लक्ष्मीची पावलं..
पूर्णिमा ऑफिसमधून निघतच होती, तितक्यात साहेबांनी बोलावल्याचा निरोप आला. केबिनमधे शिरताच साहेबांनी तिला एक लिफाफा दिला. तिनं तिथंच उघडून पाहिलं. पुण्याच्या एनआयबीएममधे एका आठवड्याच्या इन्फ्रास्ट्रक्टर फायनान्सिंगच्या ट्रेनिंगसाठी तिचं नॉमिनेशन होतं. दिल्लीतल्या मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीत एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तिची चांगलीच ख्याती होती. तिने सस्मित मुद्रेने साहेबांना ‘थॅंक्स’ सांगितलं. साहेब फायलीत गुंतले होते. तिनं अदबीने विचारलं, “सर, इफ यू डोंट माईंड…ट्रेनिंगनंतर मला तीन दिवसांची सुटी हवीय. माझं माहेर पुण्याचं आहे…” पहिल्यांदाच मान वर करून साहेब म्हणाले, “ओके, मॅम. फ्लाईटची तिकीटं त्याप्रमाणे बुक करायला सांगा.”
“थॅंक्यू सर” म्हणून ती बाहेर पडली. पाच वर्षापूर्वी बाबा गेल्यानंतर, ती एकदाही पुण्याकडे फिरकली नव्हती. हे ट्रेनिंग आलं नसतं तर, तो कधी योग आला असता ते देवच जाणे. दरवेळी पुण्याला जायचं म्हटलं की नवरोबा प्रदीप काहीतरी विघ्नच उभं करायचा. ‘आता काय आहे पुण्यात? तुझे आईबाबा तर या जगातच नाहीत. तुझ्या भावाकडे काय आहे म्हणून जातेस?’ असं वाट्टेल ते बडबडायचा. ‘यावेळी पुण्याला जाताना हा कसले विघ्न आणतो, तेच बघू या,’ असं मनातल्या मनात म्हणत ती घरी आली. ट्रेनिंगच्याविषयी प्रदीपला एक दोन दिवस आधी सांगावं हेच बरं, असं तिनं पक्कं ठरवलं.
शुक्रवारी रात्रीची जेवणं झाल्यानंतर तिनं सांगितलं, “प्रदीप, या सोमवारपासून दहा दिवसासाठी बाहेर जातेय. मला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगचं ट्रेनिंग आलंय.”
“अरे व्वा! अवश्य जा. मुंबईला ना?” तिने थंडपणे “एनआयबीएम, पुणे” असं सांगितलं. “हरकत नाही. तिथे रेसिडेन्शियल फॅसिलीटी आहे. तिथंच राहा म्हणजे झालं.” तो कुजकटपणे म्हणाला. तिने प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या प्रत्येक वाक्यात जनरल मॅनेजर असल्याचा त्याचा दर्प प्रकट व्हायचा. ज्या घरच्या लोकांनी याला जीवनसाथी म्हणून कन्या प्रदान केली, त्या लोकांविषयी याला इतका तिटकारा कशासाठी वाटावा? हे तिला न पडलेलं कोडं होतं. ती ते कोडं सोडवायच्या भानगडीत पडली नाही. एकुलता एक आज्ञाधारक मुलगा अथर्व बारा वर्षाचा आहे. एक मुलगी असती तर, कन्येची काय माया असते हे या कोडग्याला समजलं असतं, असं तिला उगाचच वाटून जायचं. पण देव थोडंच सगळ्यांना कन्यारत्न देतो?
शनिवारी संध्याकाळी फ्लाईटने निघाली आणि सहाच्या सुमारास पुण्यात येऊन पोहोचली. बेल वाजवताच, दार उघडायला सुनंदा वहिनीच आली. पूर्णिमाला अचानक दारात बघून ती दिग्मूढ झाली. नकळत तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. “हे काय वन्सं, अगदी अचानक? एखादा फोन तरी करायचास. किती दिवसांनी…” असं म्हणत तिने पाणावल्या डोळ्यांने मिठी मारली. पूर्णिमा तिच्या कानात हळूच कुजबुजली, “सीबीआयचे लोक धाड मारायच्या आधी फोन करतात का कधी? वहिनी, काय अवस्था करून घेतलीयस तू?” इतका वेळ लांब उभी असलेली शर्वरी धावत आली आणि आत्याला बिलगली. ती बरीच उंच झाली होती. पूर्णिमेने ठसक्यात सांगितलं, “वहिनी, मी तुझ्याकडे दहा दिवस राहणार आहे. तुझ्या हातचं चांगलंचुंगलं खायला. आणि तुला छळायलाही. राहू ना? सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ट्रेनिंग कॉलेजमध्ये असणार आहे. मी तुला माझ्या रात्रीच्या जेवणाची संधी देते.” असं म्हणत पूर्णिमेने जुनंपुराणं फ्रिज उघडलं. दुधाचं भांडं सोडून जवळपास ते रिकामंच होतं.
“काय आहे नं, वन्सं, कालच फ्रिजची साफसफाई केली. फार दिवसापासून राहिलं होतं.” सुनंदाने सावरण्याचा प्रयत्न केला. “वहिनी, मी फ्रेश होऊन येते. मला बाहेर जायचंय. आधी मस्तपैकी चहा कर. रात्री तुझ्या हातची कढी खिचडी खायची आहे. करशील ना?” सुनंदाने मान डोलावली.
फ्रेश होऊन चहा घेतल्यानंतर, ती थेट भावाच्या दुकानावर पोहोचली. तिला पाहताच विश्वासला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. “पुन्नु, तू आज अचानक पुण्यात कशी?”
“अरे मी इकडे ट्रेनिंगला आलेय. कंपनीच्या ऑफिसची कार होती. म्हटलं, जाताजाता दुकानात चक्कर टाकावी. दादा काय हे? पुढच्या पंधरवड्यात शाळा सुरू होणार आहेत ना? आपलं दुकान तर सगळं रिकामंच दिसतंय.” पूर्णिमानं असं म्हटल्यावर, विश्वास क्षणभर स्तब्ध झाला. नंतर केविलवाणं हसू आणत तो कसंबसं बोलला, “अग, पुढच्या आठवड्यात नवा स्टॉक येतोय. काय आहे ना, लोकांना पडून राहिलेला स्टॉक चालत नाही. त्यांना नव्या कोऱ्या पानांचा गंध आवडतो.” पूर्णिमा तिच्याच विचारात गुंतली होती. ती भानावर येत म्हणाली, “दादा, आपण रात्री निवांत बोलू या.” असं म्हणून ती पटकन निघून गेली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात काऊंटरवर एक व्यक्ती येऊन उभी राहिली. बघता क्षणीच एखादा उच्च अधिकारी असावा अशा व्यक्तिमत्वाचा तरूण होता.
“आपणास काय हवंय?” हे विचारायच्या आधी त्यानंच संवाद साधला, “हे बघा, काही होतकरू आणि गरजू विद्यार्थ्याना शालेय वह्या, पेन्सिल्स, कंपास बॉक्सेस पुरवायच्या आहेत. आमच्या शेटजींनी खास तुमच्याकडे पाठवलं आहे.” असं म्हणून त्या तरूणानं एक यादी पुढे केली. मनातल्या मनात आकडेमोड करत, विश्वास कागदावर हिशेब मांडत होता. हिशेब वीसेक हजाराच्यावर जात होता. एवढा माल उधारीत कोण देणार? असं विचार करत असतानाच, रोख वीस हजार रूपये काऊंटरवर ठेवत त्या तरूणानं सांगितलं, “मोठ्या विश्वासाने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. भाव वाजवी लावा. हे निरपेक्ष मनानं करत असलेलं धर्मादाय कार्य आहे. या कानाचं त्या कानाला लागू देऊ नका. दहा दिवसांनी येईन आणि राहिलेला हिशेब करून माल घेऊन जाईन. कळलं? माझं नाव अमेय निरगुडकर.” कच्ची पावती घेऊन, तो तरूण निघून गेला. त्याचा मोबाईल नंबर घ्यायचंही विश्वासला भान राहिलं नाही. कोविडमुळे गेली दोन वर्षे अतिशय खडतर गेली. आता चांगले दिवस येतील अशी आशेची किरणे दिसत होती.
पूर्णिमा घराजवळच्या सुपर मार्केटमधे शिरली. ट्रॉली भरून वस्तु, भाज्या आणि फळे घेतली. पेमेंट करून घरच्या पत्त्यावर पोहोचवायला सांगून शेजारच्या स्टेशनरी शॉपवर आली. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती. ‘मी एका फायनान्स कंपनीत आहे. स्टेशनरी दुकानासाठी कर्ज मागणीचा अर्ज आला आहे तर थोडीशी माहिती द्याल काय?’ असं म्हणून रोजची विक्री किती, नफ्याचं मार्जिन किती? हे सगळं तिनं जाणून घेतलं. त्यानंतर तिने लेटेस्ट खरेदीची बिलं मागून घेतली. त्यांच्या परवानगीने आठ दहा बिलांचे मोबाईलने फोटो घेतले. त्यांचे आभार मानून ती घरी आली. तिने घरात आल्या आल्या दादांना भेटून आल्याचं वहिनीला सांगितलं. तितक्यात सामानाची होम डिलीव्हरी आली.
लगेच लॅपटॉप उघडून ती काहीतरी करत बसली. दुकान बंद करून विश्वास आला. तो फ्रेश होऊन आल्यावर, मनसोक्त गप्पा मारत सगळ्यांनी कढी खिचडीवर ताव मारला. त्यानंतर विषयाला हात घालत पूर्णिमा म्हणाली, “दादा, तू प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून खेळतं भांडवल का घेत नाहीस? त्याला काय लागतं रे? ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा परवाना आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियलचे कोटेशन्स व बिलं. बस्स. ना स्वतःच्या भाग भांडवलाची गरज, ना जामीनदार आवश्यक. आणखी काय हवंय?”
“वन्सं, मीच कर्ज काढायला नाही म्हणते. ते आणखी कोण डोक्यावर घेणार, नाही ती चिंता.” सुनंदा बोलली.
“वहिनी, अग व्यापारासाठी काढलेल्या कर्जाची कसली चिंता करायची? ते का आपण उपभोगासाठी घेत आहोत काय? कर्जाच्या रकमेतून विक्रीसाठी लागणारा माल खरेदी करतोय. व्यापारासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते.” मोबाईलमधील बिलांचे फोटो फॉरवर्ड करून विश्वासला सांगितलं, “याप्रमाणे सर्व स्टेशनरी आणि कॉम्प्युटरसाठी लागणाऱ्या व विविध प्रकारच्या वस्तुंची यादी बनव आणि कोटेशन्स घेऊन ये. झेरॉक्स कम प्रिंटर मशीनचं कोटेशनही घेऊन ये. मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देते. आपण बॅंक प्रपोजल करू.” विश्वासनं मान डोलावली.
पूर्णिमा सकाळीच ट्रेनिंगसाठी निघून गेली. विश्वासने सामानाची यादी केली. स्टेशनरीसाठी वीस हजार रूपये अ‍ॅडव्हान्स दिलेल्या माणसासाठी होलसेल व्यापाऱ्याकडे जायचंच होतं. त्याने वीस हजार रोख देऊन सगळ्या मालाची ऑर्डर नोंदवली. मुद्रा लोनसाठी आवश्यक कोटेशन्स घेऊन आला. पूर्णिमाने सांगितलेल्या बॅंकेच्या ब्रॅंच मॅनेजरकडून अ‍ॅप्लीकेशन फॉर्म आणून भरून ठेवलं. पूर्णिमाने पुढच्या पाच वर्षाचे बॅलन्स शीट आणि नफातोटा पत्रक बनवलं. विश्वासला फॉरवर्ड करून प्रिंटाऊट काढून सगळी कागदपत्रे बॅंकेत सादर करायला सांगितलं. बघता बघता आठवडा झाला. पूर्णिमा रोज फोनवरून प्रदीपशी, मुलाशी ख्याली खुशालीचं मोजकंच तेवढं बोलत होती.
सोमवारी तिला सुटी होती. ती भावासोबत बॅंकेत गेली. तीन लाखाच्या कर्जाच्या कागदपत्रावर सह्या झाल्या. कोटेशन्स दिलेल्यांच्या नावाने बॅंकर्स चेक निघाले. व्यापाऱ्यांनी माल पाठवला. दुसऱ्या दिवशी झेरॉक्स-कम-प्रिंटर मशीनही आलं. “विश्वास स्टेशनर्स” हे नवं साईनबोर्ड लागलं. पुष्पहार घातलेल्या आईबाबांच्या तसबिरीकडे पाहिल्यावर, आज ते नक्कीच संतुष्ट झाले असतील असं पूर्णिमेला वाटून गेलं. कारण विश्वास शिक्षणात प्रगती करू शकला नाही याची आईबाबांना खंत वाटायची. राहायला बाबांचा हा टू बेडरूम्सचा फ्लॅट होता. पूर्णिमाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतर, बाबांनी उरलेली सगळी पूंजी दुकानावर खर्ची घातली होती.
सायंकाळची फ्लाईट होती. पूर्णिमा आवराआवर करत होती तेव्हा तिच्या कानावर पडलं, “अग, आई आत्याला ही साडी काय देतेयस? भारी साडी घेऊन द्यायचीस ना? ही साडी बाबांनी तुला दिवाळीसाठी आणलेली होती. तू यासाठीच घडी न मोडता ठेवलीयस का?” सुनंदा तिला समजावत म्हणाली, “अग, कोविडमुळे बाबांचा व्यापारच बंद होता तर मी कसं दिवाळसण साजरा करायचा सांग. आता व्यापार चांगला चालेल. तुझे बाबा या दिवाळीला छानशी साडी आणतीलच. नाही दिली तर मी मागून घेईन. बरं चल, आत्या निघेल आता. बाबाही येत असतीलच.”
त्या दोघी बाहेर येताच पूर्णिमा म्हणाली, “वहिनी, शर्वरी शाळेत गेली की तूही दुकानावर जात जा. आजूबाजूच्या ऑफिसेस, बॅंकांत व्हिजिटींग कार्ड देऊन, फोनवर सांगितलंत तर सगळी स्टेशनरी जागेवर पुरवू असं सांगा. आणि दुसरं असं की शर्वरीसाठी मला काहीही आणता आलं नाही, तू तिच्यासाठी एक ड्रेस घेशील?”
“अहो, कशाला?” असं सुनंदा म्हणत असतानाच पूर्णिमेने शर्वरीच्या हातात एक बंद पाकीट दिलं. “छकुली तुम्ही खरेदीला जाल त्या दिवशी हे पाकीट उघड. नाहीतर तुझी आई हे पैसे घरसामानासाठी वापरेल.” असं ती हसत हसत म्हणाली. तितक्यात विश्वास धापा टाकतच आला आणि म्हणाला, “अगं तो निरगुडकर आज चार वाजता येणार होता. तासभर वाट पाहून आलो.” पूर्णिमा गूढपणे हसत म्हणाली, “दादा, मला नाही वाटत तो परत येईल असं.”
सुनंदाने पूर्णिमेला हळदीकुंकू लावून साडी आणि चोळखण दिलं आणि घट्ट मिठी मारली. शर्वरी आत्याला प्रेमाने बिलगली. विश्वासचे डोळे नकळत ओलावले. कंपनीची कार आली. पूर्णिमा हसतमुखाने निघाली. शर्वरीनं सुनंदाच्या हातात पाकिट दिलं. पाकिट जड वाटत होतं. उघडून पाहतो तर काय- दोन हजार रूपयाच्या दहा नोटा होत्या! एक चिठ्ठी होती, “वहिनी, तुझ्या नणंदेकडून ही छोटीशी भेट. शर्वरीला एक चांगला ड्रेस घे, तू एक छानशी साडी घे आणि माझ्या भावासाठी पॅंट्स आणि शर्ट्स घे. मी पुन्हा कधी येईन ते माहीत नाही. शर्वरीच्या लग्नात मात्र मी दहा दिवस अगोदर येऊन राहीन. स्वत:ची आणि माझ्या भावाची काळजी घे.”
विश्वास अवरूद्ध कंठाने बोलला, “सुनंदा तू माझी लाज राखलीस. ऐनवेळी घरसामान मागवून घेतलंस ते.” सुनंदा बोलून गेली, “अहो, मी कुठे तुम्हीच तर..” तितक्यात विश्वासचा मोबाईल फोन खणखणला, “मी निरगुडकर बोलतोय. यावर्षी आमचं वह्या पेन्सिली वाटायचं रद्द झालंय. पुस्तकं वाटणार आहोत. आमचे वीस हजार रूपये अनामत म्हणून ठेवा. पुढच्या वर्षी बघू.” एवढं बोलून फोन कट झाला.
विश्वासने नंतर त्याच नंबरवर फोन लावला तर तो नंबर टेलिफोन बूथचा होता. निरगुडकर येणार नाहीत हे पूर्णिमेने आधीच सांगितलं होतं. विश्वासला एका मागोमाग घडत गेलेल्या घटनांची संगती लागली. निरगुडकरने दोन हजारच्या दहा कोऱ्या नोटा दिल्या होत्या. पूर्णिमेने दिलेल्या पाकिटातही दोन हजाराच्या दहा कोऱ्या नोटा होत्या. सगळं रहस्य स्पष्टपणे उलगडलं. विश्वास भावनाविवश होत म्हणाला, “सुनंदा, मला आज दत्ता हलसगीकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात. ‘आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे…मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना उचलून वरती घ्यावे…!’ माझ्या बहिणीने त्या ओळी सार्थ केल्या आहेत. ती काही दिवसासाठीच आली आणि जाता जाता आपल्या भावाच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटवून गेली.!”लक्ष्मीची पावलं.. व्यंकटेश देवनपल्ली ९५३५०२२११२

विश्वासने नंतर त्याच नंबरवर फोन लावला तर तो नंबर टेलिफोन बूथचा होता. निरगुडकर येणार नाहीत हे पूर्णिमेने आधीच सांगितलं होतं. विश्वासला एका मागोमाग घडत गेलेल्या घटनांची संगती लागली. निरगुडकरने दोन हजारच्या दहा कोऱ्या नोटा दिल्या होत्या. पूर्णिमेने दिलेल्या पाकिटातही दोन हजाराच्या दहा कोऱ्या नोटा होत्या. सगळं रहस्य स्पष्टपणे उलगडलं. विश्वास भावनाविवश होत म्हणाला, “सुनंदा, मला आज दत्ता हलसगीकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात. ‘आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे…मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना उचलून वरती घ्यावे…!’ माझ्या बहिणीने त्या ओळी सार्थ केल्या आहेत. ती काही दिवसासाठीच आली आणि जाता जाता आपल्या भावाच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटवून गेली.!”

cp