघताना लैंगिक उत्तेजना निर्माण होऊन शू ची जागा ताठर होऊन अनेकदा झटक्यात अंडर पँट ओली होत होती. आणि आज तर रात्री कहर झाला स्वप्नात सुद्धा असच काहीसं होऊन नाईट फॉल झाला होता.
एवढं सगळ होत असताना ही आपबिती सांगावी तरी कोणाला त्याला समजेना. शेवटी आईच्या गळ्यात पडून त्याने मनातील घालमेल आईला सांगितली. आता मात्र अनघाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपला मुलगा रात्री झोपताना दोन दोन अंडर पँट का घालतो याचे कारण तीला कळले होते.
किशोर वयातील या नाजूक वळणावर आपल्या मुलांची मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो यांची काळजी आपण घेतली पाहिजे. बरेचदा मुलींच्या वयात येण्याबाबत; मासिक पाळी बाबात आपण मोकळे पणाने बोलतो. ते ही आता आता बोलू लागलोत. पण मुलगे..त्यांच्या बाबतीत मात्र असा वेगळा विचार होताना दिसत नाही. त्यावर चर्चा करणे निषिद्ध मानले जाते. पण हीच वेळ असते जेंव्हा आपल्या मुलाला आपल्या आधारची गरज असते.
मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा कालावधी थोडा उशिरा सुरू होतो. साधारण बारा ते एकोणीस वर्षापर्यंतचा काळ पौगंडावस्था मानला जातो. या काळात होणाऱ्या शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलाची पुर्ण कल्पना ज्या मुलांना पालक शिक्षक यांच्याकडून मिळते ती मुले हा बदल आनंदाने स्वीकारतात.
पण बरेचदा हा काय विषय आहे मुलांशी बोलायचा असा समज सुद्धा पालकांमध्ये असतो मग मुलांशी या विषयावर बोलल जात नाही त्यांच्या मनात बरीच उलथा पालथ होते. अशावेळी मुले त्यांच्या परीने कधी इंटरनेट वरून, तर कधी पॉर्न पाहून माहिती मिळवतात . कधी वर्गातील समवयस्क मुलांशी बोलतात. अशावेळी चुकीची, अशास्त्रीय महिती मिळण्याचा धोका असतो. बरेचदा दाढी मिशी उशिरा येणाऱ्या मुलांना किंवा मिसरूड न फुटलेल्या मुलांना वर्गात सर्वांकडून चिडवल जातं . मग मुलांना स्वतःच्याच लैंगिकते बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. अशी मुले मनातल्या मनात उध्वस्त होतात.
पालकांनी वयात येणाऱ्या आपल्या मुलाला शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. तारुण्यकडे जाणारा हा प्रवास म्हणजे सुंदर फुलपाखरात होणारं रूपांतर आहे. सांगा त्याला बाबा, काका, मामा, दादा या सर्वांना विकासाच्या या बदलाला सामोरे जावे लागले आहे. काखेत, पायावर, हातावर राठ केस येणं, स्नायू अधिक पुष्ट होण, छाती अधिक रुंद होऊन कंबर बारीक होण, दाढी मिशा येणं ही सर्व कमाल मेंदूतून स्त्रवणाऱ्या टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सची आहे.
या अडनिड वयात मुलांना रात्री स्वप्न पडून वीर्यपतन होत. बरेचदा स्वप्नातील स्त्री किंवा मैत्रीण ही परीचयातील असते.अशावेळी मग ,’आपल्या मनात हे काय पापी विचार येतात.’ असे वाटून मुलांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. वाढीच्या या वयात मुलांच्या वृषणंमधे शुक्राणूची निर्मिती होते. हे शुक्राणू सेमिनल व्हेसिकल मधे जमा होतात.वीर्य साठवणारी ही थैली भरली की आकुंचन पाऊन रिकामी होते. झोपेत असताना मेंदूकडून लैंगिक भावना उत्तेजित करणारे स्वप्नरंजन होऊन हे वीर्य पतन होते. ही शास्त्रीय माहिती आवर्जून आपल्या मुलांना सांगा. जेणेकरून त्यांना त्यांच्या स्वतःच्या शारीरिक, भावनिक मानसिक बदलांचे ज्ञान होईल.त्यांच्या मनातील घालमेल कमी होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. तारुण्याच्या या प्रवासात आपण आपल्या मुलाचे सहप्रवासी होऊ या… कारण त्यालाही गरज आहे आपल्या आश्वासक साथीची .. तो वयात येताना.
©संध्या सोंडे
मुलांना सुद्धा वयात येताना गरज असते साथीची… एक वर्षापूर्वीची आठवण…