आपल्या पालकत्वाचा, शिक्षण व्यवस्थेचा किंवा एकूणच समाज व्यवस्थेचा भर हा सातत्याने मुलांना त्यांच्यातील कमतरतांची जाणीव करून देण्यावर असतो, असे माझे निरीक्षण आहे.
तुला हे येत नाही, तुला ते धड जमत नाही. ही वाक्य फेकत, सातत्याने सूचनांचा भडीमार करत पुढच्या व्यक्तीला सतत काहीतरी “शिकवणे” हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे आपल्याला वाटते.
आपली मार्क लिस्ट ही संकल्पना तर अगदी मोजक्याच मुलांच्या मनात आत्मविश्वास तर बहुतेक मुलांच्या मनात एक तर न्यूनगंड तरी निर्माण करते किंवा एखादी गोष्ट समजली नसली, व्यवहारात करता येत नसली, तरी ती गोष्ट जमते,.असे इल्युजन तयार करतात.
आपली मुलांच्या संगोपनाची ही “कमतरता हाईलाईट” करण्यावर भर असलेली पद्धत, खरेच मुलांच्या फायद्याची आहे का? त्या मुलाला सतत त्याच्या कमतरता सांगून त्याची प्रगती होईल की त्याला त्याच्या क्षमता आणि सामर्थ्याची जाणिव करुन दिल्याने त्या मुलाची प्रगती होईल? याचा आपण कधी विचार केला आहे का?
सत्य हे आहे, की या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला, निसर्गाने काही ना काही क्षमता आणि त्या क्षमता वापरण्यासाठी लागणारी इच्छा शक्ती देऊनच पाठवले आहे. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी जर त्याला त्याच्या या क्षमतांची सातत्याने जाणीव करून दिली, त्या क्षमता वापरण्यासाठी त्याला संधी मिळेल असे वातावरण दिले, तर ती व्यक्ती आत्मविश्वासाने त्याच्या नैसर्गिक क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकते.
अगदी सध्या सध्या गोष्टींचा विचार करूया. आपली मुले गॅस सुरु करू शकतील का? वरण भाताचा कुकर लावू शकतील का? स्वतःच्या कपड्यांची घडी घालून ते कपाटात व्यवस्थित ठेवू शकतील का?
इथपासून ते ही मुले गणितातील अवघड संकल्पना शिकू शकतील का? त्यांच्या अभ्यासावर किंवा कोणत्याही इतर कामावर लक्ष केंद्रित करू करू शकतील का? सोशल मीडियावर सुरक्षितपणे वावरू शकतात का?
या सगळ्या प्रश्नांकडे बघताना आजपर्यंत आपण, त्यांना हे जमणार नाही या नकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या क्षमता न जोखताच नाकारत आलो.
आता मात्र आपण आपला दृष्टिकोन थोडा बदलून बघू.
आपण असे म्हणूया की निसर्गाने या सगळ्या किंवा अशा प्रकारच्या त्या त्या वयात त्यांना आव्हानात्मक वाटणाऱ्या गोष्टी करण्यासाठी लागणाऱ्या क्षमता आणि इच्छा शक्ती, मुलांना आधीच दिलेल्या आहेत. फक्त त्या आपण कधी वापरून बघितल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही इतकेच.
त्यामुळे आपल्या घरापासून मुलांशी सकारात्मक बोलून, त्यांना घरातील छोटी छोटी कामे देत त्यांना आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासातून त्यांच्या क्षमतांची जाणीव करून द्यायला सुरुवात करू.
एकदा मुलांना ही जाणीव झाली की मुले निसर्गातील इतर सगळ्या जीवांप्रमाणे स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि त्यांचे विश्व शोधण्यासाठी भरारी घेतील, एवढा विश्वास ठेवणे, एवढेच आपले काम आहे.
चेतन एरंडे