आपुलीच प्रतिमा होते……

कविता कशी सुचते? यावर ग्रेसांनी छान उत्तर दिले…. माझ्या टेबलाच्या गंजक्या खिळ्यांचे हुंदके मला ऐकू येतात तेव्हा मला कविता सुचते.तर आरती प्रभू म्हणतात.. माझ्या अजाण निष्प्राण कवितेच्या वाट्याला जाऊ नका… मोडून पडाल. मंगेश पाडगांवकर म्हणतात… ज्यांची ह्रदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात. यात कवी तीन जरी असले तरी मनातलं सांगून मोकळे झाले. यात संवादीपण आहे त्यांचं संवादी मन आहे. इतकं अर्थपूर्ण माणसं बोलतात कधी? जेव्हा ते स्वतःशी खूप बोलतात. आपल्या बाबतीत असं घडतं का? शोधावं. जी माणसं स्वतःशी बोलतील ती स्वतःशी मैत्री करतील. ज्यांची अशी मैत्री जडेल ते एकटे पडणार नाहीत. स्वतःत रमता आलं पाहिजे. साधक बाधक विचार करुन स्वतःला मांडता आलं पाहिजे. स्वतःशी भांडताही आलं पाहिजे.

कधी कधी आपणच आपलं ऐकत नाही. झुगारुन देतो स्वतःला. स्वतःला दूषणं देऊ लागतो. विसंवाद स्वतःशी होतो. स्वतःच स्वतःला मनोमयी शब्दांनी घायाळ करतो. आतले शब्द विखारी होतात. शब्द साधे नसतात.
जी मिळे शब्दात शिक्षा
तेवढी फाशीत नाही…

इतकं आपण स्वतःला कोसतो.
मग मनात येतं…. काय साला आपलं जीवन? स्वतःला घायाळ करायला पर व्यक्ती हवीच असते असं नाही. आपणच पुरे पडतो.

हे असं का होतं? आपली व्यक्त होताना गडबड होते. बाया नाही का? भांड्याशी भांडतात. पुरुष स्वतः स्वतःशीच कधी बडबडतात.

आठवणी बालपणापासून ते आजपर्यंत आपल्या भोवती फेर धरतात. त्यातून आपण आपला शोध घेत निघतो. कधी स्वतःला साथ देतो.. कधी स्वतः स्वतःच्या विरोधात उभे रहातो. जगावरचा सोडा… कधी कधी स्वतःवरचा विश्वास उडून जातो. कोणाच्या कामी येऊनही हे असं आपल्या बाबतीत का घडावं? या प्रश्नाचे उत्तर सापडता सापडत नाही. इथे आपुलीच प्रतिमा होते… आपुलीच वैरी!

आपण आपल्याला कारण नसताना कमी लेखनं याच्याइतकं मोठं पाप नाही. कायम स्वतःला दुषनं देत जगणं ढकलू लागलो की जगण्याची चव निघून जाते. आपण आपले शत्रू होतो. हे असं होऊच नये असे वाटत असेल तर आत्म्याचा आवाज आपण ऐकला पाहिजे. म्हणजे गंजक्या खिळ्यांतूनही आपल्याला आवाज ऐकू येईल. जगण्याची कविता सुचेल. प्रतिमेचा सन्मान होईल. तो आपणच करायचा हे लक्षात ठेवावं. म्हणजे आपली प्रतिमा कधीच आपली वैरी होणार नाही. नाहीच.

©संजय गवांदे