घरच्या घरी (भाग पाच)
– वर्षा सहस्रबुद्धे
Varsha Sahasrabuddhe
(ही लेखमाला द फर्स्ट थ्री इंस्टीट्यूट फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केली जात आहे. जून २०२०)
अंदाज करणं, कायकाय लागेल याचा विचार करून तयारी करणं, क्रमानं एकएक गोष्ट करत जाणं, जराशी वाट पाहणं, नेटानं नंतरची आवराआवरी करणं, आपण कष्टानं आणि प्रेमानं केलेलं काहीतरी सगळ्यांना हवंय-आवडतंय हे पाहणं या सगळ्याला एखादा पदार्थ करताना पुरेपूर वाव मिळतो.
एखादा पदार्थ करताना वर्गातल्या प्रत्येकाला सहभागी करून घ्यायचं, तर आम्हा शिक्षकांना जंगी तयारी करावी लागते! सबंध वर्गासाठी किती सामान लागेल आणि कोण काय आणेल याच्या याद्यांपासून, वर्गाची बैठकव्यवस्था कशी करायची, मुलांना सूचना काय द्यायच्या, एकाला काम करायला पुढे बोलावलं तर तोपर्यंत बाकीची मुलं काय करतील, स्वच्छता पाळण्यासाठी काय दक्षता घ्यायला लागेल, हे सगळं अभ्यासविषयांशी कसं जोडून घ्यायचं, त्या दिवशी वेळापत्रकाचं नियोजन कसं करायचं इथपर्यंत अनेकानेक बाजूंनी विचार करावा तेव्हा कुठे एक पदार्थ करून होतो!
घरी स्वयंपाकघर आणि सामान असतंच. लागणारं बहुतेकसं साहित्यही सहज उपलब्ध असतं. एक-दोन मुलांना सामावून घेऊन पदार्थ करताना लक्ष ठेवण्याचा ताण येत नाही. जे करतोय त्याबद्दल करताकरता सहज बोलता येतं. असं असल्यामुळे मुलांना अगदी रोज, किमान दिवसाआड एखादा पदार्थ करायला मदतीला घ्यायला काहीच हरकत नाही. त्यातून खूप गोष्टी शिकण्याशी जोडता येतील.
बालवाडी आणि पहिलीच्या वयोगटासाठी:

या वयोगटाचा विचार करताना पाहिली पायरी म्हणजे ज्यासाठी गॅसचा वापर करावा लागणार नाही अशा पदार्थांची, कृतींची आपण एक यादी करणं!
गाजर, काकडी, मुळा, बीट मुलांना किसायला द्या. त्यांचा रंग कोणता आहे, आकार कसा आहे, बाहेरून आणि आतून या भाज्या कशा दिसतात याबद्दल बोला, रस कशाचा जास्त गळला, वास कशाचा लगेचच आला, कशाची चव कशी आहे याकडे लक्ष वेधा. बिटाचा रंग वापरून थोडी मजाही करूदे… रंग हाताला, गालाला, नाकाला लावून आरशात बघूदे!
कणिक भिजवली, की मुलांना पोळीसाठी गोळे करायला द्या; वरण-भातासाठी डाळ-तांदूळ धुवायला द्या; भात, पोळी, भाकरी, आमटी हे पदार्थ करण्यासाठी काय काय वापरतात – कोणता पदार्थ करताना कुकर लागतो, कोणता पदार्थ करण्यासाठी कढई लागते, काय करताना तवा वापरतात अशा गप्पा मारा.
लिंबू सरबत स्वतः करून प्यायला आवडत नाही, असं एकही मूल मला गेल्या तीस वर्षात भेटलेलं नाही! लिंबू पिळणं, मोजून साखर-मीठ घालणं, ढवळणं आणि मिटक्या मारत सरबत पिणं हे अगदी रोज मुलांनी करावं! घरातल्या इतरांसाठीही सरबत करून, हळूच पेल्यात ओतायला आणि न सांडता त्यांना नेऊन द्यायलाही शिकावं. अशा गोष्टी करताना मुलं एकाग्रतेनं काम करण्याचा अनुभव घेतात. डबाबंद पेयांना असलेला आरोग्यकारक पर्याय अनुभवतात.
आपण जे केलं, त्याचं चित्र काढायला मुलांना आवडतं. आठवडाभरासाठी एका भिंतीवर किंवा दारावर एखादा मोठा कागद लावून ठेवा. काय केलं त्याची चित्रं मुलांना त्यावर काढूदे. अनुभवाशी जोडून आपल्या मनानी काढलेलं चित्र म्हणजे जगाबद्दल आपल्याला काय समजलंय, आपल्याला काय वाटतंय याबद्दल मुलांनी केलेलं विधान असतं. जे वाटतं ते मांडता येतं, आपल्याला काहीतरी म्हणता येतं, ते म्हणायचं असतं या विचाराचं बीज या साध्याशा वाटणाऱ्या कृतीतून पेरता येतं. मात्र, ‘आता असं काढ.’ ‘हॅ! हे असं दिसतं का!’ ‘हे असं रंगव.’ अशा सूचना मुलांना न देणं महत्त्वाचं.
दुसरी ते चौथीच्या वयोगटासाठी:
बालवाडीच्या वयोगटासाठी सुचवलेल्या सगळ्या गोष्टी या मुलांना देता येतीलच. शिवाय वाढती समज आणि कौशल्यं विचारात घेऊन आणखीही काही गोष्टींचा समावेश करता येईल.
मुलांनी काही मागितल्याक्षणी, किंबहुना, मागायच्याही आधीच त्यांना ते देण्याच्या आणि सगळंच दुकानातून विकत आणण्याच्या सध्याच्या युगात मुलं ज्या मूलभूत गोष्टींना मुकतात, त्यापैकी काही गोष्टी म्हणजे मूलभूत प्रक्रिया स्वतः अनुभव घेता घेता समजून घेणं, अंदाज करायला शिकणं आणि थोडी वाट पाहायला शिकणं. घरात, विशेषतः, स्वयंपाकघरात याची काहीशी भरपाई करणं सहज शक्य आहे.
मुलांना दह्यासाठी विरजण लावायला शिकवा. कितीजणांसाठी दही लावायचं आहे, किती दूध घ्यायचं, ते कोणत्या पातेल्यात मावेल याचा अंदाज मुलांना करूदे. उकाडा असतो तेव्हा विरजण लावायला किती दही/ ताक लागतं, दूध किती कोमट असायला हवं, दही घट्ट लागावं म्हणून ते हलवून, जरासं घुसळून कसं ठेवायचं याबद्दल मुलांशी बोला. लावल्या लावल्या दही लागत नाही, दही जेव्हा हवं असेल त्याआधी साधारण किती वेळ विरजण लावून ठेवायचं हे सांगून टाकू नका! ते मुलांना अनुभवूदे. मुलांच्या विस्मयाचा भाग जपूया. दिवसा दही लावून, दही लागलं का हे तासातासानी मुलांना पाहूदे. स्वतः लावलेलं दही, त्याचं ताक चाखण्यातली मजा वेगळीच आहे. सलग आठवडा-दोन आठवडे रोज दही लावायला मुलांना बोलवा.
हे दही टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव न घातल्यामुळे ते खाण्यासाठी आरोग्यकारक असतं हे मुलांच्या कानावरून जाऊद्या. विक्रीसाठी डबाबंद न केल्यामुळे, इकडून तिकडे पाठवण्याची व्यवस्था करावी न लागल्यामुळे ते कसं पर्यावरणमित्र दही आहे हे समजावून सांगा. मुळातलं विरजण किती वर्षांपूर्वीचं असेल बरं याची कल्पना त्यांना करूदे.
असलेल्या सामग्रीतून अन्नाचं पोषणमूल्य वाढवायला शिकवणं हा आपल्या देशात शिक्षणातला अनिवार्य भाग असायला हवा. ते वाचन- लेखन- गणिती कौशल्याइतकंच महत्त्वाचं आहे. पदार्थ बनवताना वापरण्यासाठी किंवा कच्चं खाण्यासाठी कडधान्याला मोड आणायला शिकणं हे याचं एक उदाहरण. प्रत्येकासाठी किती कडधान्य घ्यायचं याचा अंदाज मुलांना करूदे. भिजवण्यापूर्वी कडधान्याचा रंग, वास, स्पर्श कसा आहे हे नोंदू दे. धुवून झाल्यावर भिजवताना किती पाणी घालायचं हे समजून घेऊदे. पुरेसं भिजलं का हे कसं समजतं हे पाहूदे. साधारण किती तासांनी भिजलं याची नोंद ठेवूदे. उपसणं, बांधून ठेवणं किंवा जाळीदार भांड्यात ठेवणं म्हणजे काय हे करता करता शिकूदे. किती तासांनी मोड आले याचं निरीक्षण करूदे. नंतर कडधान्याची कोशिंबीर करता येते, उसळ करता येते, एखाद्या भाजीसाठी व्यंजन म्हणून ते वापरता येतं, त्याचं कळण करता येतं याचा अनुभव आपल्या मदतीनं मुलांना घेऊदे.
काही गोष्टी निसर्गतः होण्यासाठी वाट पाहायची असते, त्या व्हाव्यात यासाठी आपली छोटीशी भूमिका असते, मात्र खरं तर निसर्गच ते घडवतो या अतिशय मोलाच्या गोष्टी मुलांना यातून शिकायला मिळतात. त्या कोणत्याही मार्कलिस्टहून किंवा सर्टिफिकेटहून महत्त्वाच्या असतात आणि पुढे कायम मुलांबरोबर राहतात.
पोळी लाटणं, कुकरमध्ये वरण-भात लावायला शिकणं, पालेभाजी निवडणं मोठं कोणीतरी शेजारी असताना भाजी चिरणं, फळं सोलून, चिरून शिकरण करणं अशा अनेक गोष्टी मुलांच्या अनुभवाच्या खात्यावर जमा करता येतील.
पाचवी-सहावीच्या वयोगटासाठी:
या वयाच्या मुलांना दही लावणं, कडधान्याला मोड काढणं हे तर शिकता येईलच, शिवाय मोठ्यांच्या उपस्थितीत विस्तव वापरून करण्याच्या गोष्टी करायलाही ती शिकू शकतील.
एखादा पदार्थ करताना कोणकोणत्या क्रिया आपण करतो याची मुलांना नोंद ठेवता येईल. पोळी करताना – मळणं, लाटणं, भाजणं; पुरी करताना – मळणं, लाटणं, तळणं; भात करताना – धुणं, शिजवणं; भाजी करताना – निवडणं, चिरणं, परतणं/ शिजवणं…वगैरे.
नेहमी केल्या जाणाऱ्या भाज्यांच्या, कुटुंबातल्या लोकप्रियतेची मोजणी मुलं आलेखाच्या रूपात करू शकतील. कागदाच्या तळाशी भाज्यांची नावं लिहून घ्यायची. घरात कोणाकोणाला ती भाजी आवडते हे विचारून त्या नावाच्या वर एकसारख्या आकाराचे चौकोन चिकटवायचे/रंगवायचे आणि स्तंभालेख तयार करायचा. नावडत्या भाज्यांचाही असाच आलेख करता येईल.
कोणत्या पदार्थासाठी कोणतं आणि किती सामान लागलं, त्यासाठी एकूण खर्च किती आला, दरडोई खर्च किती आला, त्या पदार्थातून कोणते अन्नघटक आपल्या पोटात गेले हे मुलांना शोधूदे.
अनुभवाशी जोडून लिहायचं काम करणं हे धड्याखालच्या प्रश्नोत्तरांहून नेहमीच अधिक मजेचं आणि अर्थपूर्ण असतं, जगण्याशी जोडलेलं असतं. भाषेचा आपल्या जीवनातला एक हेतू उलगडून दाखवणारं असतं. साहित्य, कृती लिहून, चित्र काढून, मुलं एखादी छानशी पदार्थ-पुस्तिका तयार करू शकतील.
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पूर्वीच्या वस्तू, साधनं यांच्याबद्दल आजीआजोबांशी गप्पा मारून ती माहिती मुलांना नोंदायला सांगा. कोणते पदार्थ बनवण्यासाठी त्यातलं कायकाय अजूनही वापरतात, कायकाय नाहीसं झालं हे मुलांना समजून घेऊदे. तसं का झालं असेल याबद्दल विचार करू दे.
एखादा पदार्थ आपण खातो तेव्हा कोणीकोणी कायकाय काम केलेलं असतं याची यादी मुलांना करूदे. पानात घेतेलेलं का टाकायचं नाही हे समजावून सांगणं मग फार कठीण राहणार नाही!
जे आपण खातो, त्याचा आपल्या ‘असण्यात’ मोठा वाटा असतो! स्वयंपाकघरात पदार्थ करण्याचा शिक्षणानुभव खरोखरच बहुआयामी आहे. नियोजन शिकण्यासाठी, कार्यक्षमता वाढण्यासाठी, काळ आणि अवकाश यांचा अंदाज सुधारण्यासाठी, एकत्र काम करण्यातली मजा समजण्यासाठी, स्त्रीपुरुष समानतेचं मूल्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी…अनेक गोष्टींसाठी, लहानथोर सगळ्यांनी मिळून पदार्थ केले, त्याभोवतीची कामं केली तर हा अनुभव खूप आनंदाचा आहे. शैक्षणिक दृष्टीनं बहुमोल आहे!