ब्रह्मांड

उत्पत्ती, स्थिती, विनाश

लेखक: मोहन आपटे

मूल्य २७५₹ टपाल ३५₹ एकूण ३१०₹

विश्वाची उत्पत्ती आणि सद्य:स्थिती या संबंधात अनेक मतभेद आहेत. विश्वनिर्मितीचा महास्फोट सिद्धांत आज तरी सुप्रतिष्ठित झाला आहे. अर्थातच प्रस्तुत ग्रंथात महास्फोट सिद्धांतामधील संकल्पनांना अग्रस्थान मिळाले आहे. भविष्यकाळात महास्फोट सिद्धांताला बाजूला सारून एखादा नवीन सिद्धांत पुढे येईल, काही सांगता येत नाही. म्हणून विश्व स्वरूपाच्या इतरही संकल्पना माहिती असायला हरकत नाही. त्याप्रमाणे महास्फोट सिद्धांताबरोबर विश्वोत्पत्तीच्या इतर काही महत्त्वाचा सिद्धांतांना या पुस्तकात स्पर्श केला आहे.

विश्वरूपातील विविध प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी अनेक अनेक अभिनव कल्पना पुढे येत आहेत, त्यापैकी विश्वोत्पत्तीचा फुगवट्याचा सिद्धांत, विश्वातील हरवलेले वस्तुमान, वैश्विक तंतू अशा काही संकल्पना आहेत. त्या खऱ्या की खोट्या हे पडताळून पाहणे सध्या तरी शक्य नाही, पण त्यांचा विचार करणे मात्र आवश्यक आहे. अर्थात अशा काही संकल्पनांचा उहापोह करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

‘विश्र्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल? विश्र्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्र्वाचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्र्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे. महास्फोटातून आपलं हे अफाट विश्र्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्र्व हे विज्ञानाला उमगलं. विश्र्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्र्व सपाट आहे की वक्र? ते बंद आहे की खुलं? बिंदुवत् स्थितीनं विश्र्वाचा अंत होईल? की निरंतर विस्तारणारं विश्र्व विरून जाईल? विश्र्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्र्वाचा उपक्रम आहे? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्र्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं? अजून काय काय समजायचं बाकी आहे? खरं म्हणजे विश्र्वाचं कोडं मानवाला उलगडेल? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा तसेच विश्वशास्त्रासारखा अत्यंत कठीण, गणिती सूत्रांनी व्यापलेला आणि तत्त्वज्ञानाची झालर असलेला विषय केवळ इंग्रजी भाषेमधील पुस्तकात अडकून राहू नये. विज्ञानाची थोडीफार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाही या क्षेत्रात चालू असलेल्या धडपडीची आणि उत्तुंग कल्पनांची माहिती असायला हवी. हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा. ‘