नमस्कार,
बऱ्याच वेळा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपण एखाद्या व्यक्तीविषयी मनात जे चित्र रेखाटतो, बऱ्याचदा ते चुकीचे असल्याचे त्या व्यक्तीशी बोलल्यावर समजते. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या व्यक्ती आपल्या जीवनाचे व्यवस्थीत व्यवस्थापन करुन प्रगतीच्या शिड्या चढून जाऊन शिखरावर पोहोचतात जे कदाचित सुखवस्तू घरातील मुलांना जमेलच असे नाही कारण ते त्या परिस्थितीतून गेलेले असतात, त्याची जाणीव त्यांना असते व परिश्रम घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. उलट सुखवस्तू मुलं सुखासीन जीवनामुळे थोडे सुस्तावतात व प्रगतीच्या मार्गावर त्यांची गती ससा व कासव च्या गोष्टी सारखी होते. असो. मुळ इंग्रजी भाषेतील कथेचा मी मराठी अनुवाद करुन आज सामायिक करीत आहे.
-मेघःशाम सोनवणे.
–🌼–
प्रगती –

इंग्रजी कथा लेखक- अनामिक.
मराठी अनुवाद -मेघःशाम सोनवणे.

एक वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्र देण्यासाठी दररोज पहाटे ५ वाजता यायचा आणि मला माझ्या घराच्या गॅलरीत फिरताना बघायचा. त्यामुळे माझ्या घराचे मुख्य गेट ओलांडताना तो सायकल न थांबवता बाल्कनीत वर्तमानपत्र टाकत, “नमस्ते बाबूजी” म्हणत मला नमस्कार करायचा आणि मग वेगाने पुढे जायचा.
जसजशी वर्षे सरत गेली आणि माझं वय वाढत गेलं तसतशी माझी जागं होण्याची वेळही बदलली होती. आता मी सकाळी ७ वाजता उठायचो.
अनेक दिवस मी त्याला सकाळी फिरताना दिसलो नाही, तेव्हा एका रविवारी सकाळी ९ च्या सुमारास तो माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माझ्या निवासस्थानी आला. घरी सर्व ठीक आहे आणि मी उशिरा उठायला सुरुवात केली होती हे कळल्यावर तो हात जोडून म्हणाला, “बाबूजी! काही सांगू का?”
मी म्हणालो, “बोल.”
तो म्हणाला, “तुम्ही सकाळी लवकर उठण्याची एवढी चांगली सवय का बदलत आहात? मी विधानसभेच्या जवळून पहाटे वर्तमानपत्रे उचलतो आणि माझे पहिले वर्तमानपत्र पोहोचवण्यासाठी खूप वेगाने सायकल चालवत असतो. येताना, ‘मला उशीर होऊ नये’ असाच विचार करत यायचो कारण तुम्ही वर्तमानपत्राची वाट पाहत असाल.”
मी आश्चर्याने विचारले, “विधानसभा रोडवरून वर्तमानपत्रे आणता?”
“होय, तिथूनच पहिले वितरण सुरू होते,” त्याने उत्तर दिले.
मी त्याला दुसरा प्रश्न विचारला, “मग किती वाजता उठता?”
“अडीच वाजता… म्हणून मी तेथे साडेतीनला पोहोचतो.”
“मग?” मी विचारले.
“मग वृत्तपत्रे वाटून झाल्यावर, सातच्या सुमारास मी घरी जाऊन झोपतो. मग दहा वाजता ऑफिसला जातो…. मुलांना शिकवायला हे सगळं करावं लागेल ना बाबूजी.”
मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मग म्हणालो, “ठीक आहे! मी तुझी बहुमोल सूचना लक्षात ठेवेन.”
या घटनेला जवळपास पंधरा वर्षे उलटून गेली होती. एके दिवशी सकाळी नऊच्या सुमारास तो माझ्या घरी आला आणि मला निमंत्रण पत्रिका दिली. तो म्हणाला, “बाबूजी! माझ्या मुलीचे लग्न आहे… तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत यावे अशी माझी इच्छा आहे.”
निमंत्रण पत्रिकेकडे ओझरती नजर टाकून पाहिलं तर ती डॉक्टर मुलीचे डॉक्टर मुलाशी लग्नाची पत्रिका असल्याचं वाटलं. तर, नकळत मी म्हणालो, “तुझी मुलगी?”
आणि माझ्या प्रश्नाचा त्याने कसा अर्थ लावला ते मला कळले नाही. तो आश्चर्याने म्हणाला, “काय बोलताय बाबूजी! अर्थात, ही माझी मुलगी आहे!”
माझी भूमिका दुरुस्त करून आणि माझी अस्वस्थता दूर करून मी म्हणालो, “मला म्हणायचे होते, तू तुझ्या मुलीला डॉक्टर बनवले आहेस हे पाहून मला आनंद झाला आहे.”
“हो बाबूजी! मुलीने KGMC मधून MBBS केले आहे आणि तिचा भावी नवरा देखील तिथे MD आहे… आणि बाबूजी! माझा मुलगाही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला आहे.”
दारात उभं राहून मी विचार करत होतो की त्याला आत बोलवावं की नाही, तेवढ्यात तो म्हणाला, “बरं बाबूजी! मी आता निघतो… अजून बरीच कार्ड वाटायची आहेत.. कृपया तुमच्या कुटुंबासोबत या, तुम्हा सर्वांना पाहून माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद होईल.”
मग मला वाटलं, आजवर मी त्याला कधी आत यायला सांगितलं नाही आणि आज अचानक आत बसायचं आमंत्रण म्हणजे ती एक फसवणूक होईल म्हणून औपचारिक “नमस्ते” म्हनून मी त्याला बाहेरूनच निरोप दिला.
त्या घटनेनंतर दोन वर्षांनी तो पुन्हा माझ्या घरी आला तेव्हा त्याचा मुलगा जर्मनीत कुठेतरी नोकरी करत असल्याचे संभाषणातून समोर आले. आता उत्सुकतेपोटी मी त्याला प्रश्न विचारला: “तु तुझ्या मर्यादित उत्पन्नात तुझ्या मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद कशी काय केली?”
“बाबूजी! ती खूप मोठी कथा आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. वर्तमानपत्रं आणि नोकरी याशिवाय फावल्या वेळात मी काही ना काही कामं करत राहायचो. माझा दैनंदिन खर्चही मी अतिशय काळजीपूर्वक करत असे. फक्त रात्रीच बाजारात जाऊन भोपळा, करवंद, वांगी यासारख्या स्वस्त, हंगामी भाज्या व फळं खरेदी करत असे… कारण रात्री दुकाने बंद व्हायची वेळ आली की दुकानदार अगदी कमी दरात भाजीपाला देतात.
एके दिवशी, माझा मुलगा शेजारच्या मुलांसोबत त्यांच्या घरी खेळायला गेला आणि तो लांबट चेहरा आणि ओले डोळे घेऊन परत आला. त्याला आम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत असे मला वाटले.
संध्याकाळी आम्ही सगळे जेवायला बसलो, तेव्हा ताटातली भाजी आणि भाकरी पाहून माझा मुलगा रडू लागला आणि आईला म्हणाला, “हे काय… भोपळा, वांगी, करवंद अशा त्याच मंद, बेचव भाज्या. ..हे कोरडे अन्न…हे सगळं खाऊन मला कंटाळा आला आहे. मी माझ्या मित्रांच्या घरी गेल्यावर त्यांच्याकडे मटर-पनीर, कोफ्ते, दम आलू, काय काय असते!आणि इथे फक्त एक भाजी आणि कोरडी भाकरी.”
मी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणालो, “आधी तू रडणं थांबव, मग आपण बोलू.”
मग मी म्हणालो, “बेटा! नेहमी स्वतःच्या ताटात पाहावं. इतरांकडे काय आहे ते बघितलं तर प्रत्यक्षात आपल्या कडे जे काही आहे त्याचा आपणांस आनंद घेता येणार नाही. वर्तमानात जे काही आहे ते मनापासून स्वीकारले पाहिजे, तेव्हा देवाचे आभार मान आणि आपले भविष्य सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, की तुमचे भविष्य बदलण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे आणि इतर कोणामध्ये नाही. स्वतः चांगले करण्याचा प्रयत्न करत रहा.”
“माझ्या मुलाने त्याचे अश्रू पुसले आणि मग हसत माझ्याकडे बघितले, जणू काही सांगण्याचा प्रयत्न केला, की ‘मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी माझ्या आयुष्याची तुलना कोणाशीही करणार नाही आणि माझे भविष्य चांगले करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’ आणि तेव्हापासून माझ्या मुलांपैकी कोणीही माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मागणी केली नाही. मर्यादित साधनांसह त्यांनी त्यांचे जीवन सुधारण्यास सुरुवात केली. बाबूजी! आज ते जिथे आहेत ते त्यांच्याच त्यागाचे फळ आहे.”
मी त्याचे बोलणे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकत राहिलो. माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या प्रेमाची ताकद मी अनुभवू शकलो.
मला उमजले की “आपले भविष्य, आपले नशीब आणि आपण ते किती चांगले बनवतो हे आपल्यावर अवलंबून आहे.”