संवाद : खारी बिस्किटांशी!
अनेकांना (म्हणजे अनेक मोठ्या माणसांना) मोठ्या माणसांशी बोलताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण यातल्याच अनेकांना असा प्रश्न पडतो की मुलांशी काय बोलायचे? आणि कसे बोलायचे? आणि सर्वात महान प्रश्न म्हणजे.. का बोलायचे?
असं का होतं..? कारण मुले खारी बिस्किटा सारखी असतात तर (तमाम) मोठी माणसे मारी बिस्किटा सारखी असतात. म्हणजे जगातले एक खारी बिस्किट दुसर्‍या खारी बिस्किटा सारखे नसते. प्रत्येकाचे पापुद्रे वेगवेगळे, प्रत्येकाचे थर असमान, बाहेरुन सारखी वाटली तरी प्रत्येकाची आतली रचना एकदमच भिन्‍न! म्हणून तर आपण म्हणतो, ‘प्रत्येक मूल वेगळं असतं, युनिक असतं.’ पण बहुतेक मोठी माणसं ही मारी बिस्किटा सारखी आतून बाहेरुन सारखीच गुळगुळीत असतात.
त्यामुळे मुले भेटल्यावर ‘आपल्यावेळी असं नव्हतं, आता कधीही पाऊस पडतो? हल्‍ली काय उकाडा वाढलाय? या सरकारचं काही खरं नाही. ब्रॅडमन इज ब्रॅडमन, नाही का?’ असे ‘मारी बिस्किट छाप’ प्रश्न विचारून बोलण्याची सुरुवात करता येत नाही. आणि सुरुवात होत नाही म्हणून तिथेच गाडी अडते.
म्हूणन मुलांशी काय बोलायचं, कसं बोलायचं आणि का बोलायचं? याविषयी खूप सविस्तरच लिहायला लागेल. पण ते जागे अभावी शक्य नसल्याने काही मुद्दे मात्र इथे देतो.
• सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांवर कदापी उपदेशाची फवारणी आणि त्यांच्यांत सुविचारांची पेरणी करू नये. आणि यामुळे मुलांवर सुसंस्कार होतात असा गैरसमज ही करुन घेऊ नये. आता हे वाचताना अनेकांना त्रास होईल. पण समजून घ्या संस्कार सुविचाराने नव्हे तर सुकर्माने होतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करता? यावर संस्कार अवलंबून असतात. ‘तुम्ही थोडसं चांगलं वागलात तर मुले खूप चांगलं वागतील’ अशी एक चिनी म्हण आहे.
• मुलाला हाक मारतान नेहमी त्याला त्याच्या नावाने हाक मारावी आणि ते ही मृदू स्वरात. कधीही हाक मारताना, ‘एsss, ए पोरा, बाळ्या, बाळू, ए छोट्याss, छोटूss’ असं कधी ही म्हणू नये. किंवा मुलांच्या शारीरिक व्यंगावरून. उदा. ए जाड्या, लुकड्या, ए बहिर्‍या अशी हाक मारू नये. यामुळे मुलांचा आत्मसन्‍मान दुखावला जातो. ‘मुलांना बोलवत असताना तुम्ही स्वत:लाच बोलवत असता’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.
• मुलांना बोलवताना किंवा मुलाला उद्देशून बोलताना कधीही मुलाकडे पहिले बोट रोखू नये. म्हणजे तर्जनीने खूण करून मुलांना बोलवू नये आणि मुलाकडे बोट रोखू नये. मुलांना बोलवताना बोटाचा नव्हे तर हाताचा उपयोग करावा आणि त्यावेळी पाच ही बोटे जुळलेली असावी. आणि अर्थातच चेहर्‍यावर हास्य असावे. थोडक्यात, आपण जेव्हा समोरच्या मुलाला जवळ बोलावतो तेव्हा त्या मुलाला आपल्या विषयी ‘विश्वास’ वाटला पाहिजे. हा विश्वास त्याला आपल्या जसा बोलण्यातून वाटला पाहिजे तसाच आपल्या देहबोलीतून ही वाटला पाहिजे.
• मुलांना त्यांच्या खाण्याच्या आवडी निवडी विचाराव्यात. वाचलेल्या पुस्तकांविषयी विचारावं. आवडणारे आणि नावडणारे विषय कुठले आणि का? असं ही विचारावं. केलेला प्रवास? त्यांचे नातेवाइक? आवडलेला सिनेमा किंवा गाणे? आवडता खेळ आणि हिरो, हिरॉइन? असं खूप काही जे मूलकेंद्री आहे. पण सगळ्यात मोठा धोका पुढे आहे. असे प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे मोठ्यांसाठी नवीनच किंवा अनाकलनीय असू शकतात. कारण अनेक मोठी माणसं त्यांच्या भूतकाळातच अडकलेली असतात. मुलाने सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर कळले नाही की अशी माणसे आपल्या भूतकाळात शिरतात आणि मुलांना छळू लागतात. उदा. ‘हॅss हे काय गाणं आहे? आमच्या वेळी काय गाणी होती? एकदम मेलडी. खोया खोया चॉंssद. ऐकलं आहेस तू? वगैरे.’ तुम्ही असं सुरू केल्यावर मुलांना एव्हढंच कळतं की, यांच्या नादाला लागू नये. इथे मुलांचं चूक नाही. लक्षात घ्या, मुलांनी सांगितलेलं पण न कळलेलं उत्तर समजून घ्यायला समोरचा माणूस तयार नाही किंवा समोरचा माणूस नव्याने कही शिकायला तयार नाही, हे जेव्हा मुलांना समजतं तेव्हा मुलेच तुमच्याशी बोलणं टाळतात. ‘मुलांना भूतकाळ नसतो. मुले वर्तमानात जगत भविष्याचा वेध घेत असतात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
• मुलांना नेमकं काय सांगावं? तुम्ही नुकत्याच शिकलेल्या काही नवीन गोष्टी मुलांना आवर्जून सांगाव्यात. तुम्ही वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकाविषयी जरुर सांगावं. शक्य असल्यास तुमची फजिती कशी झाली आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? हे अवश्य सांगावं.
• मुलं आपल्याशी बोलत असतात, तेव्हा ती आपल्यात दडलेल्या मुलाशी बोलत असतात, त्या आपल्यात लपलेल्या मुलाशी ते मैत्री करत असतात. आपल्यात लपलेलं मूल जर समोरच्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्‍न करत असेल तरच संवाद सुरू राहातो. म्हणून तर आपल्याला आपल्यातलं मूल जपावं लागतं आणि ते खट्याळ ही असावं लागतं. ‘ज्यांच्या हृदयातलं मूल जीवंत आहे तेच अनोळखी मुलांशी सुध्दा गप्पा मारू शकतात’ अशी एक चिनी म्हण आहे.
खरंतर ही यादी आणखी खूप वाढवता येईल पण इथे जागेअभावी हे शक्य नाही. ‘ज्या घरातील मुले पालकांसोबत निर्भयपणे संवाद साधत असतात, तेच पालक मुलांसोबत मोठे होतात’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.
…………………………………………………………………………
– राजीव तांबे.
– rajcopper@gmail.com