आय ॲम अँग्री डोन्ट टॉक टू मी नाऊ!
गिव्ह मी सम टाईम! गिव्ह मी माय स्पेस! आय एम बोअर्ड! आय एम हंगरी!
असे वाक्प्रचार तीन-चार वर्षाच्या मुलांच्या तोंडून ऐकले तर आपल्याला आश्चर्याचे धक्केच बसतात.
कशी येतात अशी वाक्यं त्यांच्या तोंडून?
शिकवतात त्यांना शाळेत किंडर गार्टनच्या वयापासूनच! त्यांच्या भावना ओळखायला आणि त्यांना “नाव” द्यायला.जे शिक्षण आपण मोठ्या मंडळींनी कधी घेतलंच नाही आणि मनातही आलं नाही! आजही आपल्याला आपल्या भावना ओळखायला त्रास होतो.
आपल्या मनानी नकळत केलेलं रिजेक्शन आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं आपण त्यावर विशेष काही काम करत नाही, ते कमी करण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग नकळत त्याचे परिणाम अटळपणे समोर येतात.
*”नेम देम टू टेम देम!”* आधी भावना ओळखा त्यांना त्यांचं नाव द्या म्हणजे त्यांची तीव्रता कमी होईल.
भावनांच्या शिक्षणामध्ये हा वाक्प्रचार खूप महत्त्वाचाआहे.आजकाल भावनांच्या शिक्षणाची गरज सर्वांनाच पटू लागली आहे म्हणून त्याचं शिक्षण खूप लहान वयापासून होताना दिसत आहे. परदेशातल्या शाळांमधल्या काही वैशिष्ट्यांपैकी हे एक.
मागच्या दोन पिढ्यांपर्यंत मूल जगणं हीच खूप मोठी गोष्ट होती. दहा दहा मुलं झाली आणि सगळी गेली असं सुद्धा त्या पिढीनं ऐकलं पाहिलं आहे. सगळी मुलं हाती लागणं म्हणजे ती सगळी हयात असणं (त्यात एक तरी मुलगा असणं)आणि सासू-सासरे ही हयात असणं ही खूप मोठी गोष्ट धरली गेली होती. अशा स्त्रीला *”अचळागौर”* असं नावही समाजात रूढ होतं. असा तो काळ होता.
तिथून आपण आता प्रत्येक मूल नुसतं जगलंच पाहिजे इतकंच नाही तर ते सुदृढ पाहिजे,त्याच्यात काही ना काही चमक पाहिजे, त्यानी कुठं ना कुठं आपला ठसा उमटवला पाहिजे इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. या प्रवासात आपण अन्न वस्त्र निवारा अशा जगण्याच्या मूलभूत जगण्याच्या गरजा केव्हाच पार केल्या. त्यानंतर आपल्याला मुलांना शिक्षण देता आलं,त्यांना वैद्यकीय मदत पुरवता आली आणि त्यांना रोग प्रतिबंधक लसी टोचून त्यांच्या जिवाची हमी देता आली.
हे ही कमी की काय म्हणून करमणूक, कला कौशल्य, खेळ इत्यादी गोष्टींमध्ये पण त्यांना शिरकाव करू दिला.
आता तर प्रत्येक मुलाला हे सगळं तर आलंच पाहिजे, मिळायलाच पाहिजे, शिवाय आनंद समाधान सुख सातत्यानं कसं मिळत राहील याकडे आपली मागणी जोर धरू लागली आहे. हे करत असताना माणसाच्या मुलांमध्ये थोडीही कमतरता असून चालणार नाही असा आपला समाज घडू लागला आहे. त्यामुळं प्रत्येक मूल हे विसा पैकी वीस तर कधी विसा पैकी २१ सुद्धा मिळवणारं हवंस झालं आहे. *दिल है कि मानता नहींै आणि ये दिल मांगे मोअर* अशी पालकांची अवस्था झाली आहे. इथं उन्नीस बीस एवढा फरक सुद्धा आता चालत नाही! इतकंच काय साडे उन्नीस-बीस पण नकोच. सगळं बीस बीसच पाहिजे!
मात्र यामध्ये आपणपण समाजाचा घटक म्हणून सहभागी आहोत याचं भान सुटत चाललेलं आहे.
चुकून कधी आपलं मूल बीस बीस मिळवणाऱं नसलं तर आपल्या मुलाला त्याच्या अंगभूत गुणदोषांसह समाजानं आपलंसं करावं असं वाटत असतांनाच आपणही इतर कुणाच्या मुलाला त्यांच्या गुणदोषांसह आपलंस करायला हवं याचं भान मात्र फारसं रुजलेलं दिसत नाही. यासाठी भावनांचा विकास होणं गरजेचं आहे.
मनुष्य हा भावनाप्रधान जगण्याला प्राधान्य देतो. त्याला त्याच्या जगण्याला भावनांचा ओलावा हवा हवासा वाटतो.पण मग तो स्वतः पुरेसा ठेवून कसं चालेल? सर्वांना सर्वांच्या भावनांचं भान येणं गरजेचं आहे. नव्या युगाचा तो आवश्यक भाग झालेला आहे. मुलांना शालेय शिक्षणाबरोबर हे सगळं शिकवायला सुरुवात झालेली आहे.आपण पालकच अजून त्यात मागे पडतोय असं दिसतं.
मिशिगनमध्ये नातीच्या शाळेमध्ये एका प्रसंगात हे प्रकर्षानं लक्षात आलं आणि म्हणून ते तुमच्या बरोबर शेअर करावसं वाटलं. एकदा रमाच्या शाळेत एक म्युझिकल कॉन्सर्ट होता. इथं मुलं आपल्या गाण्याच्या शिक्षकांबरोबर एकत्र गाणार होती. प्रसंग छोटासाच, काही मिनिटांचाच पण हे बघायला पालकांना आमंत्रण होतं. पालकांमध्ये आजी-आजोबांना पण तितक्याच आपुलकीनं बोलवतात आणि आजी आजोबा तर अशा प्रसंगांना जायला उत्सुक असतातच. मीही गेले होते .
फोटोत दाखवल्याप्रमाणे उजव्या कोपऱ्यातली एक मुलगी हाताची घडी घालून कानावरून ऐकण्याचे मफलर्स लावून फुरंगटून उभी होती. सगळ्या ग्रुपमध्ये ती वेगळी लक्षात येत होती. सुरुवातीला मला वाटलं तिचे आई-बाबा दिसत नसतील किंवा सोडून काही आवश्यक कारणांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसतील म्हणून तिचा मूड गेला असावा परंतु तिच्याकडं कुणाचंच लक्ष नव्हतं.मला वाटत राहिलं की शिक्षक तरी हिच्याकडे का बरं बघत नसतील? तिची समजूत का काढत नसतील?ती गाण्यांमध्ये भाग घेऊ शकत नाही याकडं कुणाचंच लक्ष कसं नाहीये? माझीच अस्वस्थता वाढत होती. मनात विचार चालू होते. असं काय असेल बरं कारण? का बरं तिला कार्यक्रम एन्जॉय करता येत नाहीये आणि का बरं तिला कोणी काही म्हणत नाहीये? असं कसं?
एकदा एक टीचर तिच्याजवळ येऊन तिच्या जवळ कानात काहीतरी बोलून गेली पण तिला तू गा, टाळ्या वाजव, लक्ष दे, असं कुणीच म्हणत नव्हतं.
या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असं मी ठरवलं आणि शिक्षिकेला जाऊन विचारलं. तेव्हा असं उत्तर मिळालं की तिला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसोर्डर (ASD)आहे. तिला आवाज सहन होत नाहीत. तिला एकत्र गाण्याचा, काॅन्सर्ट चा त्रास होतो म्हणून तिला कानाला मफलर लावायला परवानगी देऊन कार्यक्रम अटेंड करायला सांगितलं आहे. ते तिच्या इच्छेविरुद्ध आहे. तिच्या कंफर्ट झोनच्या बाहेर आहे. पण ती ते करायला, मुलांबरोबर उभं राहायला तयार झाली आहे हेच आमच्या दृष्टीनं खूप मोठं आहे. इतर मुलांनाही याची कल्पना आहे त्यामुळं ते कोणी अस्वस्थ होत नाहीयेत. हे पाहून मला खूपच बरं वाटलं. शाळेचा अशा प्रकारच्या मुलांना सर्वांबरोबर मुख्य प्रवाहात येऊ देण्याचा हा प्रयत्न खूपच कौतुकास्पद वाटला. इतर मुलांना तिच्यात काही गैर वाटत नव्हतं.खरं तर वाटूपण नये. किंबहुना त्यांनी तिला आपल्या सारखीच एक म्हणून समजून बरोबरीनं, साथीनं घ्यावं यासाठी शाळा प्रयत्नशील होती. हेच दिसत होतं.
हीच मुलं पुढे मोठी होणार आहेत आणि त्यांना थोडंसं कमी असलेलं कोणी त्यांच्या आयुष्यात आलेलं चालणार आहे.त्यांना ते चालवून घ्यावं लागणार नाहीये, हे सहज होणार आहे.हा सहजपणा याच वयात अंगी मुरणं खूप महत्त्वाचं आहे आणि शाळा ते करते आहे.
जेव्हा आपल्याला अशा मुलांनी समाजात मिसळावंसं वाटतं तेव्हा समाजाकडून त्यांना मिसळण्याजोगी परिस्थिती निर्माण होणं गरजेचं असतं आणि समाजाचा एक भाग म्हणून आपण नक्की काय करायचं असतं याचं शिक्षण व्हावं लागतं
ते ही शाळा करत होती! आपणही त्यातून धडा घेऊया.