“मुलानेच घेतली बापाची शाळा”

(वयात आलेल्या सगळ्या आई – बाबांसाठी)
– योगेश गोखले

सो S S बाबा chill , असं म्हणून माझ्याच खांद्यावर थोपटून मुलगा बाहेर पडला. मी अजूनही कन्फ्युज्ड आहे.

माझा मुलगा यंदा १०वी ला आहे. तसा बऱ्यापैकी हुशार आहे. आजच सकाळी त्याचा प्रिलिम चा रिझल्ट लागला. आम्ही दोघे उभयता शाळेच्या बोलावण्यावरून पालक मिटिंग ला गेलो होतो. आमच्या मुलाचा रिझल्ट आमच्या कडे दिला (हल्ली मुलांकडे रिझल्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, का मुलं फेरफार करतात , का घरी दाखवतच नाहीत , काय माहित ? पण आजकाल पालकांना बोलावून रिझल्ट द्यायची नवी पद्धत आहे ) आणि मग सगळ्या पालकांची “पेरेंट मिटिंग” झाली. मुलाला ८४% मिळाले होते. (पण हल्ली त्याने काय होतंय?).

क्लास टिचर ने सांगितलं की सगळ्याच मुलांना तसे कमी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता पुढचे दोन महिने सगळ्यांनी माना मोडून , दिवसाचे १८ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा , पालकांनी काय काळजी घ्यावी , मुलांना आहार काय दयावा, वगैरे वगैरे मार्गदर्शन झालं. मग प्रत्येक विषयाच्या टिचरनी अर्धा तासाचं सेशन घेतलं. प्रत्येकाने सांगितलं की सकाळी २, संध्याकाळी २ असा रोज त्यांच्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी क्लास टिचर ने परत अर्धा तास घेतला. हे ही सांगितलं की आम्ही मुद्दाम प्रिलिम चे पेपर खूप अवघड काढतो आणि तपासतोही खूप स्ट्रीक्ट. मुलांना कमी मार्क पडले की ती अजून अभ्यास करतात . आमच्या शाळेचा रिझल्ट कसा दर वर्षी १००% लागतो वगैरे.

आम्ही टिपिकल ओपन कॅटेगरी मध्यम वर्गीय असल्यामुळे लगेच हे सगळं सिन्सीयरली घेतलं. सौ ने सांगितलं की मी नेहमी त्याला सांगतच असते. तुम्ही जरा ओरडा. बाबांच्या सांगण्याने जरा वजन पडतं.
मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर चहा घेतला. चिरंजीव फुटबॉल खेळायला जायच्या तयारीत होते. मीच विषय काढला,

“काय , किती मार्क मिळाले?”

“तुम्हालातर माहित आहेत की”

“अरे पण मग कमी पडले , ८४% नी आजकाल कुठे काय होतं. हवं ते कॉलेज सोड , सायन्स ला पण ऍडमिशन मिळणार नाही. कमीत कमी ९४% तरी पडायला हवेत तर काहीतरी खरं”

तो नुसता हसला. मला त्याच्या या हसण्याची फार चीड येते. ते कुत्सीत च्याही पलीकडचे आहे असं मला वाटतं. स्वाभाविक , मी त्याला जरा मोठ्या आवाजात विचारलं

“काय म्हणतोय मी …हसण्यासारख काय आहे त्यात?”

“नाही बाबा मला गंम्मत वाटते की तुम्ही परस्परच ठरवलं की मी सायन्स ला जाणार आहे… म्हणून हसलो”

मला त्यानी बरोब्बर पकडलं होतं ..पण मी मोठा होतो ना ..त्याच अधिकाराने मी दरडावून सांगितलं

“प्रश्न तो नाही आहे ..आधी ९४% टक्के तर मिळवून दाखव ..मग पुढे काय शिकायचं ते बघू ”

“हा ..ते मिळतील ..९२% – ९४% मिळतील”

“अरे पण कसे ?..तू ८४% वरून ९४% ला कसा जाणार आहेस ? हे खेळणं वगैरे कमी करा आता ..जरा टेस्ट सिरीज लावा ..वेळ लावून पेपर सोडवा”

“बाबा chill ..मिळतील ९२%+”

“अरे गाढवा ते काय वरून पडणार आहेत का ..chill करून चालणार नाही तुला”

“बाबा ..जरा मोबाईल द्या तुमचा”

त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्याच्या ई-मेल मधून एक excel ओपन करून दाखवली. त्यात त्याच्या शाळेतील गेल्या ३ वर्षातल्या मुलांचा डेटा होता ..प्रत्येकाला पडलेले प्रिलिम चे मार्क आणि फायनल बोर्डाचे मार्क्स. स्पष्ट ट्रेंड होता की ऑन अन एव्हरेज ८ ते १० टक्के वाढतात.

“बाबा तुमच्या पेक्षा आमचं नेटवर्क आणि इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, शाळा मुद्दामच पेपर अवघड काढते आणि कडक तपासते , जेणे करून मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना वाटावं की अजून खूप अभ्यास करायला पाहिजे. हे तुम्हालाही आज शाळेत सांगितलं असेल पण तुम्ही पण तसं काही सांगणार नाही. मला खरंच कळत नाही इतर वेळेस तुम्ही आम्हाला जे trust आणि transparency वर लेक्चर देता ते आमच्या अभ्यासाच्या वेळी कुठे जातं. जर मुलांना रिऍलिस्टीक मार्क दिले तर मुलं काय हुरळून जाणार आहेत का ? उलट चांगले मार्क टिकवायचं टेन्शन जास्त असतं या कॉम्पिटेटिव्ह जगात. आणि प्रत्येकाला वाटतंच ना की मागच्या पेक्षा चांगलं करावं . मग रिऍलिस्टिक मार्क्स दिले तर बिघडलं कुठे ? प्रत्येक विषयाचा जर रोज ४ तास अभ्यास करायचा तर २४ तास अभ्यास झाला. कोणीतरी जरा लॉजिकल सांगायला पाहिजे ना ..मग खरं मोटिवेशन येईल नाहीतर हे सगळं फार डिप्रेसिंग आहे”

“आहो माझं ठीक आहे ..मला खात्री आहे की मी ९२% पर्यंत कसाही जाईन …पण मला काळजी निशित ची आहे. खरं तर तो ८०%-८२% पर्यंत जाईलही. त्याने प्रिलिम ला भरपूर अभ्यास केला होता. मीच त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पण या अवघड पेपर आणि आतिकडक तपासणीच्या नादात त्याला ६०% मिळाले. गेले २ दिवस डिप्रेस आहे. आता अभ्यासच करणार नाही म्हणतो कारण म्हणे मी काही बाकीच्यांसारखा हुशार नाही ..कितीही अभ्यास केला तरी ६०%. आई -बाबा पण खूप ओरडले त्याला. सहामाही ला ७०% वरून ६०% वर आला. लायकी काढली त्याची.”

“त्याच्या कडेच चाललोय फुटबॉल खेळायला.. हाच आता एक मार्ग आहे की त्याला या डिप्रेशन मधून बाहेर काढून परत अभ्यासाला लावण्याचा..अर्धा तास खेळणार आणि मग त्याच्या नकळत आज सायन्स चं काय वाचलं , काय डोक्यावरून गेलं ..काय कसं लक्षात ठेवलं ह्या गप्पा मारणार, म्हणजे माझी रिव्हिजन आणि त्याची नकळत तयारी…८-१० दिवसात त्याला पेपर सोडवायला लावतो..आमची आळी – मिळी गूप चळी. मीच तपासून रिऍलिस्टिक मार्क देणार. नाही त्याला ८०% + नेला तर नाव दुसरं”

“आणि माझी काळजी करू नका , मी तुम्हाला ९२%+ ची गॅरेंटी देतो. पण त्या पुढच्या २% साठी उगाच माझ्या मागे लागू नका. मी मनापासून प्रयत्न करीन पण त्या ऍडीशनल २% ची काही गॅरंटी नाही आणि उगाच त्या खात्री नसलेल्या गोष्टी साठी मला माझा संध्याकाळचा खेळ , तबल्याचा क्लास , मित्र बंद करायचे नाही आहेत. या जगात मध्यमवर्ग नामोशेष होत चालला आहे. तोच तर एक वर्ग होता ज्याने सगळं बॅलेन्स ठेवलं होतं, इन्कलुडींग सहिष्णुता आणि संस्कृती. ऑल इसम्स आर गुड आदर दॅन एक्सट्रीझम. एक्सट्रीझम दहशदवादाला जन्म देतो. मार्कांचेही तेच झालेय, अतिरेकी मार्क पाहिजेत .. ‘९८%’ नाहीतर मग ‘पास झाला तरी बास’ कॅटेगरी. हा पण एक दहशवादच नाही का ? ८०%-९०% मार्क , खेळ , मित्र , छंद , तबला-गाणं -नाटकं अशी मध्यममार्गी मुलं नकोच आहेत कुणाला. एक तर IIT नाहीतर ITI. खरंच अवघड आहे. अरे TII पण असू शकत ना..

अजूनही माझ्यातला बाप जागा होता. मी त्याला दरडावून विचारले

“तुला काय म्हणायच आहे ..आम्ही दहशदवादी आहोत का ? का आम्ही तुला दहशदवादी करतोय”

तो परत एकदा तसा हसला ..कुत्सित च्या पलीकडचा.

“बाबा प्रश्न माझा नाही आहे , शाळा आणि सुज्ञ पालक त्या निशित ला दहशदवादी करायला निघाले आहेत आणि कोणीतरी, म्हणजे मी, हे थांबवलेच पाहिजे”

“पण बाबा तुम्ही माझी काळजी करू नका – ९२% नक्की मिळवतो …chill”

“चला मी निशित कडे जावून तासाभरात येतो ..आल्यावर मॅथ्स चा पेपर सोडवायचाय”

माझ्याही नकळत मी उठलो आणि बोलून गेलो “मी पण येऊ का फुटबॉल खेळायला ?”

मुलाने येऊन मला खांद्यावर थोपटले .. “बाबा chill ..तुला झेपणार नाही”

“ए आई बाबासाठी एक कप आल्याचा चहा टाक”

तो बाय करून हसत गेला सुद्धा.

तो निशितला ८०% पर्यंत आणायला गेलाय. त्याने ९२% मिळवले आणि निशितला ८०% मिळाले तर माझ्या दृष्टीने ते १००% ठरतील हे नक्की !