फुलपाखरू जन्माची गाथा

इतर सर्व सजीवांपेक्षा फुलपाखरू जन्माची गाथा ही थोडी निराळीच म्हणावी लागेल. कारण फुलपाखराचा जन्म हा नुसता जन्म नसून ते अवस्थांतर किंवा स्थित्यंतर आहे. अंडी- अळी- कोष- फुलपाखरू अशा विविध अवस्थांमधून जाणारं हे अवस्थांतर! फुलपाखराची मादी खाद्य वनस्पतीवर अंडी घालते, मग या अंडय़ांमधून अळी बाहेर पडते.

नवजात बाळाकरिता आईचं दूध हे जसं प्रथम अन्न म्हणून समजलं जातं त्याचप्रमाणे फुलपाखराच्या अंडय़ांची टरफलं हे त्या फुलपाखराच्या अळीचं प्रथम अन्न होय. फुलपाखराच्या जीवनक्रमातील अळी ही एकमेव अशी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये ‘तोंड’ असतं. म्हणूनच मग अळी त्या खाद्य वनस्पतीची पानं खायला सुरुवात करते. प्रचंड वेगाने पानांचा फडशा पाडत असते. पुढील सर्व आयुष्याला पुरेल एवढी शक्ती व सुदृढ शरीराची काळजी तिला याच अवस्थेत घ्यायची असते. झाडाची पानं खात असताना बाहेर पडणारी फुलपाखराच्या अळीची विष्ठा हे एक उच्च दर्जाचं नैसर्गिक खत म्हणून गणलं जातं. या अवस्थेत अळीची वाढ अत्यंत जोमाने सुरू असते.

याच अवस्थेदरम्यान, ज्याप्रमाणे साप आपली कात टाकतो, त्याप्रमाणे अळी आपली त्वचा वारंवार बदलत असते. पाच अवस्थांमधून जात शेवटी अंतिम अवस्थेत पोहोचते. शेवटच्या अळी-अवस्थेमध्ये असताना तिच्या तोंडातून एक विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी स्रवू लागतात. या ग्रंथींच्या मदतीने मग स्वत:भोवती कोष विणून घेते. हीच ती फुलपाखरांची कोषावस्था होय. काही कालावधीनंतर या कोषाचा रंग बदलू लागतो. सरटपणाऱ्या अळीला आता सोंड, पाय, डोळे, पंख यांसारखे नवीन अवयव येणार असतात. बऱ्याचदा हा कोष पारदर्शक असतो.

यथावकाश कोषामधून फुलपाखरू बाहेर येतं, त्या वेळी पंख गुंडाळलेल्या रूपात असतात आणि म्हणून त्याच्या पंखावरच्या शिरा लवचीक असतात. जन्मत: काही काळ फुलपाखरू लटकलेल्या अवस्थेत आपले पंख लांब करीत झटकत असतं. पंखांमध्ये उडण्याची क्षमता येण्याचा हा नाजूक कालावधी असतो. लहानपण, तारुण्य अशा दोन अवस्था नसून फुलपाखरू हे प्रौढ म्हणूनच जन्मते. अशी ही फुलपाखराची जन्मगाथा!

🖊 दिवाकर ठोंबरे
office@mavipamumbai.org