#NIOS
#homeschooling
#openschooling
#QualityEducationForAll

आपल्या देशात दर्जेदार शिक्षणाची परंपरा फार प्राचीन असली, तरी मधल्या बऱ्याच मोठ्या कालखंडात शिक्षणाच्या बाबतीत खूपच उलथापालथ झालेली होती. ब्रिटिशांनी शिक्षणाची काही व्यवस्था बसवली, तरी ती त्यांच्या सोयीची होती.

ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रचंड लोकसंख्या, जात/ धर्म/ भाषा/ आर्थिक स्तर/ सामाजिक स्तर/ भौगोलिक/ ऐतिहासिक अशा सर्व प्रकारची विविधता असताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च, तांत्रिक, व्यावसायिक अशा सर्व स्तरांवर शिक्षणाची घडी नीट बसवावी लागणार होती.

कला, वाणिज्य, विज्ञान, आरोग्य, शेतकी, कायदा, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, उद्योगधंदे, राजकारण, माध्यमे, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात देशाला स्वावलंबी होण्यासाठी, देशाचा कारभार वेगवेगळ्या पातळ्यांवर चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित मंत्रालयाचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे ठेवण्यात आले. ( नुकतेच ते शिक्षण मंत्रालय असे करण्यात आलेले आहे.) असे मनुष्यबळ तयार करायचे तर आधी किमान प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हायला हवे. ते साधत असताना सर्वात मोठे आव्हान होते ते शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचे शिक्षण पूर्ण न होण्याचे, शिक्षण अर्धवट सोडून देण्याचे !! स्थगन (नापास होणे) आणि गळती ( शाळा मधेच सोडून देणे) या समस्या फार मोठ्या प्रमाणावर होत्या.

या आणि शिक्षण क्षेत्रातील इतर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केंद्रीय पातळीवर, राज्य पातळीवर वेगवेगळे आयोग, संशोधन संस्था, प्रशिक्षण संस्था, समित्या, मंडळे, परिषदा, बोर्ड ( स्टेट, CBSE, ICSE ) नवोदय विद्यालये, आश्रम शाळा, केंद्रीय विद्यालये, तंत्र शाळा, यांची निर्मिती झाली.

त्यातूनच एक बोर्ड अस्तित्वात आले ते म्हणजे NIOS –
National Institute Of Open Schooling ( राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था).

ही संस्था1989 साली स्थापन करण्यात आली. जे विद्यार्थी शाळेत नियमित जाऊ शकत नाहीत, ज्यांचे शिक्षण वेगवेगळ्या कारणांमुळे अर्ध्यात सुटले आहे, जबाबदऱ्यांमुळे नोकरी व्यवसायात अडकल्यामुळे आता पुन्हा शाळेत जाता येत नाही, आणि दहावी नाही म्हणून प्रमोशन नाही, पुढचे शिक्षण घेता येत नाही, ज्यांना आपल्या मुलांचे होम स्कुलिंग करायचे आहे पण तरी दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, ज्यांना काही ठराविक विषयांत आवड, गती आहे, त्याचा सखोल अभ्यास करायचा आहे म्हणून स्टेट किंवा CBSE बोर्डाच्या सर्व विषयांचा अभ्यास करायचा नाही, किंवा या बोर्डाचे काही विषय खरोखर झेपत नाहीत, अशा सर्वांसाठी NIOS हा एक मोठाच दिलासा आहे. इथून दहावीची परीक्षा दिल्यावर बारावीची परीक्षाही देता येते, दहावी – बारावी नंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातही ( स्पर्धा परीक्षा वगैरे) येता येते. त्यासाठी विषयांची निवड मात्र विचारपूर्वक, काळजीपूर्वक करायला हवी.
ही संस्था पूर्णपणे सरकारी आहे.

मुख्य ऑफिस दिल्ली येथे असून देशभर प्रमुख ठिकाणी केंद्रे आहेत. शाळेचे तोंड न पाहिलेली व्यक्तीही घरी अभ्यास करून दहावीची परीक्षा या बोर्डामार्फत/ संस्थेमार्फत देऊ शकते. तुम्ही इंग्लिश माध्यमात किंवा तुमच्या प्रादेशिक भाषेत ही परीक्षा देऊ शकता.

कमीतकमी एक भाषा, जास्तीत जास्त दोन भाषा धरून एकूण 5 विषय तुम्हाला निवडायचे असतात.

परीक्षा एप्रिल आणि ऑक्टोबर अशी वर्षातून दोन वेळा होते. एकदा नोंदणी केल्यावर तुम्ही पाच वर्षात मिळून या विषयाची परीक्षा देऊ शकता.

विषय निवडीसाठी अगदी भरपूर पर्याय आहेत, ( 18 भाषांसह एकूण 36 विषय). यात व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची सोयही आहे.

वयाची 15 वर्षे पूर्ण झालेला विद्यार्थी/ विद्यार्थिनी या परीक्षेला बसू शकतात.
अभ्यास घरून करायचा असतो. मार्गदर्शनासाठी केंद्र असते, काही सत्रे आयोजित केली जातात. अंतर्गत मूल्यमापनही असते.

उत्तरेकडील राज्यांमध्ये याचा भरपूर प्रसार झाला आहे. महाराष्ट्रातही आता होम स्कुलर्स ची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असताना पालक या पर्यायाचा विचार करू लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

एक नक्की की हा शॉर्टकट नाही तर योग्य भविष्यासाठी योग्य दिशा दाखवणारा मार्ग आहे. कष्ट इथेही घ्यावे लागतातच. NIOS च्या माध्यामातूनही उत्तम भवितव्य घडवता येते. NIOS चा पर्याय निवडणा-यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !!!

ज्योती केमकर
संस्थापक, संचालक
अभ्यासिका लर्निंग अँड रिसोर्स सेंटर, पुणे.