एल्मर स्पेरी

जायरोकंपासचा (गायरोकंपास(Gyrocompass) शोध

जन्मदिन – १२ ऑक्टोबर १८६०

एखादी वस्तू आपल्या गुरुत्वमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती पुरेशा वेगाने फिरत असेल, तर तिला घूर्णी असे म्हणतात. विशेषकरून ज्याचा अक्ष कोणत्याही दिशेत वळू शकेल अशी बैठक दिलेल्या व ज्याच्या अक्षावरील एक बिंदू स्थिर असतो अशा चक्राला ही संज्ञा दिली जाते. इतर काही प्रेरणा न मिळाल्यास घूर्णीच्या अंगी आपल्या परिवलन अक्षाची दिशा टिकवून धरण्याचा गुण असतो.

इतिहास
अशा तऱ्हेचे फिरते चक्र प्रथम १८१० मध्ये बोननबर्गर यांनी बनविले. त्यानंतर १८३६ मध्ये एडवर्ड लांग यांनी एका प्रबंधात असे सुचविले की, अशा फिरत्या घूर्णीच्या साहाय्याने पृथ्वीच्या आपल्या आसाभोवतीचे परिवलन पडताळून पाहता येईल. यासंबंधीचा प्रत्यक्ष प्रयोग फूको यांनी पॅरिसमध्ये १८५२ मध्ये केला. घूर्णीविषयक संशोधनाला फूको यांच्या प्रयोगामुळे बरीच चालना मिळाली. याविषयीचे सैद्धांतिक विवेचन स्विस गणिती ऑयलर यांच्या ग्रंथात भरपूर केलेले आहे. घूर्णी परिणामाच्या काही प्रासंगिक उपयोगांखेरीज अनेक वर्षे घूर्णी ही केवळ कुतूहलजनक वस्तूच मानण्यात येत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घूर्णीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधी प्रयत्न सुरू झाले व या दृष्टीने एल्मर स्पेरी यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. या प्रयत्नातूनच स्पेरी जायरोस्कोप कंपनीची स्थापना झाली. या कंपनीतर्फे जहाजे व विमाने यांना लागणाऱ्या अनेक प्रकारच्या यंत्रणांत उपयुक्त असणाऱ्या घूर्णी प्रयुक्त्या तयार करण्यात येतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत घूर्णीच्या उपयोगास मोठी चालना मिळाली व हळूहळू अनेक प्रकारच्या यंत्रणांमध्ये घूर्णीचा समावेश करण्यात येऊ लागला.