आपली समज विस्तारित करणारा हा लेख जरूर वाचा.
आम्ही प्रेग्नंट आहोत!!!
डॉ. शंतनु अभ्यंकर
“डॉक्टर, आम्ही प्रेग्नंट आहोत!!!”
माझ्या हॅलोचीही वाट न बघता एक अधीर स्वर फोनवर उमटला. बोलणारी व्यक्ती, अस्तंगत राजेशाहीचे ओझे वहाताना, स्वतःला आदरार्थी बहुवचन वापरणारी, कोणी घरंदाज स्त्री नव्हती. तो होता, पुरोगामित्वचं पाणी प्यायलेला आणि ते पुरोगामित्व आचरणात आणायला आसुसलेला माझा मित्र.
“अभिनंदन!, तुझं हे ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ जाम आवडलं यार मला.”
“सर, आम्ही इथे ज्या डॉक्टरना दाखवलंय, तिथे मी केसपेपरवरसुद्धा दोघांचं नाव घालायला लावलं, रिसेप्शनिस्टला.”
“अरे व्वा, अगदी भारी केलंस हे.”
बायकांचा डॉक्टर असलो तरी पुरुषांची बरीच रूपं बघायला मिळतात मला. पण हे रुपडं नवीन होतं, मोहक होतं. किती खरी होती त्याची भावना. मूल होणार ते दोघांना मग दोघंही प्रेग्नंट आहेत असं समजलं तर छानच की. नवऱ्याची अगदी पहिल्यापासून अशी समजून उमजून मिळालेली साथ दोघांचं नातं अधिक फुलवत नेईल, नाही का?
पण नवऱ्याचा सहभाग सुयोग्य जरी असला तरी स्वतःच्या शरीरावर त्या स्त्रीचाच हक्क आहे. ती सक्षम आणि सज्ञान असेल तर अगदी गर्भपाताचा अधिकार तिलाच. हे सर्वस्वी मान्य करूनही, सुजाण पालकत्व हा हेतु असेल तर नवऱ्याचा सहभाग हवाच.
पण सहसा असं आढळत नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असेल; तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता असतो; हे ढळढळीत जीवशास्त्रीय सत्य आहे. ह्या सत्याशी इमान राखणारे अती. एकदा बायकोला ‘प्रेग्नंट केली’ म्हटल्यावर, आता पुढे आपण काय करायचं, हे ह्यांना उमगत नाही.
शिवाय जो ‘पीतो’ तो पिता, ह्या समजुतीशी प्रामाणिक रहाणारेही भरपूर. माझ्याकडे एक कुटुंबनिष्ठ बिहारी बाबू बायकोला घेऊन यायचा. दोघंच दोघं इथे रहायचे. मजुरी करायचे. तो सतत दारू पिऊन तरर्. सतत शिव्यांचा भडिमार. पण कळा सुरू होताच, आपली ही अवस्था केल्याबद्दल, त्याच्या देवीजीने अर्वाच्य आणि अ-लिख्य भाषेत त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. माताभगिनींवरून, आईबापावरून, अंगप्रत्यंगावरून, गर्दभ-अश्वावरून शिव्या देत देत तिनी संपूर्ण परतफेड केली. अखेर ती सुटली आणि तिचे ते शिव्याशाप ऐकण्यातून आम्ही सुटलो. मुलगा झाल्याची गोड बातमी मी देताच तो बिहारी बाबू म्हणतो कसा, ‘कुतींया से कहना, घर आएगी तो इतना लात खायएगी की मर जाएगी!’
अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच. मोटरसायकलवरून सुसाट आणि सैराट आलेलं जोडपं प्रेग्नंसी टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे हे कळताच हेलपाटतं. माझ्या दवाखान्याची एकुलतीएक, वितभर, पायरी उतरतानासुद्धा, नवरा हात धरतो, म्हणतो ‘जपून हां’.
जपावं लागतच. एक क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे. पत्नीच्याच पोटात बाळ वाढत असतं, त्यामुळे तपासण्यांपासून ते औषधपाण्यापर्यंत, खाण्यापिण्यापासून ते डोहाळजेवणापर्यंत आणि प्रेग्नंसी-शूट पासून बेबी-शॉवरपर्यंत बराचसा फोकस तिच्यावरच असतो. अचानक सिंहासनभ्रष्ट झाल्याबद्दल पुरुषांना थोडीथोडी असूयाही वाटत असते.
एकदा एकानी मला विचारलं सुद्धा, ‘माझ्या नाहीत का हो काही तपासण्या?’ आईचा रक्तगट निगेटिव्ह असणे, टेस्टट्यूब बेबी, वारंवार व्यंग अथवा गर्भपात अशा अपवादात्मक परिस्थितीत नवऱ्याच्या तपासण्या करतातच. पण बापानेही नेहमी करुन घ्याव्यात अशा तपासण्या आहेत बरं. उदाहरणार्थ एचआयव्ही. हा आजार आईला असेल तर बाळाला होऊ शकतो आणि तसा तो होऊ नये म्हणून उपचार उपलब्ध आहेत. पण वेळेत निदान झालं तर. आईची तपासणी सुरवातीला आणि शेवटी अशी दोनदा केली जाते. उगाच अधेमधे इन्फेक्शन झालं असेल तर कळावं म्हणून. पण आईला नव्याने इन्फेक्शन होणार ते बाबांकडूनच की. हा आजार शरीरसंबंधातून पसरतो आणि संबंध तर (सहसा) फक्त पतीबरोबर येतात. तेंव्हा पत्नीबरोबर पतीचीही तपासणी करणे महत्वाचे आहे. असाच हिपॅटायटिस बी म्हणून आजार आहे. त्याचीही तपासणी दोघांनी करणं उत्तम.
थॅलेसेमिया किंवा सिकल सेल अॅनिमिया असे आनुवंशिक आजारही उभयतां तपासणे उत्तम. कोणालाही आजार नाही हे जसं महत्वाचं तसंच कोणा एकालाच तो आहे हे समजणंही महत्वाचं. फक्त पत्नीला आजार असेल तर वेगळा सल्ला, फक्त पतीला असेल तर वेगळी मसलत आणि दोघांना असेल तर आणखी वेगळी सल्लामसलत देता येते. या तपासण्या दोघांनी करणे हा जर सोन्याचा कळस असेल तर अजिबात न करणे हा मूर्खपणाचा कळस आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे फक्त पत्नीने करणे हा सुवर्णमध्य नाही. हा फारफार तर ब्रॉन्झ-मध्य म्हणता येईल!!!
इतकंच कशाला, आईबरोबर बाबांनी स्वतःचं वजन, शुगर आणि ब्लडप्रेशरही तपासून घ्यायला काय हरकत आहे? बाळाला सडपातळ पण सुदृढ बाबा मिळायच्या दृष्टीने, हे कॉमन शत्रू तपासायची एक संधी आहे इथे. नकळत कोणी शत्रू दबा धरून बसला असेल तर त्याला नामोहरम करायची संधी आहे इथे. दिवस राहिलेत म्हटल्यावर आईच्या धूम्रपानावर आणि मद्यपानावर स्वाभाविकच बाबांची करडी नजर असणार. तीच करडी नजर जरा स्वतःकडे वळवण्याची संधी आहे इथे. तंबाखू, दारू, गुटखा वगैरेपासून लांब रहायच्या आणाभाका घ्यायची आणि बाळाच्या नावाने त्या पाळायची संधी आहे इथे. एकदा ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ म्हटल्यावर हे सगळं ओघानंच आलं.
स्वाइन फ्लूची लसही जोडीनं घेतलेली उत्तम. घरात इतर व्यक्ति असतील तर त्यांनीही त्या प्रेग्नंट बाई बरोबर ही लस घ्यावी. सगळ्या घराचीच हर्ड इम्युनिटी वाढलेली बरी.
सोनोग्राफी तपासणी जरी आईची असली तरी त्यावेळी बाबांची हजेरीसुद्धा एक छान अनुभव असतो. बाळाची नाळ आईशी थेट जुळलेलीच असते. बाबांची बाळाशी नाळ जुळण्यासाठी, सोनोग्राफीसारखी तपासणी नाही. सोनोग्राफीच्यावेळी बाबा हजर राहिले तर खूप एंजॉय करतील. यात बाळ इतकं मस्त दिसतं, कुणीही हरखून जावं, प्रेमात पडावं. बाळ मस्त मजेत पोहत असतं. हातपाय झाडत असतं, डोळे मिचकावत असतं, अंगठा चोखत असतं; डॉक्टरांनी तपासायला खूप वेळ लावला तर चक्क लांबलचक जांभईसुद्धा देतं बाळ. हे पाहून बापाला अगदी उचंबळून येतं. मेंदूत प्रोलॅक्टीन हॉर्मोनच्या रुपानी पितृवात्सल्याचे उमाळे फुटायला लागतात. लाभाविण प्रीती करायला शिकवणाऱ्या, कळवळ्याच्या जातीचा मूळ जैवरासायनिक झरा हा प्रोलॅक्टीन आहे. पण आपल्या समाजानी सोनोग्राफीचा लिंग निवडीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला की पितृवात्सल्य पान्हावणारी ही कुतूहल-खिडकी सरकारने बंद केली आहे. आता सोनोग्राफीवेळी कोणालाही आत यायला मज्जाव आहे.
इथे जसा मज्जाव आहे तसं प्रसूती कक्षातही मज्जाव आहे. आजकाल क्वचित कोणी नवरा अंगठ्याने जमीन उकरत उकरत, ‘डिलिव्हरीच्या वेळी मला आत येऊ द्याल का डॉक्टर?’, असं विचारतो. मी तोंड भरून होकार देतो. ऐन वेळी तो गायब होतो किंवा अन्य नातेवाईकांसमोर त्याला त्याचं म्हणणे रेटता येत नाही. अशी उपस्थिती खरंतर आईला खूप आधार देऊन जाईल. पण सांस्कृतिक आणि वैद्यकीय वातावरण त्याला पोषक नाही. एकूणच प्रेग्नंसी, डिलिव्हरी, हा प्रांत पुरुषांचा नाही अशीच समजूत घट्ट रुतून बसली आहे. एखादा जावई, सासुरवाडीत येऊन, सतत बाळबाळंतिणीच्या उशा पायथ्याशी बसून राहीला, तर त्याला बाजेचा पाचवा खूर, (कॉटचा पाचवा पाय) म्हणून हिणवण्याची प्रथा आहे ग्रामीण भागात. पण बाबांनी प्रसूती वेळीही आईजवळ थांबावं असं म्हणतात बुवा.
मानवी जन्म हा तसा रानटी आणि प्रथमदर्शनी भयावह मामला आहे. ज्यांना आपले पुरुषपण पक्वफळापरी सहजपणाने गळायला हवे असेल त्यांनी जरूर हा सोहळा अनुभवावा. एकदा चांगला, ‘अंगानं उभा न् आडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा’ असणारा शिपाईगडी, ‘माझ्या बायकोला खूप दुखतंय तिचं तात्काळ सीझर करा.’ म्हणून माझ्या पायाला मीठी घालून ढसाढसा रडला होता. काही केल्या त्याची समजूत पटेना. त्याची ती मगरमीठी सोडवेपर्यंत त्याची पत्नी डिलीव्हर झाली सुद्धा. काही नवऱ्यांना तर या दर्शनानंतर नैराश्य आल्याचीही उदाहरणे आहेत.
पण डिलिव्हरीला हजर राहू इच्छिणाऱ्यात ब्रम्हर्षी गुगलाचार्यांचे शिष्य फार. ते सतत शंका विचारतात, सूचना करतात, मोबाइलवरून तिसऱ्याच कुणाला धावते वर्णन सांगत बसतात, मांजरासारखे सतत पायात पायात येतात, काही म्हणजे काही सुचू देत नाहीत. हद्द म्हणजे त्यांच्या अमेरिकेतल्या डॉक्टरमावशीची ताजी राय काय आहे, हे इथे सुनावतात. हे जसे अतीउत्साही असतात तसे काही हतोत्साही असतात. पहिल्याच कळेला यांना अंधारी येते आणि हे बेशुद्ध पडतात. आई, बाळ आणि नवरा अशी तिघांना सांभाळण्याची कसरत डॉक्टरना करावी लागते.
शिवाय जे काही घडतंय ते योग्य का अयोग्य, नॉर्मल का अॅब्नॉर्मल हे ठरवण्याची पात्रता नवऱ्यात कशी असणार? नॉर्मल डिलीव्हरीच्या वेळी अर्धा लीटर रक्त सहज वहातं. बाह्यांगाला इजा होणेही बरेचदा नॉर्मल असते. पण बघणाऱ्याला हे महाभयंकर वाटू शकतं. होणारी धावपळ, गडबड, गोंधळ, आरडाओरडा हे अस्वाभाविक वाटू शकतं. त्यामुळे हलगर्जीपणाचे, निष्काळजीपणाचे नाहक आरोप होऊ शकतात. बाळात नंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही व्याधीचे मूळ जन्मावेळी झालेल्या आबाळीत शोधलं जाऊ शकतं. सध्याच्या वातावरणात हे किटाळ कोणत्या डॉक्टरला हवे असेल? त्यामुळे डॉक्टर अशा आगंतुकांच्या उपस्थितीबाबतीत अनुत्सुक असतात.
प्रसवेला आदरपूर्वक वागणूक मिळावी, तिचे अधिकार, तिचे स्वत्व, तिचा खाजगीपणा जपला जावा असे राष्ट्रीय धोरण सांगते. विश्वासार्ह, करुणाविस्तारी सोबती असेल तर क्लेशापासून सोडवून प्रसन्नवदने प्रसूती पार पडेल. पण ही सोबत नवऱ्यानी करावी का अन्य कोणी हा मामला अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मुळात आई, बाबा आणि व्यवस्था ह्याला धार्जिणी हवीत. हॉस्पिटलची रचनाही ह्या बदलाला स्वागतशील हवी. प्रत्येक जोडप्याची प्रायव्हसी जपली जाईल अशी सोय हवी.
पती अनेक गोष्टी करू शकतो. नुसत्या असण्याने किती तरी काम भागते. समजावणे, मानसिक, भावनिक आधार देणे, धीर देणे, हे तर तो सहजच करू शकतो. मसाज देणे, इकडे तिकडे फिरायला मदत करणे, तिच्यावतीनी डॉक्टरांशी बोलणे, हेही शक्य आहे. पण असं काही करायचं तर नवऱ्याची जय्यत तयारी हवी. आधीपासून पालक मार्गदर्शन वर्गांना जोडीने उपस्थिती, नीट माहिती, अभ्यास असं सगळं हवं. ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ ही उत्सवी घोषणा नाही. ती एक तपश्चर्या आहे. समानतेच्या समजुतीची, वागणुकीच्या व्रतस्थतेची एक शाब्दिक खूण मात्र आहे. ही प्रागतिक गुटी सगळ्यानाच गोड लागेल असं नाही. जगद्विख्यात बल्लावाचार्य रॅमसे गॉर्डनने स्पष्टपणे सांगून टाकले आहे, “त्या यातना, वेदना आणि बघू नये ते बघून उगाच मी माझे सेक्सलाईफ कायमचे संपवू इच्छित नाही!”.
आई होणे हा निश्चित बिंदु आहे, पण, ‘बापाचा जन्म’ हा तसा गोलमाल मामला आहे. आईच्या अंगातून निपजलेले बाळ आईच्या अंगावर पोसले जाते. बाळ आणि बाप अशी ओळख घडायला बराच काळ जावा लागतो. त्यामुळे बाबांना जय्यत तयारीची गरज आहे. बरेच वडील आता अशी तयारी करतात देखील. व्हरांड्यात येरझाऱ्या घालत बिड्या सिगरेटी फुंकण्यापासून, बाळाची नाळ अभिमानाने कापताना सेल्फी घेण्यापर्यंत आधुनिक बाबांची प्रगती झाली आहे. अॅप डाउनलोड करुन त्यावर बाळाची प्रगती मांडणारे, हौसेहौसेनी बाळाला पहिला लंगोट घालणारे आणि बदलणारे; थोडक्यात बाळाला अंगावर पाजणे वगळता सर्व काही करणारे बाप आहेत आता.
खरंतर या सगळ्या प्रकारात बापाचं स्थान तसं लेचंपेचं असतं. मातृत्वाची स्त्रीला खात्री असते पण पुरुषाला पितृत्वाची खात्री नसते. ही खात्री असावी म्हणून तर कुटुंबसंस्था आणि स्त्रियांना मर्यादेत ठेवणाऱ्या रूढी परंपरा आल्या. ह्या बेड्या तोडायच्या तर पितृत्व आश्वस्त करणारे नवे बंध हवेत.
‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ मध्ये हा नवा रुपबंध मला दिसतो.