मुलं घरात आहेत तर त्यांना कसं रमवायचे पालकांना हा प्रश्न पडलेला आहे. मला वाटतं की पालकांनी मुलांना रमवायची जबाबदारी घेऊ नयेच. यामुळे पालकांचा ताण वाढतो आणि मुलं त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतात.

मुलांना भरपूर वेस्ट सामान पुरवा. उदा. जुन्या ओढण्या, बेडशीट, पुठ्ठ्यांचे लहान मोठे बॉक्स, रद्दी, कात्र्या, वेगवेगळे दोरे इ. इ. ( तयार खेळणी अजिबात देऊ नका). त्यांना त्यांच्या खेळात वेगळ्या गोष्टी लागू शकतील त्याही त्यांना घेऊ देत. आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागा. आई, बाबा मी काय करू या प्रश्नांकडे दुर्लक्ष करा. दुर्लक्ष करणं हे तुमचं कसब असणार आहे. मूल कंटाळून रडेल,तुमच्या पासून लांब जाईल आणि त्याच्या उपजत स्वभावानुसार पडलेलं सामान हाताळायला लागेल आणि हळू हळू रमून जाईल. ज्या गोष्टी मुलांनी घेऊ नयेत असं वाटतं त्या त्यांच्या नजरेपासून लांब ठेवा.

मुलांना तुम्ही किती स्वतः वर अवलंबून ठेवलं आहे तितकं त्याला स्वतः रमण्यामध्ये वेळ लागेल. पण मूल रमेलच. पसारा होईल ही भीती लगेच वाटणार आहे. त्यासाठी त्यांना एक जागा देऊन टाका आणि पसारा आवरायचा असतो हेही सांगा. बऱ्याचदा असं होतं की मूल काहीतरी प्रोसेस करत असतं. ती काही तासांची असेल किंवा त्याला दोन तीन दिवसही लागतील. आपल्याला जो पसारा वाटतो तो त्याच्या प्रोसेस चा महत्त्वाचा टप्पा असू शकेल. त्याचा मान ठेवा.

मुलांना पपेट न समजता एक पूर्ण माणूस समजा. त्याला व्यक्तिमत्व आहे, विचार आहेत आणि स्वतः ची वेगळी सृजनशक्ती आहे. त्या सगळ्याचा मान ठेवा.

यामुळं मुलं स्वतः रमतील आणि तुम्ही मोठे पण सुटे व्हाल.

C&p