Back to Top

Category: Students

डार्विन आजोबांची शिकवणी

शास्त्रज्ञ घडतो तरी कसा ? एखाद्या व्यक्तीमध्ये काही मुलभूत प्रेरणा , कुतूहल दडलेले असते का ? शाळेत असताना हि सारी मंडळी नेहमीच चमकली का ? चला डार्विन च्या लहानपणापासून त्याचा मागोवा घेऊ यात. ऐकू यात डार्विन आजोबांची शिकवणी-भाग १ लेखक – डॉ अनिल अवचट हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.


Here a new project especially for Teenager kids and those who enjoy literature and knowledge.
डार्विन आजोबांची शिकवणी – डार्विनचा अदभूत प्रवास आणि त्याचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत गोष्ट रुपात समजून घेऊयात डॉ अनिल अवचट यांच्या लेखणीतून.
आपले आजचे जगणे, जगण्याची सुलभता याचा विचार केला की मग शास्त्र व शास्त्रज्ञ यांचा आपल्या जीवनावर असलेला प्रभाव दिसून येतो. त्यांचे हे उपकार आपण लक्षात ठेवतो का ? त्यांची आठवण ठेवतो का ? आपली समज इतकी छोटी की त्यांचे काम समजतच नाही. पण ते समजावून घेण्याचे कुतूहल तुम्हाला आहे का? डॉ अनिल अवचट किती साध्या सोप्या शब्दात इतका मोठा विषय आपल्याला उलगडून सांगतात. हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.

डार्विन आजोबांची शिकवणी – डॉ अनिल अवचट वाचन – प्रीतम रंजना, चित्रे – अर्णव गंभीर , तांत्रिक सहयोग – दीपक सातारकर

‘पंचपक्वान्नांचे भोजन’

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आपल्या आहारातील सहा रस पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थांवर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात.

लाडू…

या, लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू द्या.

करंजी..

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली..

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा..

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

(माझे फेव्हरेट) अनारसे..

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा

वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ

हा अतिशय वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ बघितला मी.
भारताची शान असलेल्या INS विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची गायडेड टूर आहे सर्व माहितीसह पूर्ण ३६० डिग्री ३D मध्ये शूट केलेला आहे.
मोबाईल वर बघायला जास्त चांगला वाटतो. हातात मोबाईल घेऊन स्वतः भोवती गोल फिरवा, मोबाईल खाली वर करा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून स्वतःच सगळे बघत आहेत असा फील येतो. एक वेगळा व्हर्चुअल रिऍलिटी चा अनुभव मला आवडला म्हणून तुम्हाला शेयर केलाय.
कॉम्पुटरवर बघत असाल तर माउस क्लीक करून ड्रॅग करू शकता पण मोबाईलवर बघण्याची मजा त्यात नाही.

Pan tilt and move your phone as the video plays to get the 360° VR tour.

*बालपण करपवू नका!* – _भाऊसाहेब चासकर_

*बालपण करपवू नका!*
– _भाऊसाहेब चासकर_
राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय यंदा सहा वर्षे ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रवेश परीक्षांपासून वंचित राहतात किंवा एक वर्ष उशिराने पात्र ठरतात. पहिलीत प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे केल्याने मुलांचे नुकसान होते. ते पाच वर्षे करावे, असा पवित्रा घेत एका पालकाने याला आव्हान देणारी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रवींद्र देशपांडे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन पिटिशनच्या माध्यमातून ते लोकसहभाग मिळवत आहेत. अनेक पालकांना त्यांचे मुद्दे पटत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळाप्रवेशाचे वय नेमके किती असावे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे, आयाम आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी.

Read more

*गुजरातचा गरबा तर महाराष्ट्राचे काय?*

*गुजरातचा गरबा तर महाराष्ट्राचे काय?*
‌. गुजरात्यांचा गरबा तर आपल्याकडे काय असतं. इतरांचे सण साजरे करताना आपण आपलं विसरत चाललो आहोत. हा आपला ठेवा आहे आणि हे आपल्याला जपलंच पाहिजे. हे भान आपली ‘बनाना’ आणि ‘अॅपल’ पिढीला घडवण्याऱ्या आपल्या लोकांना कळेल तो सुदीन.
“भोंडल्याची १६ गाणी ”
भोंडला ,भुलाई ,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत ,घरातल्या मोठ्या व्यक्ती ,आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती ,परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती ,गाणी सारे काही विरून जाते आहे .
चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ??…….
तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये …अर्थात आपल्या
स्मार्टफोन मध्ये …
आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील ,सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा …
लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते ,त्यामुळे आपल्या आई ,बहीण ,जावा ,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा “नवरात्रीचा अमूल्य ठेवा” …
1)
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो
*************************
2)श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले
*************************
3)
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
४)
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून….||2||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||3||
*************************
5)एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी
*************************
6)
अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
*************************
7)
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू ॥४॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा ॥५॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा ॥६॥
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥
अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५
*************************
८)
कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥
कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥
कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥
आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥
*************************
9)
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।
*************************
१०)
काही भागात
कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल
तुला न्यायाला कोण कोण आलं.
….
(अशी सुरुवात आहे )
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥
*************************
११)
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नणंद पाहुणी आला गं बाई
नणंदेने काय काय आणले गं बाई
नणंदेने आणला पोहेहार गं बाई
पोहेहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …
कोण कोण पाहुणा आला गं बाई
दीर पाहुणा आला गं बाई
दिराने काय काय आणले गं बाई
दिराने आणले गोठ गं बाई
गोठ मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासू पाहुणी आला गं बाई
सासूने काय काय आणले गं बाई
सासूने आणला राणीहार गं बाई
राणीहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नवरा पाहुणा आला गं बाई
नवऱ्याने काय काय आणले गं बाई
नवऱ्याने मंगळसूत्र आणले गं बाई
मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दारं उघडा गं बाई
झिपरं कुत्रं आवरा गं बाई
*************************
12)
हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं
*************************
१३)
माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन
भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन
बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन
बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन
मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन
भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन
भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन
*************************
१४)
सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.
भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥
भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥
भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥
भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥
भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥
भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥
भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥
भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥
भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥
*************************
१५)
माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।’
‘असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।’
‘असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।’
‘असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।’
‘असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।’
‘असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।’
‘असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥’
‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’
‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।’
असली कसली बाई तिला रीतच न्हाई
*************************
16)
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
**************************************************
जीवनाचे सार या भोंडल्या किंवा हादग्या मधे सांगितले आहे
हस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप
खूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणुनच भोंडला हादगा हे मुलींनी
महिलांनी खेळत संस्कृति वाढवत ठेवली पाहिजे यात आणखी update व्हावेत नविन गाणी include व्हावित पण संस्कृति चा base platform तोच असा

“स्वा.सावरकरांनी #मराठी भाषेला दिलेले शब्द”

“स्वा.सावरकरांनी #मराठी भाषेला दिलेले शब्द”

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
अद्ययावत (अप टू डेट)
महाविद्यालय (कॉलेज)
व्यंगचित्र (कार्टून)
प्रत,अनुलेख (कॉपी)
क्रीडांगण (जिमखाना)
दैनंदिनी (डायरी)
नौदल (नेव्ही)
छायाचित्र (फोटोग्राफ)
प्रतिकात्मक (सिम्बोलिक)
स्थानक (स्टेशन)
कुमारी,किशोरी (मिस)
प्रचारक (मिशनरी)
महापौर (मेयर)
गणवेश (युनिफॉर्म)
युध्द (वॉर)
प्रशाळा (हायस्कूल)
निर्माता (प्रोड्युसर)
मनुष्य (इसम)
वाईट,नीच (खराब)
प्रत्येक्ष (खुद्द)
दीन (गरीब)
साहाय्य (मदत)
शेठ,महाशय (साहेब)
अपराध (गुन्हा)
घाव,व्रण (जखम)
प्रकट (जाहीर)
प्रत,प्रतिष्ठा (दर्जा)
निरुपाय (नाईलाज)
अनुत्तीर्ण (नापास)
हानी,तोटा (नुकसान)
चिंता,काळजी (फिकीर)
देश (मुलुख)

वजाबाकी करण्याची एक ट्रिक

वजाबाकी करण्याची एक ट्रिक : __

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

10, 100, 1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

Read more

Board Exam 2020 :

Board Exam 2020 :

आता आपल्या हातात आहे थोडाच वेळ, कशी कराल परीक्षेची तयारी?

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला अधिक वेगानं अभ्यास करायचा असतो.
अशावेळी आपल्याला सगळं पुस्तक वाचणं शक्य नसतं मात्र काही छोट्या टिप्स तुम्ही केल्यात तर आपला अभ्यास कमी वेळात अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो.

यासाठी खालील काही खास महत्वाच्या टिप्स चा तुम्हाला निश्चित उपयोग होईल.

5R या तत्वाचा वापर करून अभ्यास करा.

Research- आपल्याला काय कठीण जातं हे शोधून काढा. त्यावर रनिंग छोट्या पॉकेट नोट्स तयार करा.

Read- आपल्याला कठीण जाणारा भाग अथवा विषय पुन्हा पुन्हा वाचा

Remind- वाचलेल डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा.

Rewrite- त्यानंतर कागदावर मुद्दे लिहून काढा

Review- आपलं उत्तर बरोबर आले की नाही हे पुन्हा तपासून पाहा.

रनिंग नोट्स, पॉकेट नोट्स कशा काढाल,
गणितातील सूत्र किंवा भाषा आणि साहित्यातील महत्त्वाचे मुद्दे डोळ्यासमोर कायम रहावेत यासाठी पॉकेट नोट्सचा वापर होतो.
त्यासाठी तुम्ही नोट्स काढायला हव्या. त्या तुमच्या शब्दात आणि लक्षात राहतील अशा असाव्यात.
चालता फिरता उठता बसता फक्त पुढचे काही दिवस आपल्याला अवघड जाणाऱ्या विषयातील न येणारा भाग आठवून पाहण्याचा प्रयत्न करा.

पुढचे काही दिवस वेळेचं चोख नियोजन करा.

खाणं, जेवणं, झोपणं आणि अभ्यास करणं यांच्या वेळा ठरवून घ्या.

दिवसातील किमान 1 तास हा खेळ अथवा व्यायाम 1 तास तुमचा आवडता छंद जोपासण्यासाठी द्या. त्यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोन्ही प्रसन्न राहिल.

घोकंपट्टीवर भर नको

महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषेत लिहून काढा. घोकंपट्टी केल्यानं मुद्दे अथवा विषय विसरण्याची भीती राहाते. त्यामुळे एखाद वाक्य किंवा शब्द विसरला तर पुढंचं काहीही आठवत नाही. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून लिहून काढा आणि आपल्या भाषेत पेपरमध्ये मांडा.

गणिताची सूत्र, विज्ञानातील सूत्र आणि आकृत्या जशाच्या तशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

दिवसातील 1 तास मेडिटेशन आणि रिव्हिजन

संपूर्ण दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर आज आपण दिवसभरात काय केलं. किती केलं आणि कशापद्धतीनं केलं याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.

मेडिटेशनमुळे मन शांत आणि स्थिर होतं. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

वरील सर्व गोष्टी अमलात आणा.

शाळेतील सर्व विषयांचे स्वाध्याय, प्रयोगाच्या वह्या, निबंध वह्या, काही प्रकल्प असतील ते पूर्ण करून जमा केल्याची खात्री करा. कारण या सर्व गोष्टी पूर्ण केल्यावरच अंतर्गत गुण मिळतात.

खूप अभ्यास करा

मन प्रसन्न ठेवा

घरातील व्यक्तींशी संवाद साधा

शिक्षकांसोबत संवाद ठेवून आपल्या समस्यांचे निराकारण करा

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा

यश तुमचेच आहे

यशस्वी भव!!!💐👍