इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा

चौदाव्या आणि पंधराव्या शतकात जगात तोफांचा बराच प्रसार होऊ लागला होता. मोठमोठय़ा तोफा बनवण्याची अहमहमिका लागली होती. त्यात बॉम्बार्ड नावाचा तोफांचा प्रकार प्रामुख्याने अस्तित्वात होता. या प्रकारच्या तोफा कॅनन आणि मॉर्टर या वर्गात मोडत आणि त्या मोठय़ा कॅलिबरच्या म्हणजे बॅरलचा व्यास खूप मोठा असलेल्या असत. त्यांचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या किल्ल्यांची आणि नगरांची तटबंदी भेदणे हा असे.

या प्रकारची झार नावाची महाकाय तोफ रशियात १५८६ साली बनवण्यात आली. झार फ्योदोर इव्हानोव्हिचच्या काळात तयार केलेली ही तोफ सध्या मॉस्को येथे क्रेमलिनच्या आवारात प्रदर्शित केलेली आहे. जगातील सर्वात मोठय़ा तोफांमध्ये तिची गणना होते. आंद्रे चोखोव्ह या डिझायनरने तयार केलेली ही तोफ ब्राँझची आहे. तिचे वजन ३९ टन असून आतील व्यास ८९० मिमी (३५ इंच) इतका आहे.

ऑटोमन तुर्क साम्राज्यात १४६४ साली लष्करी तंत्रज्ञ मुनीर अली याने बनवलेली दार्दानील्स गन किंवा ग्रेट टर्किश बॉम्बार्डदेखील अशीच मोठी आहे. तिच्यातून २४.८ इंच व्यासाचे तोफगोळे डागता येत असत. तिचे वैशिष्टय़ म्हणजे तोफेला स्क्रूसारखी रचना असून वाहतुकीच्या सोयीसाठी तिचे दोन भाग करता येतात. वापरताना पुन्हा स्क्रूसारखेदोन भाग एकत्र फिरवून बसवता येतात.

भारतातही मुघलांच्या काळात तोफांचा बराच विकास झाला होता. त्याच्या जवळपासच्या काळातील मलिक-ए-मैदान, मेंढा, कलाल बांगडी या तोफा प्रसिद्ध आहेत. मलिक-ए-मैदान किंवा मुलूख मैदान तोफ विजापूर येथे आहे. औरंगाबादजवळील दौलताबादच्या किल्ल्यावर मेंढा तोफ आहे. तर कोकणातील जंजिरा किल्ल्यावर कलाल बांगडी तोफ आहे. साधारण २२ टन वजनाच्या कलाल बांगडी तोफेने मुरुड-जंजिऱ्याच्या रक्षणात मोठी भूमिका बजावली होती. मेंढा तोफेच्या मागील भागावर मेंढय़ाचे तोंड आहे. ती तोफ १८० अंशांत फिरवून विस्तीर्ण प्रदेशावर मारा करता येत असे. पंचावन्न टनी मलिक-ए-मैदान तोफेच्या आवाजापासून वाचण्यासाठी तोफेला बत्ती दिल्यानंतर तोपचींना पाण्याच्या टाक्यांत उडय़ा माराव्या लागत.