‘कुलामामाच्या देशात’ एक अदभूत वन कथा संग्रह
———————————————–
लेखक: जी बी देशमुख

पृष्ठ:१३५ मूल्य:२००/ टपाल:३५/ एकुण:२३५/

मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले “कुलामामाचे देशात “हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला.

अमरावतीचे प्रसिध्द साहित्यीक तथा केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे वरीष्ठ अधिकारी श्री जी. बी. देशमुख यांनी त्यांचे मित्र वन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री. रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याने त्याच्या मेळघाटातील १७ वर्षाचे सेवाकाळात कीरss जंगलात अनुभवलेल्या चित्तथरारक घटनांवर आधारित हा वन कथासंग्रह आहे . श्री. रविंद्र वानखडे या ज्येष्ठ वन अधिकाऱ्याचे प्रत्यक्ष अनुभवाचे श्री. जी. बी. देशमुख यांनी केलेले लेखांकन वाचकाचे मानवी मनाला मेळघाटातील हिंस्त्र पशू प्राण्यांचे, पक्ष्यांचे व तेथील आदिवासींचे दैनंदिन जगणे याचे डोळ्यांसमोर जीवंत दर्शन प्रत्यक्ष साकारणारे आहे.

श्री.रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याची महत्तम सेवा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात गेली . भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक तथा प्रसिध्द साहित्यीक श्री. डाॅ. मारूती चितमपल्ली हे मेळघाट मधून वनाधिकारी म्हणून बदलून गेल्यावर श्री रवींद्र वानखडे यांनी त्याचा प्रभार घेतला होता असे कळते. मेळघाटात कोरकू व गवळी ही आदिवासी जमात मुख्यतः वसलेली आहे मात्र त्यात ‘कोरकू’ चे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे.

मेळघाट हा नैसर्गिक वनश्री सौंदर्याने नटलेला परिसर विस्तीर्ण पसरलेला आहे . सुंदर वनश्री मनाला प्रसन्न करणारी असली तरी हिंस्त्र पशूंचे अस्तित्वांमुळे तितकीच भयावहही आहे . विस्तीर्ण जंगलातील दऱ्या खोरे, डोंगरातील दाट वृक्षाचे सोबतीला तापी सिपना नदींचे खळखळणारे विस्तीर्ण पात्राचा मनमोहक नजारा नेत्रसुखद असला तरी हिंस्त्र पशूचे वावरामुळे तितकाच थरारकही आहे . हिंस्त्रपशु निशाचर असले तरी दिवसासुद्धा त्यांची भिती भयावह व काळीज चिरणारी आहे.
वाघ,अस्वल, रानगवा, बिबटे, सांबार , रानकुत्रे इत्यादीं तत्सम जंगली पशुंचा मुक्त संचार तेथे असताना त्याभागातच कोरकू जमातीचे वास्तव्य व दैनंदिन जीवन जगताना त्यांना वाघा सारखे हिंस्त्र पशुचे दर्शन व सानिध्य हि नित्याची व सर्व साधारण बाब आहे.
कोरकूचे भाषेत ‘कुला ’ म्हणजे वाघ . कोरकू लाडाने वाघाला ‘मामा’ म्हणतात.

उन्हाळा संपला की पावसाळ्यात या जंगलात हिरवीगार नटलेली वनश्री , कधी कधी गारांचा वर्षाव झाला की गावे हिम चादरीखाली झाकली जातात ,असा हा सुखद नजारा देणारा मेळघाट हा जंगल प्रदेश आहे.
‘कुलामामाच्या देशात ‘ हा लेखक श्री जी.बी. देशमुख यांनी लिहीलेला ग्रंथ एक वनानुभवाचा कथासंग्रह आहे. या संग्रहात वाघा शिवाय रानगवे , रानकुत्रे , हत्ती यांचे अस्तित्व जाणवून त्यांचा जंगलातील विहार, जगण्यासाठी भक्ष्य शोध, वावरत असतानाचे प्रत्यक्ष अनुभव वनाधिकारी श्री रवींद्र वानखडे यांनी ‘ याची देही याची डोळ्यां ‘ जीव मुठीत घेत छाती उदार करून टिपलेले प्रसंग व त्या प्रसंगातील घटनांचे वर्णन श्री. जी. बी. देशमुख यांनी कुलमामाचे देशात या अनोख्या शिर्षकी पुस्तकातून त्या २५ कथास्वरूपात शब्दबद्ध केलेले आहेत.
कथासंग्रहातील अदभूत आनंद देणार्‍या सर्व २५ कथा वाचनीय आहेत. त्यातील लेखकाची बोलकी कथनशैली, जंगल सफारी चा थरार वाचकास खिळवून ठेवणारा व आवर्जून लक्षात राहील असाच आहे.
प्रसिध्द साहित्यीक श्री जी.बी. देशमुख यांना लेखनाचा चांगला सराव आहे. विविध मोठे वृत्तपत्र आणि फेसबुक माध्यमातून नियमितपणे त्यांनी केलेलं लेखन अप्रतिमच असते यात दुमत नाही . त्यांचे वडिलांचे जीवनावर आधारित महारूद्र, पप्पूच्या पुड्या, प्राॅमिसलँड , गोष्ट महानायकाची, अ-अमिताभचा हि त्यांची साहीत्य संपदा वाचून हे लक्षात येतेच.
“कुलामामाचे देशात” या ग्रंथात लेखकाने
श्री. रवींद्र वानखडे यांचे वनानुभव खास वऱ्हाडी शब्दात सोपे व सरळ लेखनशैलीत मांडले आहेत. जंगलातील आदिवासींचे जगणे त्यांचे रितीरिवाज या वरही त्यांनी प्रकाश टाकला आहे त्यातून बरीच नावीन्यपूर्ण माहिती वाचकास मिळते.

वाघाची शिकार पद्धत, त्याचे जंगलात नैसर्गिक जीवन ,जमीनीवर वाघांचे पंजाच्या उमटलेल्या ठशावरुन वन कर्मचाऱ्यांची वाघाची गणना करण्याची अनोख्या पद्धतीची माहिती अदभूत आहे.
दुसऱ्या प्राण्यानं केलेली शिकार, वाघ स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही , हा समज , रानकुत्र्यांनी पाण्यात उतरलेल्या एका सांबराची शिकार करण्यासाठी रात्रभर पाळलेला संयम ,त्यातून रानकुत्र्यांच्या सवयी आणि शिकारीच्या शैलीबद्दल ग्रंथातील बरीच माहिती ज्ञानवर्धक आहे. भोलाप्रसाद या मदांध हत्तीला त्याच्या माहुताचे हत्येचा पश्चात्ताप, त्या मदांध अवस्थेतही त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा शोक ग्रंथ वाचतांना मानवी हदय हेलावून जाते.
मेळघाटच्या जंगलाची वैशिष्ट्ये,व आदिवासींचे सान्निध्यात हिंस्त्र प्राण्याची जीवन पद्धती व त्या माहोल मध्ये वन अधिकाऱ्यांची जीवावर उदार होत जंगलातील सेवेचा थरार याची रोचक मांडणी हे या ग्रंथाचे यश आहे.

पुस्तकावरील अन्वर हुसेन यांनी रेखाटलेले वनाचे नैसर्गिक रंगात व विशीष्ठ चित्रशैलीतील मुखपृष्ठ आकर्षक व मनोवेधक आहे. आतील चित्रे पण बोलकीच आहेत.
लेखक श्री जी. बी. देशमुख यांचे कुलामामाचे देशात या ग्रंथाचे कौतुकास्पद समिक्षण विवीध लेखकांकडून भरभरुन तर होतच आहे परंतू लोकसत्ता सारखे महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्राने त्या ग्रंथाची दखल घेऊन श्री मंगल कातकर यांनी केलेले समीक्षण निश्चितच लेखकासोबतच साहित्य नगरी अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे याचा उल्लेख करावाच लागेल.
प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावे. मेळघाटातील थरारक जंगल सफारीचा एक अदभूत आनंद वाचकास मिळेल याची मला खात्री आहे.

—-वा पां.जाधव