🤔 कुतूहल 🤔
🎯 सहावा वस्तुमान लोप
पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मिती काळापासून सुरुवात केली तर पृथ्वीवरील जीवांना आत्तापर्यंत एकूण पाच वेळा ‘वस्तुमान लोप’ या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्याला केवळ नैसर्गिक कारणे होती. आता सहावा नामशेष/ वस्तुमान लोप होऊ घातला आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वस्तुमान लोप म्हणजे पृथ्वीवरील अनेक प्रजातींचा अगदी कमी काळात विनाश होणे अथवा त्या नामशेष होणे. खरे म्हणजे गेल्या काही दशकांतील वन्यजीवांच्या प्रजातींचा विनाश पाहता सहावा मोठा नामशेष येऊ घातला आहे हे पटते. अर्थात यामध्ये मतमतांतरे आहेत.
पहिला नामशेष ४४३ दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या एकूण प्रजातींच्या ८५ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. दुसरा नामशेष आला ३७४ दशलक्ष वर्षांपूर्वी, ज्यात ७५ टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यानंतरचा वस्तुमान लोप २५० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यात ९५ टक्के इतक्या प्रजाती नष्ट झाल्या. चौथा नामशेष झाला २०० दशलक्ष वर्षांपूर्वी ज्यामध्ये ८० टक्के प्रजाती नष्ट झाल्या, परंतु डायनोसोरची भरभराट झाली. १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी, आलेला पाचवा वस्तुमान लोप ७६ टक्के इतक्या प्रजातींना नष्ट करून गेला. ज्यामध्ये डायनोसोर नाहीसे झाले परंतु सस्तन प्राण्यांची भरभराट झाली.
भूशास्त्रीय कालश्रेणीवर आत्ताच्या युगाला ‘होलोसीन’ अथवा ‘अन्थरोपोसीन’ असे संबोधले जाते ज्यामध्ये सगळीकडे मानवाचे वर्चस्व दिसते. सध्याचा प्रजाती नामशेष होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या प्रजाती नामशेष होण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत १००-१००० पटीने जास्त आहे. ही प्रजाती तयार होण्याच्या आणि नष्ट होण्याच्या प्रमाणातील तफावत अनेक कारणांमुळे आहे. जागतिक वन्यजीव निधी या संस्थेनुसार गेल्या ४० वर्षांत पृथ्वीवरील अध्र्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. माणसाला पर्यावरणीयदृष्टय़ा अभूतपूर्व असा ‘जागतिक सुपर प्रिडेटर’ असे संबोधले आहे. प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर, वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक अधिवासाचा गरवापर, प्राण्यांची शिकार, वातावरणबदल, प्रचंड प्रमाणातील जंगलतोड, खाणकाम, कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमानवाढ.. अशा अनेक गोष्टी या येणाऱ्या वस्तुमान लोपासाठी, प्रजातींच्या नामशेषासाठी कारणीभूत आहेत.
🖊 डॉ. नीलिमा कुलकर्णी office@mavipamumbai.org
➖➖➖➖➖➖➖