ठाकूर रणमत सिंह
जगदीशपूरचे ८० वर्षीय योध्दा बाबू कुंवरसिंह १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात इंग्रजांना हुलकावणा देत , जेव्हा रेवा संस्थानात आपल्या ४५ हजार सैनिकांसह शिरले आणि त्यांनी रेवानगरी पासून ८ मैलावर आपल्या सैन्याचा पडाव टाकला, तेव्हा रेवा संस्थानच्या राजाने तेथल्या राजनैतिक एजंट लेफ्टनंट असबोर्न याला भिऊन कुंवरसिंहाला पत्र पत्र पाठविले की , तुम्ही आमच्या संस्थानातून निघून जावे. पत्र वाचून स्वाभिमानी वीर कुंवरसिंह पश्चिमेकडे बांद्याकडे आपल्या सैन्याराह निघून गेले.
वास्तविक पाहता रेवा संस्थानचा राजाचा कुंवरसिंहाशी नातेसंबंध होते. पण रेवाचा राजा इतर संस्थानिकांप्रमाणेच इंग्रजांच्या दबावाखाली होता. तो राणा विश्वनाथ सिंहाचा पुत्र होता. विश्वनाथ सिंहाचे सरदार महिपतसिंह त्यांचे मित्र होते. विश्वनाथ सिहानंतर त्याचा पुत्र रघूनाथसिंह रेवा संस्थानच्या गादीवर बसला. महिपतीपत सिंहाणा पुत्र रणमस्त सिंह हा त्याचा मित्र व सरदारही होता. रणमस्तत सिंहाचा जन्म १८२५ साली झाला. रणमस्त ऐवजी सारेच त्याला रणमत सिंह म्हणू लागले. राजा रघुनाथसिंहाचा रणमत सिंहावर फार विश्वास होता. पण रणमतसिंह हा स्वतंत्र वृत्तीचा व शूर होता. आपल्या संस्थानमधील इंग्रजांचे प्राबल्य त्याला फार खटकत होते. पण राणा रघुनाथ सिंह इंग्रज एजंट असबोर्न यांच्याशी दबून वागत होता. ते मात्र रणमत सिंह याला पसंत नव्हते. रेवा संस्थानच्या सैन्यात व तेथल्या इंग्रजांच्या सैन्यातील देशी सैनिकांत इंग्रजांविरुध्द तीव्र असंतोष होता. सरदार रणमत सिंहाविषयी या दोन्ही सैनिकांच्या मनात फार आदराची भावना होती.
रेवा संस्थानच्या राजावर आसबोर्नची करडी नजर होती. स्वातंत्र्य सैनिकांना तो जाऊन मिळू नये, म्हणून आसबोर्न दक्ष होता. ठाकूर रणमत सिंहाने ते पाहून इंग्रजांविरुद्ध युद्ध छेडले. जनतेचीही ठाकूर रणमत सिंहाला साथ होती. जनतेने आसबोर्नच्या बंगल्यावर हल्ला केला. तेव्हा तो कसातरी जीव घेऊन पळून गेला. ठाकूर रणमत सिंह व त्या सहकारी लालधीर सिंह , लाल पंजाब सिंह , लाल श्याम शाह , लाल लोचन सिंह व पहलवान सिंह या योध्यांसह चित्रकूटच्या जंगलात आपल्या सैन्यासह आश्रयाला निघून गेला. त्यांनी नागौद येथल्या इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला केला. नागौदचा रेसिडेंट त्यांना भिऊन अजयगडच्या बुदेल्यांच्या आश्रयाला निघून गेला. ठाकूर रणमत सिंहाने त्या रेसिडेंटचा पाठलाग केला. तेव्हा अजगडच्या राजा केशरीसिंह बुंदेला याच्याशी त्याचा सामना झाला. घनघोर युद्ध झाले. त्यात केशरीसिंह रणमत सिंहाच्या हातून मारला गेला.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रणमत सिंहाने इंग्रजांच्या नौगाव छावणीवरही हल्ला केला व ती छावणी लुटली. बरोंघा येथे त्याची इंग्रजांच्या सैन्याच्या एका तुकडीशी गाठ पडली, तेव्हा रणमत सिंहाने आणि त्याच्या साथीदारांनी त्या सैन्य तुकडीची धूळधाण उडवून दिली. त्यातील कित्येक मारले गेले व काही पळून गेले.
बांद्यामध्ये असताना इंग्रजसेना ठाकूर रणमत सिंह यांच्या पाठलागावर आली. रणमत सिंहांनी डभौराच्या रणजित राय यांच्या गढीचा आश्रय घेतला. तेथेही ती इंग्रज सेना पाठलाग करीत आली. नंतर रणमत सिंह सोहागला गेले. इंग्रज सेना पाठलागावर होतीच, तेथेही ती सेना आली. जेव्हा रणमत सिंह क्योटीच्या गढीत गेले तेव्हा इंग्रजांच्या सेनेने त्या गढीला वेढा दिला. तेव्हा करवूलीचे ठाकूर दलथम्हन सिंह यांनी रणगत सिंहांना गढीतून सुरक्षितपणे निघून जाण्यास मदत केली.
इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी २००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले . तसेच रेवा संस्थानच्या राजाने रणमत सिंहांना पकडून देण्यासाठी त्या राजावर दबाव आणला. नाईलाजाने रेवाच्या राजाने रणमत सिंहांना पत्र देऊन बोलावून घेतले. रणमत सिंह गुप्त मार्गाने रेवाच्या राजगहालात आले. रेवाच्या राजाने त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. इंग्रजांच्या वतीने त्यांना आश्वासन दिले. अखेर आपल्या आईची संमती घेऊन रणमत सिंहांनी रेवाच्या राजारामोर आत्मसमर्पण केले. परंतु त्या राजाने रणमत सिंह त्याचा प्रामाणिक मित्र असूनही त्याचा विश्वासपात केला. का ? तर इंग्रजांची मर्जी संपादन करण्यासाठी. ठाकूर रणमत सिंह आपला जिवलग मित्र विजयशंकर नाग याच्या वाड्यातील तळघरात विश्रांती घेत पहुडला होता. तेव्हा रेवाच्या राजाने त्याचा पत्ता इंग्रज सेनाधिका-यांला सांगितला. त्याने त्या तळघरात रणमत सिंहांना कैद केले आणि त्यांना आग्रा येथील तुरूंगात १८५९ साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी फाशी देण्यात आली. रेवा संस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा हा स्वातंत्र्यवीर विश्वासघातानेच फासावर लटकला आणि अमर झाला.