मुलांनी सुटीत करायलाच हव्यात
या गमती जमती

01. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
02. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत कपडे मळणार नाहीत याची काळजी घ्या.
03. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.
04. सुटीतले किमान दोन दिवस तरी शिंप्याच्या दुकानात जाऊन बसा. शिंपी मापं कशी घेतो आणि कापड कसं बेततो याचं बारकाईनं निरीक्षण करा. शिंपीकाकांशी गप्पा मारा.
05. लहान बाळाचा एखादा जुना छोटासा शर्ट घ्या. त्याची व्यवस्थित मापं घ्या. कागदावर आकृती काढा. आता घरातले जुने रुमाल वापरुन तसा शर्ट शिवण्याचा प्रयत्न तर करुन पाहा.
06. या सुटीत वेगवेगळ्या फळांच्या बिया जिथून मिळतील तिथून जमवा. साफ करुन ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बीया डोंगरावर, बागेत किंवा रस्त्याच्या बाजुला रुजवण्याचा प्रयत्न करा.
07. प्रत्येक फळ कापण्याची पध्दत वेगळी असते आणि ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. या सुटीत आंबा, कलींगड, पपनस, टरबूज, पपई, फणस, अननस अशी फळे वेगवेगळ्या पध्दतीने आवर्जून कापा आणि कापण्यातली गोडी अनुभवा.
08. आता तुम्ही कणिक मळायला शिकलाच आहात तर आता पोळी ‘लाटायचा’ ट्राय करा. काहीजणं प्रथमच लाटताना उभ्या-उभ्या डिस्को करतात, कंबरेतून लचकतात, घाटातून बाईक चालवत असल्याप्रमाणे हातातलं लाटणं पोळपाटावर फिरवत राहतात तर काही जणं मधेच लाटणं तोंडात धरून चक्क पोळपाटच फिरवत राहतात. मग पोळपाटावर काल्पनिक देशांचे नकाशे, बेटं, तुटलेले भूखंड तर काही ठिकणी चिकट ज्वालामुखी दिसू लागतात. चिडचिड किरकिर ऐकू येऊ लागते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून म्हंटलं ‘ट्राय’ करा.
09. गाजर, काकडी, मुळा, टॉमेटो, बीट किंवा कोबी यांची कोशींबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातलेच काय शेजारी पण आनंदाने खातील.
10. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सगळ्यांनी ‘आपले कपडे आपण धुवावयाचे’ असं ठरवा. सगळ्यांनी मिळून कपडे धुवा. कपडे धुण्याचे तंत्र आणि मंत्र शिकताना पाण्यात मस्त दंगा करा.
11. आईच्या आणि बाबांच्या मदतीने “आमच्या खास रेसीपी” असे तुमच्या कुटुंबाचे चमचमीत रेसिपी पुस्तक तयार करा. या पुस्तकातील पदार्थांचे फोटो, रेसीपी आणि पदार्थांची वर्णनं अशी लिहा की शेजार्यांेच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. मग फोटो अपलोड करून त्याचे इ-बुक करा. ते सगळ्यांना सेंड करा. वाचणार्यां च्या जीभा खवळल्या पाहिजेत.
12. घरी इस्त्री करताना काहीवेळा खूप वेळ लागतो. तर इस्त्रीवाल्याच्या दुकानातील कपडे पाहून तर घाम येतो. म्हणूनच किमान एक दिवस याच कामासाठी राखून ठेवा. इस्त्रीवाल्याच्या दुकानात जाऊन तो फुलशर्ट, टी शर्ट, पॅंट आणि ब्लाऊज यांना इस्त्री कशी करतो व मग त्यांची घडी कशी घालतो हे समजून घ्या.
13. कपडे धुतल्यावर हॅंगरला लावण्याची पध्दत आणि इस्त्री केल्यावर हॅंगरला लावायची पध्दत वेगळी असते. हे शिकून घ्या. किंबहुना हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे हॅंगर्स मिळतात. त्याचा ही शोध घ्या.
14. या सुटीत तुम्ही तुमच्या घराची ‘आर्ट गॅलरी’ पण करू शकता. सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांना समोर बसवून त्यांचे चित्र काढावे. मग मोठ्या माणसांनी त्याचप्रमाणे मुलांचे चित्र काढावे. प्रत्येक चित्रावर नाव न लिहिता चित्राखाली फक्त चित्रकाराचे नाव लिहावे. ही चित्रे भितींवर लावून त्यावर “आम्ही सर्व” असे शीर्षक द्यावे.
15. सेल्फी काढा पाच बोटांनी. एकाखाद्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर घरातल्या आरशासमोर खुर्ची घेऊन बसा. थोडावेळ निवांतपणे स्वत:ला पाहा. स्वत:कडे पाहा. मग आरशात पाहून स्वत:चेच मस्त चित्र काढा. चित्राखाली नाव न लिहिता चित्रातील व्यक्ती तुमच्या घरातल्यांना, शेजारच्यांना किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना ओळखता येते का पाहा.
16. सेल्फी धमाका करा. तुमच्या बिल्डिंगमधले, वर्गातले किंवा शाळेतले मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आपापल्या सेल्फी चित्रांचं प्रदर्शन भरवा. चित्रांखाली नावे …