नाश्त्याचे पदार्थ
#उपमा –
१) कॉर्न उपमा, मटार उपमा, गाजर-फ्लॉवर घालून केलेला उपमा,
२) साधा उपमा – आलं-मिरची वाटून, फोडणीला उडदाची डाळ-कढीपत्ता घाला, साखर-मीठ घाला. वर ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.
३) सांजा – गव्हाचा रवा (दुकानात रेडीमेड मिळतो (दलिया) ) भाजून घ्या. फोडणीला सुकी लाल मिरची, उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ आणि कढीपत्ता घाला. नेहमीच्या उपम्यासारखा करा.
#पोहे –
१) कांदे पोहे
२) बटाटे पोहे
३) मटार पोहे
४) बारीक चिरलेला फ्लॉवर आणि गाजर घालून केलेले पोहे
५) दडपे पोहे, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून केलेले पोहे
#इडली –
१) इडली, सांबार, चटणी,
२) कांचीपुरम इडली – इडलीच्या पिठात भिजवलेली चणा डाळ, काजुचे तुकडे, किसलेलं आलं, ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जाडसर भरडलेली मिरपूड घाला. इडली पात्राला तूप लावून इडल्या करा. उत्तम लागतात.
३) मिश्र भाज्या घालून केलेली इडली – फ्लॉवर-गाजर बारीक चिरा, त्यात मटार दाणे घाला, आलं-मिरची वाटून घाला, कोथिंबीर घाला, इडल्या करा.
#पराठे –
१) मेथी पराठे – बारीक चिरलेली मेथी, वाटलेला लसूण, जिरे पूड, तिखट, मीठ, हळद, तीळ, थोडंसं दही, आवडत असल्यास एखादं पिकलेलं केळं कुस्करून घाला. कणीक घाला. सगळं एकत्र करा. पोळ्यांसारखी कणीक भिजवा. पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.
२) पालक पराठे – पालक, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात जिरे पूड, तिखट, मीठ, कणीक घाला. पराठे करा. तेल लावून भाजा.
३) फ्लॉवर पराठे – फ्लॉवर किसून घ्या. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. धणे-जिरे पूड, तिखट, मीठ, आमचूर, चिमूटभर गरम मसाला घाला. दोन पोळ्या लाटून मध्ये हे सारण भरा. कडा नीट बंद करा. हलकं लाटा. तूप लावून खुसखुशीत भाजा.
४) मुळ्याचे पराठे – मुळे जाड किसा. १० मिनिटं पंचावर टाकून ठेवा. पंचात घट्ट गुंडाळून पिळून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घाला. धणे-जिरे पूड घाला, तिखट, मीठ, आमचूर घाला. दोन पोळ्या लाटून सारण भरा. मस्त तूप लावून भाजा.
५) आलू पराठे – उकडलेले बटाटे कुस्करा. आलं-लसूण-मिरची वाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, धणे-जिरे पूड, आमचूर घाला. पुरणाप्रमाणे भरून पराठे करा. तूप/तेल लावून भाजा.
६) कोबीचे पराठे – कोबी किसा, हळद, तिखट, मीठ, जिरे पूड घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, कणीक घालून भिजवा. पराठे करा. तेल लावून भाजा. याच पध्दतीनं दुधीचे पराठेही करता येतात.
७) जि-या-मि-याचे पराठे – जिरं भाजून जाडसर पूड करा, मिरे भरड वाटा, कणकेत घाला, तुपाचं मोहन घाला, मीठ घाला. पीठ घट्ट भिजवा. जाडसर पराठे लाटा. तूप लावून भाजा.
#आप्पे –
१)चणाडाळ, उडीद डाळ, तांडूळ भिजवून पीठ तयार करा. त्यात आलं-लसूण मिरची वाटून घाला. कोथिंबीर घाला. आप्पेपात्रात आप्पे करा.
२) दोशाचं किंवा इडलीचं उरलेलं पीठ असेल तर त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. आप्पे करा.
#उपासाचं थालिपीठ –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, उपासाची भाजणी, दाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची-जिरं-साखर वाटून तो ठेचा, तिखट, मीठ घाला. तूप लावून थालिपीठं करा.
#साबुदाणा खिचडी –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, दाण्याचं कूट, साखर, मीठ, आलं-मिरची वाटून, कोथिंबीर, लिंबाचा रस सगळं एकत्र करून तूप जि-याच्या फोडणीवर खिचडी करा.
#डोसा –
डोसा, चटणी, भाजी, सांबार, चटणी
#उत्तपा –
डोशाच्या पिठात बारीक चिरलेलं कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो घाला. तव्यावर जाडसर उत्तपे घाला. किंवा या भाज्या कोशिंबिरीसारख्या एकत्र करा. जाडसर डोसा घालून त्यावर भाज्या घाला. उलथन्यानं दाबा. झाकण घालून उत्तपे करा.
#लाह्याचे पिठाचे मुटके –
ज्वारीच्या लाह्यांचं पीठ, भरपूर दाण्याचं कूट, जरा जास्त हिंग, हळद, तिखट, मीठ, बारीक कोथिंबीर, आंबट दही. हे एकत्र करा. हाताच्या मुठीनं दाबून मुटके करा. जरा जास्त तेलावर शॅलो फ्राय करा.
#फोडणीचं लाह्याचं पीठ –
वर दिलेलं साहित्य एकत्र करा. थोडं पाणी घालून सरबरीत भिजवा. जरा जास्त तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करा. त्यात कालवलेलं पीठ ओता. मंद आचेवर वाफ येऊ द्या.
दूध-साखर-लाह्याचं पीठ एकत्र कालवून खा. किंवा ताकात कालवा, जिरे पूड-कोथिंबीर घालून खा.
#नाचणीचा डोसा –
नाचणीचं पीठ, उडदाची भिजवलेली डाळ वाटून त्यात मिसळा. रात्रभर आंबवा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. नेहमीसारखे डोसे करा.
#मिक्स डाळींची धिरडी किंवा अडाई –
चणा, उडीद, मूग, तूर डाळी, तांदूळ समप्रमाणात घ्या. रात्रभर भिजवा. सकाळी वाटताना त्यात धणे-सुकी लाल मिरची घाला. मीठ घाला, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. धिरडी करा.
याच पिठाचे आप्पेही करता येतील
#मुगाची धिरडी –
भिजवलेले मूग वाटा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. मीठ-जिरेपूड घाला, किसलेलं आलं घाला. तांदळाचं पीठ घाला. धिरडी करा.
#ऑम्लेट –
१) नेहमीसारखं कांदा-मिरची-कोथिंबीर घालून करा.
२) या ऑम्लेटवर किसलेलं चीज घाला.
३) बारीक स्लाईस केलेले मश्रूम, बारीक चिरलेला ब्रॉकोली घाला
4) कधी नुसतं कांदा-टोमॅटो मीठ मिरपूड-चीज घाला.
बरोबर पराठ्यांसारख्या पोळ्या किंवा ब्रेड द्या.
#फोडणीची पोळी-भात-ब्रेड
#मिक्स पिठांची धिरडी –
कणीक, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी, बाजरीचं पीठ यापैकी आवडीची कुठलीही पिठं घ्या. आपल्याला आवडेल ते प्रमाण घ्या.
१) पालक चिरून, लसूण-मिरची-जिरं वाटून घाला. तिखट, मीठ, हळद घालून सरबरीत पीठ भिजवा. धिरडी करा.
२) टोमॅटो,जिरं, लसूण, मिरची वाटून, तिखट, मीठ, हळद घाला, पीठ भिजवून धिरडी करा.
३) बारीक चिरलेली किंवा किसलेली कुठलीही भाजी (दुधी, गाजर, मेथी इत्यादी) घाला, तीळ, तिखट-मीठ घाला.
#तांदळाचं पीठ-बेसन धिरडी
तांदळाचं पीठ आणि बेसन समप्रमाणात घ्या. ताकात भिजवा. लसूण-मिरची जिरं वाटून घाला.
अजूनही किती तरी पदार्थ नाश्त्याला करता येतात. हल्ली बरेच लोक कॉर्न फ्लेक्स किंवा म्युसेलीही खातात. मला आपला पारंपरिक नाश्ताच आवडतो. नाश्ता हे दिवसाचं सगळ्यात महत्वाचं मील असल्यानं तो नेहमीच भरपेट करावा. वर जे पदार्थ दिले आहेत त्यातल्या ब-याचशा पदार्थांना थोडीशी पूर्व तयारी लागते. म्हणजे पीठं भिजवणं असेल किंवा आंबवणं. पण थोडंसं नियोजन असेल तर हे सगळे पदार्थ करणं सहज शक्य आहे. शिवाय मी या पध्दतीनं करते म्हणजे तुम्हीही त्याच पध्दतीनं करावेत असं नाही. तुम्हीही हे सगळे पदार्थ करत असालच. थोडी कल्पनाशक्ती वापरली तर उत्तम नाश्ता होऊ शकतो.