नुकतीच शाळा सुरू झालेली होती. मुलांना वर्गात बसवणे, नवीन मुलांची नावे लिस्ट मध्ये शोधून,त्या त्या टीचर ला सांगणे,छोट्या वर्गातल्या मुलांना त्यांचा वर्ग,शिक्षिका दाखवणे एकूणच घाई होती.त्यातही मुलं जवळपास दोन वर्षांनी नियमितपणे शाळेत येत होती.सगळंच विसरलेल्या मुलांना पुन्हा शाळेची,वर्गाची ओळख होऊन बसायला आठ दिवस तरी लागणार होते. बरं यामध्ये सगळे ते गुपचूप जाऊन वर्गात बसतीलच हे काही सांगता येत नव्हतं.त्यातून एखादा खिडकीतून बाहेर बघून शाळेत सोडायला आलेली आई घरी जाताना दिसली की रडत बाहेर धावत यायचा.. हे सगळं सावरता सावरता नाकीनऊ येतात.यामध्ये सगळ्या अवघड काम हे नर्सरी च्या टीचर चं, ज्युनिअर KG आणि सिनिअर KG चं ही फार वेगळं नाहीच. ह्या वयाच्या मुलांना वर्गात बसवून अभ्यास करवून घेणे हेच एक टास्क असते.
पहिली दुसरीत मुलांना थोडंस कळायला लागतं. कमीतकमी वर्गात न रडता बसावं, toilet ला जाणे, काही प्रॉब्लेम असेल तर सांगणे इतकं किमान ते करू शकतात.
नवीन मुलं आता कुठे थोडी थोडी रुळायला लागली. पण मुलांचे पालक रुळणं फार गरजेचे आहे. पडत्या पावसात मुलांना शाळेत घेऊन आल्यावर गेटमधून आत सोडतात एकदा का मुलांना आत सोडलं की घरी जायला निघतील आणि रस्त्यावर पालक,विद्यार्थी,रहदारी,नव्यानेच थाटलेली भाजी मंडई (अतिक्रमण) या सगळ्यांचा एकच गोंधळ होऊन होणार ट्राफिक जाम,होणारी भांडणे टाळायला मदत करतील तर ते नाही. यात अनेक माता गेटच्या जाळीत बोटं अडकवून त्या मुलाला अगदी आत जाईपर्यंत बघत असतात, गेटमध्येच उभे राहून जवळपास 25 मीटर वरून त्या रस्त्याने जा,इकडून जा ,घसरशील हे ओरडून ओरडून सांगत असतात.तर बऱ्याच जणी गेट च्या आत यायची परवानगी नसताना,, ‘काय करशील आत आल्यावर ‘ असे भाव डोळ्यात आणून आत येऊन मुलगा खरंच कुठे जातोय हे ‘स्वतःच्या डोळ्यांनी’ बघून खात्री करून घेत, मुलांना स्वतः कुठलेही प्रयत्न या प्रकारचे पालक करू देत नाहीत.साधी पायरी चढताना ‘सावकाश चढ,हळू ,लागेल, वर्गात अगदी पुढच्या बेंच वरच बस,’ह्याच्याशी’ मैत्री करू नको,’त्याच्याशीच’ कर,वर्गात कुणी त्रास दिला की लग्गेच मॅडम ना सांग आणि मॅडमनी काही action नाही घेतली (म्हणजे यांच्या तक्रारीबरहुकूम लग्गेच ‘त्या’ दुसऱ्या मुलाला धोपटणे वैगेरे) तर लग्गेच मला सांग’ वैगेरे वैगेरे सूचनांचा मारा सतत काही पालक मुलांना करत असतात. समजा पायरीवरून पाय घसरून पडला तर उठेल आणि पुढच्या वेळी न पडण्याची काळजी तो स्वतः घेईल,काहीतरी शिकेल,किंवा वर्गात त्रास देणारी मुलं असतील तर ते स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करतील जर पालकांनी ,’तुझे प्रश्न तू सोडवण्याचा प्रयत्न कर ‘ फक्त इतकेच सांगितले तर..
अशा प्रकारे सतत मुलांमध्ये जास्त लक्ष घालून त्यांना कोशात ठेवणारे पालक जेव्हा शाळेत येऊन ,’मॅडम ही मुलगी मनाने अभ्यासच करत नाही ,तिला जरा समजावून सांगा ‘ अशी तक्रार करतात तेव्हा नक्की कुणाला समजवायचं हेच समजत नाही.
काल एक महाभाग ऑफिस समोर जाऊन उच्च स्वरात काहीबाही बोलत होते.वाटलं त्यांच्या मुलाला काही प्रॉब्लेम असेल,घाईने त्या मुलाची क्लास टीचर गेली.बराच वेळ ती काहीतरी त्या माणसाला समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि तो माणूस हातवारे करून , जोरजोरात बोलत होता. त्याचं म्हणणं होतं की मधली दोन वर्षे शाळा बंद होती,आणि त्या दरम्यानचा अभ्यासक्रम त्या टीचर ने सहा महिन्यात ‘भरून ‘ काढावा. तरंच तो शाळेची चालू वर्षाची फीस भरेल !!या पार्श्वभूमीवर त्या माणसाला समजावून सांगण्यात काहीच अर्थ नव्हता..मुळात अभ्यासक्रम भरून काढायला त्या मुलांचं डोकं म्हणजे वेठबिगारी काम नाही किंवा एखाद्या फॅक्टरी चं production work तर नाही ,जे रात्रपाळी करून, कामाचे तास वाढवून ‘भरून ‘काढता येतं
माणूस त्याच्या मुलासमोर टीचर ला बोलत होता , हुज्जत घालत होता.आणि ते मूल प्रचंड दडपणाखाली येऊन बापुडे होऊन एकदा वडिलांकडे तर एकदा टीचर कडे बघत होतं. आपण आपल्या मुलांसमोर शिक्षकांना बोल लावतो याचा त्या मुलांवरती काय परिणाम होतो याचा जराही पालक विचार का करत नसावेत..? मुलांसमोर शिक्षकांविषयी बोलताना एकेरी उल्लेख करणे,त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका करणे , व्यक्तिगत आयुष्याचा संबंध शिकवण्याशी जोडणे,शिक्षिकेला काहीच कसे कळत नाही, पेक्षा आपणच कसे हुशार आहोत हे मुलांसमोर इतरांशी बोलणे हा तर पालकांना अभिमान वाटणारा भाग वाटतो..याचा सरळ परिणाम फक्त मुलांवर होतो.साधारण 4ते 11वर्षे वयोगटातल्या मुलांचे आदर्शच मुळी आईवडील आणि त्यांचे शिक्षक असतात. मुलं अनुकरणप्रिय असतात.अशा परिस्थितीत त्यांच्या समोर चांगल्या गोष्टींचे आदर्श ठेवण्याचं काम जितकं आईवडिलांचे असते तितकेच ते शिक्षकांचे असते.पण पालकांनीच जर शिक्षकांविषयीची मतं कलुषित केली तर मुलं तसाच विचार करतील,जे आपल्याला रोज शिकवतात ते चुकीचे आहेत हाच विचार त्यांच्या मनात दृढ होईल.
बऱ्याचदा पालक आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादतात ते पूर्ण करण्यासाठी मूल सक्षम नसेल, मुलांची क्षमता, इतर काही करायची असेल,तो त्या मुलांचा कल नसेल तर पालक निराशेकडे झुकतात आणि आपसुक ते त्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिक्षक कसे काय अपयशी आहेत याचे दाखले देतात. थोडक्यात पालकांच्या अपेक्षांचं ओझं हे त्या मुलावर आणि उरलेलं शिक्षकावर येतं.
जीवघेणी स्पर्धा , जगण्यासाठी करावी लागणारी रोजची लढाई, वाढत्या अपेक्षा, बदलती जीवनशैली या सगळ्यांचा परिपाक म्हणजे पालकांचं मुलांच्या बाबतीत अति जागरूक होणं हे ही एक कारण असू शकतं.पण अशा परिस्थितीत शिक्षकांना दोष देऊन, मुलांसमोर त्यांची प्रतिमा मलीन करणं या गोष्टींनी आहे ती परिस्थिती सुध्दा बिघडू शकते.ज्यापद्धतीने आपण मुलांना शिक्षकांचे दोष,चुका दाखवून देतो तोच चष्मा लावून तीच मुले आईवडिलांकडे बघतात. आणि यातूनच मुले उद्धट होणे,कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास होणे,नात्यांविषयीची आत्मीयता,प्रेम कमी होणे हे प्रकार घडतात. म्हणूनच मुलं ही कोऱ्या पाट्या आहेत सतत त्यांच्यासमोर सकारात्मक ,चांगले विचार,चांगल्या गोष्टी,चांगल्या व्यक्तींचे आदर्श शिक्षक आणि आईवडिलांनी मिळून ठेवावेत. मग मुलं घडवणं अवघड नाही तर आनंददायी होईल.
तनुजा कुलकर्णी चाटुफळे