थॉमस अल्वा एडिसन

विजेच्या दिव्याचा शोध

स्मृतिदिन – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.

फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय “ढ’ आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले