।। संत तुकारामांचे अभंगशतक ।।
कर्जदारांची कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत तुकाराम. हे सतराव्या शतकातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म, अनागोंदी त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. लोकांच्यावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा, देण्याचं काम केलं. रोजचे जीवन जगताना कशा प्रकारे जगावे हे आपल्याला त्यांच्या अभंगातून दिले. त्यांचे सर्व अभंग मानवी जीवनाला हितकारक, उपकारक ठरले आहेत. तुकारामांचे अनेक अभंग आहेत त्यातील शंभर अभंगांचे संक्षिप्त विवेचन सरळ, साध्या, सोप्या भाषेत असणारा “संत तुकारामांचे अभंगशतक” असा ग्रंथ डॉ.आ.ह साळुंखे यांनी आपल्याला समोर ठेवला आहे. हा ग्रंथ 191 पृष्टी असून शंभर अभंग या ग्रंथात असल्याकारणाने ग्रंथाचे नाव ‘संत तुकारामांचे अभंगशतक’ असे दिले आहे. या ग्रंथात एकूण सतरा प्रकरणे दिली आहेत. हे सर्व प्रकरण जन्म, विवाह, मृत्यू , गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंद, उत्सव, मंगलकाम, प्रसंग, कृतज्ञता, समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगाचे वाचन करू शकू असे अभंग आहेत. प्रथम ‘आईवडील’ या प्रकरणाने सुरुवात केली आहे. जगामधे जिथं आपलं मस्त नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. या पहिल्या प्रकरणात आठ अभंग दिले आहेत. दुसरे प्रकरण संत असं दिलं आहे. यातील पहिल्या अभंगाची सुरुवात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाने केली आहे.

जगात अनेक माणसं दुःखीकष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीचा रेट्यानं जेरीला आलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परस्थितीनं रंजीस आलेला असतो, गांजलेला-त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं मेटाकुटीला आलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दु:खी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे, असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो, तोच संत वा साधू आहे, हे ओळखावं. या प्रकरणात सहा अभंग दिले आहेत.
पुढे ‘हितासाठी उपदेश’, ‘शब्द’ अशी प्रकरणे दिली आहेत. त्यातील ‘शब्द’ या प्रकरणातील एक अभंग येथे मी देऊ इच्छितो. शब्द हे साधन अतिशय प्रभावी आहे, ते शस्त्रही आहे आणि म्हणूनच ते अतिशय जपून, काळजीपूर्वक आणि विवेकानं वापरलं पाहिजे, हा तुकारामांचा आग्रह होता. म्हणूनच शब्दप्रयोगाच्या बाबतीत ते समाजाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. कुणी अर्थहीन, कठोर, भावशून्य आणि प्रसंगी दुसऱ्याच्या काळजाला जखम करणारं बोलत असेल, तर आपण त्यापासून दूर राहावं, नाही तर तसं बोलण्याची आपल्यालाही सवय लागू शकते, हे समजावून सांगताना ते म्हणतात,
फटाक्याचे बडबडे चवी ना सवाद । आपुला चि वाद आपणासी ।।१।।
कोणे या शब्दाचे मरावे घसणी । अंतरे शाहाणी राहिले हो।।२।।
गाढवाचा भुंक आइकता कानीं । काय कोडवाणी ऐसियेचे?।।३।।
तुका म्हणे ज्यासी करावे वचन । त्याचे येती गुण अंगास ते ।।४।।
एखादा मनुष्य मागचापुढचा विचार न करता फटाफट बडबड करतो, त्याच्या बोलण्याला ना चव असते, ना स्वाद असतो. ते बोलणं काही हितकारक नसतं असं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन आपल्याच विश्वात मग्न होणं चांगलं. आपण आपला स्वतःशीच वाद करावा, संवाद करावा, हे उत्तम. स्वतःच स्वतःला प्रश्न विचारावेत आणि स्वतःच त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करावा. या आत्मवादातून, आत्मसंवादातून आपल्याला स्वत:च शोध घेता येईल. त्यातून आपल्याला आपले गुणदोष समजतील आणि आपण स्वतःचं शुद्धीकरण करू शकू, आपला विकास साधू शकू. दुसऱ्याचे नको असलेले शब्द ऐकून त्याच्याशी वाद घालण्याची घासाघीस करीत बसणं म्हणजे एक प्रकारे मरणंच होय. असं उगीच कुणी कशाला मरावं? त्यापेक्षा आपल्या आत डोकावून पहावं, आपल्या आतच असलेल्या सुखाच्या भांडाराचा शोध घ्यावा, हेच शहाणपणाचं होय.
त्यानंतर ‘अनुभव’, ‘चमत्कार’, ‘संसार’, ‘शेती’, ‘प्रयत्न’, ‘आघात’, ‘सत्य’, ‘शुद्धता’, ‘नम्रता, क्षमा, शांती’ अशा प्रकरणात अभंग देऊन त्याचे सोप्या भाषेत संक्षिप्त विवेचन करून दिले आहे. त्यानंतर सोळावे प्रकरण ‘मन’ असं दिले आहे. त्यामध्ये मनाविषयी दहा अभंग दिले आहेत. त्यातील दोन अभंगाच्या दोन-दोन ओळी देऊन त्यांचे संक्षिप्त विवेचन केलेले येथे मी थोडक्यात देऊ इच्छितो.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।
मनाचं आपल्या जीवनात किती असाधारण स्थान असतं, याचं वर्णन तुकारामांनी अतिशय मधुर भाषेत केल्याच इथं आढळतं. आपल्या जीवनात जे काही बरंवाईट घडतं, त्याच्या मुळाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपलं मनचं असतं, म्हणूनच, जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल, तर आपण आपलं मन सुंदर ठेवलं पाहिजे. जीवन स्वच्छ व्हावं, ते गढूळ बनविणाऱ्या सर्व प्रकारच्या किल्मिषांनी रहित व्हावं असं वाटत असेल, तर आधी ते मन प्रसन्न म्हणजे निर्मळ बनविलं पाहिजे. असं केलं असता आपले सर्व उद्दिष्टं पूर्ण होऊ शकतात.
चित्त समाधाने । तरी विषय वाटे सोने ।।१।।
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ?।।2।।
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ।।३।।
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।।४।।
माणसांना मन समाधानी ठेवलं पाहिजे. मन समाधानी असेल, तर विष देखील सोनं वाटू शकतं. याचा अर्थ, अतिशय घातक अशी गोष्ट देखील अतिशय आनंददायक वाटू शकते. कुठल्याही गोष्टीची अतिशय जास्त लालसा बाळगणं हे खोटं असतं, अहितकारक असतं, हे तुम्ही जाणावं, तुम्हाभल्या माणसांना मी काय सांगावं,असं ते म्हणतात. मन समाधानी नसेल, ते कुठल्या तरी चिंतेनं वा लोभानं तळमळत असेल, तर चंदनाचा स्पर्शही अंगाला पोळतो. मनाच्या अशा अवस्थेत कोणी अगदी पूजा केली, आणखी दुसरी कुठली कृती केली, तरी तिचा त्रास होतो. म्हणून, जीवनात आनंद मिळवायचा असेल, तर मन प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं. शेवटचे प्रकरण आनंद दिले आहे त्यातील शंभरावा अभंग हा
आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदची अंग आनंदाचे।।१।।
काय सांगो जाले काहीचिया बाही। पुढे चाली नाही आवडीने ।।२।।
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथे तिचा जिव्हाळा तेथे बिंबे ।।३।।
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ।।४।।
हे सर्व अभंग मानवी मनाला स्वतंत्र, प्रसन्न, विनम्र, सुखकारक ठरणारे, हितकारक, योग्य मार्ग दाखवणारे आहेत. हे अभंग आपण वाचून समजून घेतल्यास आपल्या समाजाचा निकोप आणि सर्वांगीण विकासाला नक्कीच हातभार लागेल.