नारळाच्या पोळ्या
🍒🥬🍎🫐🫐🍇🥦
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पारीसाठी:
१ मेझरींग कप कणिक, किंचीतसे मीठ, चमचाभर तेलाचे मोहन
सारणासाठी:
१ मेझरींग कप खवलेला नारळ / नारळाचा चव
१ मेझरींग कप पंढरपुरी डाळ्याचे अगदी बारीक केलेले पीठ
३/४ मेझरींग कप पीठीसाखर
स्वादासाठी वेलची पूड, थोडे केशर
पाव कप दूध
तूप
क्रमवार पाककृती:
पारीसाठी लागणारे साहित्य घेऊन पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्या. फार घट्ट नको किंवा फार सैलही नको.
नारळाचा चव अगदी थोडासा परतून घ्या. त्यात पंढरपुरी डाळ्याचं पीठ, पीठीसाखर, वेलची, केशर घालून नीट मिसळून घ्या. सारण कोरडं वाटलं तर अगदी थोडे थोडे दूध शिंपडून पुरणाप्रमाणे मऊ (कंसिस्टन्सि?) करून घ्या. आता कणकेचा उंडा घेऊन त्यात पुरणाच्या पोळीला भरतो तसे सारण भरून तांदळाच्या पिठीवर हल्क्या हाताने लाटून घ्या. तव्यावर तूप सोडून भाजून घ्या.
वाढणी/प्रमाण:
५-६ पोळ्या
अधिक टिपा:
काहीही नाहीत. एकदम सोपी पाककृती. या पोळ्या टिकतातही छान. थोSSडीशी खव्याच्या पोळीसारखी चव लागते. बंगलोरलाही खाल्ल्या होत्या पण त्या नुसत्या नारळाच्या होत्या. नारळी पौर्णिमेला कधी साखरभाता ऐवजी बदल म्हणून छान लागतात.