माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

शिक्षण या विषयावर गेली काही वर्षे, माझे जे वाचन झाले, स्नेहच्या शिक्षणाच्या निमित्ताने माझे जे निरीक्षण झाले, त्यानुसार माझ्यापुरती मी शिक्षणाची व्याख्या तयार केली आहे, ती म्हणजे,
उत्सुकतेपोटी नवीन गोष्टींचा शोध घेणे, शोध घेता घेता आपल्या क्षमतांचा अंदाज बांधणे, त्या क्षमतांच्या जोरावर शिकलेल्या गोष्टी वापरून बघणे आणि त्यातून आपल्या “कम्युनिटी”तील आपले स्थान बळकट करणे, म्हणजे शिक्षण.

या शिक्षणाच्या प्रक्रियेत पालक म्हणून माझी भूमिका या व्याख्येला अनुसरून काय असली पाहिजे? माझ्या अनुभवानुसार मी माझी भूमिका पुढीलप्रमाणे निवडली आहे.
१. मुलाला शिकण्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, असे वातावरण निर्माण करणे. त्यासाठी फिल्ड व्हिजिट असतील, शिकण्यासाठी वेगवेगळी माध्यमे हाताळण्याचे स्वातंत्र्य असेल, वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद करण्याची संधी उपलब्ध करून देणे असेल, हे मला करायचे आहे.उत्सुकता, कुतूहल हा शिकण्याचा पाया आहे. मुलांमध्ये या दोन्ही गोष्टी जिवंत आहेत ना? हे मुलांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येवरून व दर्जावरून समजून घेणे आणि या दोन्ही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, ही माझी सर्वात महत्वाची आणि कसलीही तडजोड करता न येणारी भूमिका आहे.

२. मूल हे स्वतःहून त्याच्या क्षमतेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतं. हा अंदाज घेण्यासाठी मुलाला वेगवेगळ्या गोष्टींशी “खेळण्याचे” स्वातंत्र्य द्यावे लागते. मुलानी आपली क्षमता पूर्णपणे वापरावी यासाठी मुलाच्या “कृतीचे” कौतुक करावे लागते, मुलानी मदत मागितली तर(च) मदत करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक मुलाच्या क्षमता या स्वतंत्र व युनिक असतात त्यामुळे तुलना न करता त्या स्वीकारल्या पाहिजेत, ही माझी भूमिका आहे.

३. नवीन गोष्टी शिकल्यानंतर त्या व्यवहारात वापरण्याची संधी, मग ती घरातील कामांमध्ये मदत असेल, मॉडेल्स बनवणे असेल, एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष हाताने काम करून बघणे असेल, यासाठी लागणारे वातावरण निर्माण करणे व रिसोर्सेस उपलब्ध करून देणे किंवा मुलाला हे रिसोर्सेस स्वतःहून शोधण्यासाठी मदत करणे अशी माझी भूमिका आहे.

४. प्रत्येक सजीवाला टिकून राहण्यासाठी तो ज्या कम्युनिटीत राहतो तिघे त्याला स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणे गरजेचे असते. वेगवेगळया वयात हे स्थान वेगळे असू शकते.
चेतन एरंडे