मी तुझ्या सोबत आहे
!आपल्यापैकी अनेकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला सायकल चालवायला शिकवली असेल किंवा किमान हाताला धरून चालायला तर नक्की शिकवले असेल!
काय करतो आपण मुलांना या गोष्टी शिकवताना?
सुरुवातीला मूल थोडंसं घाबरत असतं. आपण त्याला प्रेमाने समजावतो, प्रोत्साहन देतो. सुरुवातीला त्याचा किंवा तिचा हात घट्ट पकडतो. मग हळूहळू मूल चालण्याचा किंवा सायकल चालवण्याचा स्वतः हुन प्रयत्न करू लागते.

मग मुलाचे प्रयत्न आणि त्याची क्षमता जोखून आपण हळूच मुलाचा हात सोडून बघतो! हे हात सोडण इतकं अलगद आणि इतकं नकळत असतं की मुलाच्या ते लक्षातही येत नाही!
पण जेव्हा मुलाला हे समजते तेव्हा!!
त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासाने झळकणारा तो मनमुराद आनंद, मूल आणि आपण आयुष्यात कधीच विसरत नाही!
शारीरिकदृष्ट्या असं स्वावलंबी होण हे मुलाच्या एकूण प्रगतीसाठी किती आवश्यक आहे, हे वेगळं सांगायला नकोच! त्याची जाणीव असते म्हणूनच आपण असे प्रयत्न करतो.
मला सध्या प्रकर्षानं असं जाणवतय की मुलांना शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची जेवढी गरज, जेवढी ओढ असते, तितकीच किंबहुना त्याहून किंचित जास्त ओढ ही भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची असते.

चालायला शिकवताना किंवा सायकल शिकवताना आपण जी प्रक्रिया वापरली तीच प्रक्रिया मुलांना भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा आपण वापरली पाहिजे, असे मला वाटते.
तिथं आपण सुरुवातीला मुलांचा हात घट्ट पकडत होतो, तसेच इथेही मुलं जेव्हा स्वतः हून काही निर्णय घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा, खेळताना एकमेकांशी भांडतात तेव्हा सुरुवातीला हात धरला पाहिजे. मात्र हा हात अलगदपणे सोडायला देखील आपण विसरलं नाही पाहिजे!
सुरुवातीला मूल धडपडेल! चालताना धडपडलं म्हणून मी ना मुलाला दोष देतो ना स्वतः ला. असं धडपडणं हे नैसर्गिकच असतं हे जर मला तेंव्हा कळत असेल तर मूल एखादा निर्णय घेताना, इतरांशी वागताना जर “धडपडत” असेल तर ती त्याच्या भावनिक स्वावलंबनाची एक पायरी आहे, असे समजून मी प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे मला का कळत नसेल?
मुलाला एकट्याला प्रवास करू देणं, त्याच्या वेळेचं नियोजन करू देणं, छोटे छोटे आर्थिक व्यवहार करू देणं, मित्र निवडू देणं किंवा नाकारू देणं, स्वतः चं करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य देणं, या सगळ्या गोष्टी भावनिक स्वावलंबनाच्या प्रवासात सायकल चालवायला शिकण्यासारख्याच आहेत. इथे सुद्धा मुलाचा हात सोडून, या सगळ्या गोष्टी त्याला स्वतः च्या हिमतीनं करून त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा मनमुराद आनंद आणण्याची संधी मी दिली पाहिजे!

ही संधी देताना फक्त एकच गोष्ट मी लक्षात ठेवेन. ती म्हणजे, “मी तुझ्या सोबत आहे” तू बिनधास्त सायकल चालव हा आत्मविश्वास मी जसा त्याला सायकल चालवताना दिला तसाच तू आता बिनधास्त निर्णय घे, मी तुझ्या सोबत आहे, एवढा आत्मविश्वास त्याला आणि हो स्वतः ला ही देता आला, तर हा स्वावलंबनाचा प्रवास आपोआपच आनंदी होईल..
लेखन – चेतन एरंडे.
संपादन – प्रीती एरंडे