“घराने करायचा धमाल अभ्यास”

आता सुटी सुरू होणार. म्हणजे शाळेतल्या अभ्यासाला सुटी आणि धमधमाल, मस्तममस्ती करत शोधाशोधीच्या गृहपाठाला सुरुवात.

हा सुटीतला गृहपाठ घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचा आहे. घरातले सगळे म्हणजे, आई, बाबा, भाऊ, बहिणी, गुगल काकू, गुगलबाबा आणि घरातील सगळ्यांचा आवडता नातेवाईक ‘स्मार्ट फोन’ यांचा सगळ्यांचा मुक्त सहभाग हवा. आपल्या कुटुंबात नव्यानेच येत असलेले ‘श्री. चॅट जिपिटी आणि त्यांचे नातेवाईक एआय’ यांची पण मदत बिनधास्त घ्या.

हा ‘गृहपाठ’ नवीन शोधण्याचा, हसण्याचा, मस्तीचा, मजेचा आणि इतकंच काय तर काहीवेळा खतरनाक निरर्थक पण आहे!

आणि हो.. यातील काही गोष्टी तुम्ही केल्यावर, शोधल्यावर, लिहिल्यावर आम्हाला जरुर कळवा आणि तुमच्या मस्तामस्ती मजामजीत आम्हाला ही सहभागी करुन घ्या.

01. तुमच्या घरात सिलिंग फॅन तर आहेच. तो घड्याळ्याचा दिशेने फिरतो की विरुध्द दिशेने? हे तुम्ही कसं शोधाल? सिलींग फॅन आणि टेबल फॅन एकाच दिशेने फिरतात की वेगवेगळ्या? का? दोघांच्या रचनेत मूलभूत फरक काय आहे? काढा शोधून. करा प्रयोग.

02. स्वयंपाक करताना तेल तापलं आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोहरीच का घालतात? जिरं का घालत नाहीत? मला खात्री आहे याचं उत्तर घरातील ज्येष्ठ गुगलकाकू सांगू शकतील.

03. तुम्हाला घरातील इंटीरीयर पूर्णपणे बदलायचं आहे. अगदी वाट्टेल तस्‍सं बदलायचं आहे.. म्हणजे स्वयंपाक घरात वॉशिंग मशीन ठेवायला आणि मिक्सर बेडरुममधे ठेवायला पूर्ण परावानगी आहे.. पण हे सर्व फक्त कागदावरच! त्यासाठी घरातील सगळ्या वस्तूंची मापं काढा. लांबी, रुंदी आणि ऊंची. मग घराचा नकाशा. आणि आता या घरातल्या नकाशावर ठेवा तुमच्या वस्तू तुम्हाला हव्या तिथे. खोली मोठी करायची असेल तर कागदावरच्या भिंती सरकवायला किंवा पाडायला परवानगी आहे. हे तुमचे इनोव्हेटिव्‍ली रिनोव्हेटेड घर पाहायला आम्हाला आवडेल.

04. 13 सुंदर निरर्थक वाक्यांची एक मस्त निरर्थक गोष्ट तयार करा. म्हणजे वाक्यांना काडीमात्र अर्थ नको पण गोष्ट मात्र ‘मस्त निरर्थक’ असावी. करा सुरुवात.

05. प्राणी आणि पक्षी यांच्या तुम्हाला माहित नसलेल्या किमान 39 गोष्टी शोधा. शक्य असल्यास आम्हालाही कळवा. (उदा. मुंगीला दिसत नाही. डासाला सोंड असते. माशीला 2000 डोळे असतात.)

06. दिवसभरात तुम्ही किती वेगवेगळे आकार वापरता याची किमान ती दिवस नोंद ठेवा. (उदा. गोल, चौकोन, आयत, शंकू, पट्टी, गोल-आयत, लंबगोल-पट्टी इ.)

07. 26 नवीन उपमा शोधा. कृपया यासाठी ‘गुगुल परीवारातील’ कुणाची मदत घेऊ नका ते हॅंग होतील. अपना दिमाद लगाओ और हमे बताओ. (उदा. दहीभात म्हणजे हिमालय. निळा नाइट लॅम्प म्हणजे निळी पणती.इ)

08. सायकल चालवता येत नसेल तर ती शिका. सायकल येत असेल तर, गावातल्या किमान 13 अनोळखी रस्त्यांवरून फेरफटका मारा. नवीन रस्ते शोधा. गावाची, शहराची ओळख करून घ्या. सर्वांनी मिळून ‘सायकल ट्रिप’ काढा. आम्हालाही कळवा.

09. हिंगाची डबी उघडल्यावर येणार्‍या वासाचं नाव काय? जीरं हातावर भरडल्यावर येणार्‍या वासाचं नाव काय? ग्लुकोज बिस्किट आणि मोनॅको बिस्किट या दोघांचा वास वेगळा आहे? अशा वेगवेगळ्या 26 वासांची नवीन नावं तयार करा. (उदा. ताज्या गुळाचा गोडगिट्ट वास. गुळाच्या पाकाचा गुळमट वास.)

10. तुम्हाला किती रंगांची नावं माहित आहेत? आमच्या इयत्ता तिसरीतल्या मुलांनी 91 रंगांची यादी तयार केली. उदा. पांढर्‍या काचेचा रंग पाण्यासारखा असतो, म्हणजे पाणी कलर. शेजवान कलर. ओरिओ कलर. काळपट हिरवा, निळसर गुलाबी. इ. नवीन रंगांची किमान 39 नावे शोधाच.

11. तुम्ही सगळे खवय्ये आहातच. इडली सोबत मिळणारी लाल चटणी, हिरव्या मिरचीची डाळं घातलेली चटणी आणि गनपावडर चटणी चवीला वेगवेगळीच. म्हणजे कशी हो? वेगवेगळ्या चटण्या, पाणीपुरीचं पाणी, जिलबी, मसालेभात, बिर्याणी उफ्! अशा किमान 117 गोष्टी आपण चवीचवीने खात असतो, त्यापैकी फक्त 39 पदार्थ आणि त्यांच्या चवीचे नाव सांगा बरं. (उदा. दुधाळ कॉफी. लसणीची चरचरीत फोडणी. हिंगुट वास पुढे आल्याने चिवडा समसमीत झालाय)

12. आता इतक्या पदार्थांची उजळणी केल्यावर जीभ खवळणार! भूक कडाडणार. मग खूप खाल्‍लं तर पोट बिघडणार. भूक लागल्यावर आणि खाऊन खाऊन पोट बिघडल्यावर, तुम्ही तुमची अवस्था सांगण्यासाठी जर वेगवेगळे 39 शब्द वापरत असाल तर तुम्ही खरे खवय्ये! (उदा पोटात कळमळतंय. कावळे ओरडत आहेत. पोट घुसघुसतंय. इ) आणि हो, तुमच्याकडे 39 पेक्षा जास्त शब्द असतील तरच आम्हाला कळवा.

13. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत ‘कपडे मळणार नाहीत’ याची काळजी घ्या.

14. घरामधील वेगवेगळ्या वस्तूंमधील अंतर मोजण्यासाठी वेगवगेळी 26 परिमाणं वापरा. त्याचा एक चार्ट तयार करा. (उदा अंतर मोजण्यासाठी, पट्टी, काठी, ओढणी, रुमाल, घरातल्या सगळ्यांची पावलं, चमचे अशा गोष्टींचा उपयोग करा.) हे काम घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचं आहे.

15. तुम्हाला ‘म’ ची भाषा माहित आहे का? उदा. तुमम्हाला ममची भामषा मामहित आमहे काम? आता तुम्ही तुमची नवीन सांकेतिक भाषा तयार करा. आणि चक्क दिवसभर सगळ्यांशी याच भाषेत बोला पण त्यावेळी इतरांचा होणारा गोंधळ समजून घ्या.

16. सर्वांच्या घरात किमान 117 काटकोन असतातच. तुमच्या घरात किती आहेत? मोजा. तुम्हाला तुमच्या घरातच लपलेले 169 काटकोन सहजच मिळतील.

17. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 13 मिनिटं खिडकीत उभे राहा. 13 मिनिटांपैकी 9 मिनिटं डोळे बंद ठेवा. ऐकू येणारे आवाज लक्षात ठेवा. 13 मिनिटात शक्यतो 27 आवाज ऐकू येतात. तुम्हाला किती ऐकू आले? ते लिहा. असं किमान तीन वेळा करा. नंतर खिडकीत जाण्याआधीच तुम्ही आवाजाचा वेध घेऊ शकाल.

18. आज दिवसभर बोलताना घरातल्या सर्वांनी ‘यमकोगिरी’ करायची आहे. काही बोलताना ‘यमक’ वापरायचं.. अर्थपूर्ण किंवा निरर्थक.. पण यमक हवेच! घरात होणारी दे धमाल अनुभवा. (उदा. आई मला पोळी, ती पण पुरणाची पोळी. पोळीवर तूप, खूप खूप)

19. आकाश कुठे संपतं आणि अंतरीक्ष कुठून सुरु होतं? हे शोधून काढा.

20. ससा का चालत नाही आणि झुरळ का मागे वळत नाही? हे शोधून काढा.

21. ‘दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो’ असं तुम्ही ऐकलं असेल. पण आपल्या काश्मिरमधे दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतच नाही. तिथे सूर्य डोक्यावर कधी येत असेल की येतच नसेल? तुम्हाला काय वाटतं?

22. कणिक, रवा आणि मैदा हे गव्हापासूनच तयार करतात. तर या तिघांचे गुणधर्म एकच आहेत की वेगवेगळे? का? चला शोधा.

23. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.

24. या सुटीत वेगवेगळ्या फळांच्या बिया जिथून मिळतील तिथून जमवा. साफ करुन ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बीया डोंगरावर, बागेत किंवा रस्त्याच्या बाजूला रुजवण्याचा प्रयत्न करा.

25. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.

26. ‘आई’ या शब्दासाठी किमान 39 भाषेतले शब्द शोधा. पाहून लिहा. यासाठी घरातल्यांची, शेजार्‍यांची तसेच गुगलबाबा, चॅटजिपीटी यांची मदत घ्या.

27. आता तुम्हाला वेगळ्या भाषेतले समानार्थी शब्द शोधण्याचा चांगला सराव झालाच आहे. आता तुम्ही तुमचे स्वत:चे नाव वेगवेगळ्या 13 भाषांत कसे लिहितात ते शोधा आणि पाहून लिहा. मग ते मित्र मैत्रिणिंना दाखवा.

28. प्रत्येक फळ कापण्याची पध्दत वेगळी असते आणि ती प्रयत्‍नपूर्वक शिकावी लागते. या सुटीत आंबा, कलींगड, पपनस, टरबूज, पपई, फणस, अननस अशी फळे वेगवेगळ्या पध्दतीने आवर्जून कापा आणि ‘कापण्यातली गोडी’ अनुभवा.

29. दूध गरम करणे, उकळणे, आटवणे, नासवणे, अती थंड करणे, विरजणे, पावडर करणे यांचे खूप फायदे आहेत ते कोणते? दूध वापरुन केलेल्या पदार्थाची एक रेसिपी सांगा पाहू.

30. हे वेगवेगळे 13 पदार्थ कशा-कशापासून तयार होतात : डोसा, इमरुती, केक, सोलकढी, उंधियो, सुतरफेणी, पेठा, बकलावा, संदेश, पास्ता, जॅम, बटरस्कॉच आईसक्रिम, मणगणे.

31. आईच्या आणि बाबांच्या मदतीने “आमच्या खास रेसीपी” असे तुमच्या कुटुंबाचे चमचमीत रेसिपी पुस्तक तयार करा. या पुस्तकातील पदार्थांचे फोटो, रेसीपी आणि पदार्थांची वर्णनं अशी लिहा की शेजार्‍यांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. मग फोटो अपलोड करून त्याचे इ-बुक करा. ते सगळ्यांना सेंड करा. वाचणार्‍यांच्या जीभा खवळल्या पाहिजेत.

32. सेल्फी काढा पाच बोटांनी : एखाद्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर घरातल्या आरशासमोर खुर्ची घेऊन बसा. थोडावेळ निवांतपणे स्वत:ला पाहा. स्वत:कडे पाहा. मग आरशात पाहून स्वत:चेच मस्त चित्र काढा. चित्राखाली नाव न लिहिता ‘चित्रातील व्यक्ती’ तुमच्या घरातल्यांना, शेजारच्यांना किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना ओळखता येते का पाहा.

33. घराजवळील किराणामालाचे दुकान, औषधाचे दुकान, दवाखाना, डेअरी अशा कुठल्याही ठिकाणी दिवसांतून एक तास मदत करण्यासाठी जाता येईल. यासाठी घरातील मोठ्या माणसांच्या मदतीने प्रयत्‍न करा. खूप वेगळं पाहण्याचा आणि शिकण्याचा जाणीवपूर्वक अनुभव घ्याच.

34. आठवड्यातून एक दिवस किमान एक वेळ तरी आईसोबत स्वयंपाक घरात काम करायचेच आहे. मग होणार्‍या गमती आम्हाला कळवायच्या आहेत.

35. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचाच वापर करा. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही एक चित्र काढा / आकृती काढा / ठिपक्यांची रांगोळी काढा व त्यात रंग न भरता त्यात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, सुक्या फुलांचा चुरा, गवत, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, शेंगांची टरफले, प्लास्टीकचे तुकडे, चहाचा चोथा इ. हे फोटो आम्हाला इ-मेलने पाठवा.

36. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक पुस्तके आता बाजारात किंवा वाचनालयात उपलब्ध आहेत. ती मिळवा. किंवा नेटवर www.arvindguptatoys.com ही साइट पाहा. इथे विज्ञानाचे हजारो प्रयोग आहेत. हे सोपे प्रयोग स्वत:हून करा. त्यातील मजा अनुभवा.

37. ज्या दुकानात पंखा, इस्त्री, मिक्सर दुरुस्त करतात अशा दुकानात जा. दुकानदाराच्या परवानगीने दुकानात सुरू असणार्‍या कामाचे ‘शांतपणे’ निरीक्षण करा. मग दुकानदाराच्या सोयीच्या वेळात त्यांची परवानगी घेऊन त्यांना प्रश्न विचारून नवीन गोष्टी शिकून घ्या.

38. तुमच्या जवळच्या मित्रांना एका संध्याकाळी घरी बोलवा. कुणी काय करायचे याचे नियोजन करुन, सर्वांनी मिळून चटकदार ओली भेळ करा आणि तुमच्या पालकांना खिलवा. ही ‘खिलवा खिलवी’ मग सर्वच मित्रांच्या घरी करा.

39. गाजर, काकडी, मुळा, टॉमेटो, बीट किंवा कोबी यांची कोशींबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातलेच काय शेजारी पण आनंदाने खातील.

खरं म्हणजे तुम्हाला रोज एक गोष्ट करता यावी, असा विचार करून मी तुम्हाला 52 गोष्टी सांगणार होतो. पण मी अचानक विचार बदलला. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, या जरी 39 गोष्टी असल्या तरी त्या काही रोज फक्त एकच करायच्या गोष्टी नाहीत. यासाठी नक्कीच तुम्हाला जास्ती दिवस लागतील. आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी मीच का सांगाव्यात? ‘तुम्ही सर्जनशील आहात’ यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आणखी भन्नाट गोष्टी शोधून काढा. नवनवीन गोष्टी करुन पाहा, शिका आणि एनजॉय करा… आणि हे सारं मला ही कळवा.

मी तुमच्या ‘सर्जनशील एनजॉयमेंट’ पत्रांची वाट पाहतोय.

……………………………………………………………………………..

– राजीव तांबे

– rajcopper@gmail.com

ArvindGuptaToys Books Gallery

arvindguptatoys.com

ArvindGuptaToys Books Gallery

ArvindGuptaToys.com. Gallery of Books And Toys courtesy Arvind Gupta the Toy Maker. Have fun and learn through Toys and Books. Page by Samir Dhurde

View insights

334 post reach

All reactions:

3Anil Sonune, Vijay Yenare and 1 other

Like

Comment

Send

Share

Comment as Swarda Khedekar Gawade

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Facebook

Active

Swarda Khedekar G