“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”

 

“काकू, जयेश आहे का घरी?”
“कोण रे?”
“मी हर्षवर्धन. जयेश आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात आहोत. काल दसऱ्याची सुट्टी होती, त्यामुळे आमच्या प्रोजेक्ट चं प्रिंटिंग राहिलंय. मी तीच हार्डडिस्क घ्यायला आलो होतो.”
“ये ना आत. पहिल्यांदाच आलास ना आमच्या घरी? जयेश पूजेला बसलाय. दहा-पंधरा मिनिटात होईलच त्याची पूजा.”
हर्षवर्धन बैठकीच्या खोलीत बसला. साधं पण स्वच्छ आणि अतिशय टापटीप असलेलं ते घर होतं. कसलीही महागडी सजावट नव्हती. देशोदेशीच्या आकर्षक वस्तूंनी भरलेल्या शोकेस नव्हत्या. चकचकाट नव्हता. त्या साधेपणाचा विचार करता करताच त्याचे डोळे दाराच्या उंबऱ्यापाशी खिळले. उंबऱ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला छान ‘खऱ्या’ फुलांचं तोरण होतं. तो खुर्चीतून उठला आणि जवळ जाऊन पाहू लागला, तोच जयेशची आई आली.
“अरे, उभा का? बस की निवांत. पाणी घे. नाश्ता तयारच आहे, जयेश आला की दोघांसाठी गरम गरम खिचडी घेऊन येते.”
“काकू, ही रांगोळी तुम्ही काढलीय का?”
“हो. का रे?”
“छान काढलीय. तुम्ही अशीच रांगोळी रोजच्या रोज काढता?”
“हो. रोजच काढतो आम्ही.”
जयेशची आई आत गेली.
हर्षवर्धनला त्याचं घर आठवलं. घरात तीनच माणसं. तो आणि त्याचे आईवडील. बाबा बिझनेस मध्ये बिझी आणि आई समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका. उच्चभ्रू सोसायटीत चांगला मोठा बंगला, पुढं-मागं मोठी बाग, दारात तीन आलिशान गाड्या. मोठा प्रशस्त दिवाणखाना, मोठं डायनिंग, घरात जिम, आई वडिलांच्या स्वतंत्र रिडींग रूम्स, प्रत्येकाला स्वतंत्र खोली, बागेत झोपाळा… पण काल दसऱ्याच्या दिवशी आपण दाराला तोरणही लावलं नाही आणि दारात रांगोळीही काढली नाही. खास मलेशियन वूड वापरून दरवाजा केलाय, पण आजपर्यंत कधीच यातलं काहीच दाराला लावलं नाही. का काढत नाही आपण रांगोळी? का लावत नाही आपण तोरण? हर्षवर्धन विचार करत राहिला..
“कधी आलास? बराच वेळ बसावं लागलं का तुला?” मागून जयेशचा आवाज आला अन तो भानावर आला.
“नाही रे. आत्ताच आलो जस्ट.”
“चल, तू हातपाय धुवून घे, आधी नाश्ता करूया.” नको-नको म्हणत असतानाही जयेशनं त्याला उठवलंच. दोघे स्वयंपाकघरात गेले. फुल कोर्स नाश्ता नव्हता. साबुदाण्याची खिचडी, दही, काकडीची कोशिंबीर, शेंगदाण्याचा लाडू आणि केळं असा छोटासा कोर्स होता.
जसजशी प्रत्येक गोष्ट हर्ष च्या डोळ्यांना दिसत होती, तसतसा तो अस्वस्थ होत होता. आपल्याकडे केवढा नाश्ता असतो..सलाड, साऊथ इंडियन फूड, गुजराथी स्टार्टर्स, नमकीन, ऑम्लेट्स, बॉईल्ड एग्ज, ब्रेड-बटर-जॅम-टोस्ट, फ्रुट ज्यूसेस, कॉर्नफ्लेक्स, चीज क्यूब्ज..केवढा नाश्ता असतो, पण ब्रेकफास्ट टेबलवर कुणीच नसतं. आपण एकटेच बसून खातो. किचनवर्क करणाऱ्या मावशी डिश देतात. घरी कुणी नसतंच.
दोघांनी खायला सुरुवात केली, तेवढ्यात आई लोणी-साखरेची वाटी घेऊन आली.
“घे. नैवेद्याची वाटी.” जयेशची आई म्हणाली.
ती वाटी हातात घेताना हर्ष च्या मनात विचार चमकून गेला, आपल्याकडे रेग्युलर बटर, पीनट बटर असतं, पण नैवेद्याची लोणी-साखर आपल्याकडे नसतेच. कारण, आपल्याकडे देवघरच नाही…!
“तू रोज पूजा करतोस?” त्यानं आश्चर्यानं विचारलं.
“हो. पाचवीत असल्यापासूनच.” जयेश उत्तरला.
“तुला बोअर नाही होत?”
“नाही. बोअर का होईल? उलट फार छान वाटतं मला. आमच्याकडे सकाळी देवाची पूजा मी करतो. दर गुरुवारी संध्याकाळी आरती असते. रोज सकाळी आणि संध्याकाळी अग्निहोत्र असतं. आम्ही सगळेच हे करतो.” जयेश सांगत होता.
दोघांचा नाश्ता होत होता आणि इकडं हर्षच्या मनात पुन्हा विचारचक्र सुरू..’आपल्याकडे तर देवघरच नाही. कुठलाही सण नाही, वार नाही, देव नाही, धर्म नाही, काहीही नाही. आपण कधी देवळात जात नाही, कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, आपल्याकडे तर गणपतीसुद्धा नाही. कारण, घरात कुणाला ह्यातलं काहीच पटत नाही आणि त्याची गरजही वाटत नाही. म्हणूनच, बहुतेक आपला जीव घरात रमतच नाही. नकोच वाटतं घरात यायला. घरी कुणी नसतं. चोवीस तास कामाला माणसं आहेत. बँक अकाउंट मध्ये भरपूर पैसे ठेवलेले आहेत. आत्ता आपण हजारो रुपये एका क्षणात खर्च करू शकतो. आपल्याकडे कितीतरी पर्फ्युम्स आहेस, पण इथला उदबत्तीचा वास त्या पर्फ्युम्सपेक्षा कितीतरी अधिक सुंदर येतोय.. देवघरासारखी एक साधी स्पिरिच्युअल गोष्ट आपण आपल्या घरात करू शकत नाही का?’
“ही घे हार्डडिस्क. आपलं प्रोजेक्ट ह्यात आहे.” जयेशनं हार्डडिस्क दिली. हर्षनं पाहिलं तर, त्या हार्डडिस्कवर गंधानं स्वस्तिक रेखलेलं होतं. पुन्हा एक आश्चर्याचा धक्का..
“अरे, ह्याच्यावर स्वस्तिक कशाला? हे काढलं म्हणजे ह्यात स्टोअर केलेलं आपलं प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार आहे का? हार्डडिस्कची सुद्धा पूजा?”
“काल दसरा होता. आपण शाळेत असताना पाटी पूजा नव्हतो का करत? तशीच पूजा आम्ही घरीसुद्धा करतो. शस्त्रपूजन म्हणून गाडीची, लॅपटॉपची पूजा करतो. सरस्वतीपूजन म्हणून अभ्यासाच्या साहित्याची पूजा करतो. तशीच हार्डडिस्कचीही पूजा केली.” जयेशने सांगितलं.
थोडावेळ बसून हर्ष तिथून बाहेर पडला. त्याला फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. आपण ह्या गोष्टी आपल्या घरात का करत नाही? काय हरकत आहे ? आपण अगदी देव धर्माच्या आहारी गेलो नाही तरी निदान देव मानायला तरी अडचण काय आहे? असे अनेक विचार त्याच्या मनात गर्दी करत होते. काही सुचत नव्हतं, पण मनातली गुंतागुंत फार वाढली होती. सगळा दिवस असाच अस्वस्थ मनस्थितीत गेला.
संध्याकाळी अगदी न राहवून त्यानं पुन्हा जयेशला फोन लावला. “जयेश, मी जर थोडा वेळ घरी आलो तर चालेल का रे?”
“ये की. काय विशेष?”
“आलो की सांगतो.” संध्याकाळी हर्ष जयेशच्या घरी पोचला. घरी आल्या आल्या एक छान गंध त्याला जाणवला. दारातून डोकावून पाहिलं तर जयेशचे बाबा घरात सगळीकडे धूप फिरवत होते. धुराची वलयं उमटत होती. हर्षनं दारावर टकटक केली, बाबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला आत येऊन बसण्याची खूण केली, हर्ष येऊन बसला.
“जयेश, तुझा मित्र आलाय बघ.” बाबांनी जयेशला हाक मारून सांगितलं. हर्ष ला वातावरणातला वेगळेपणा जाणवत तर होता, पण त्याचं कारण मात्र उमगत नव्हतं. एखाद्या घरातलं वातावरण इतकं प्रसन्न आणि आनंददायक कसं असू शकतं, हाच प्रश्न त्याला पडला होता.
“काका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?” हर्ष नं विचारलं.
“अरे, विचार की. औपचारिकता कशाला हवी?”
“मला तुमच्या घरी आलं की, काहीतरी वेगळंच वाटतं. एकदम छान वाटतं. असं मस्त फिलिंग मला आमच्या घरी का नाही येत? मला कळतच नाही.” मळमळ ओकून टाकावी तसा हर्ष भडाभडा बोलत होता. जयेशचे बाबा शांतपणे ऐकत होते. गप्पांना काहीतरी निराळाच सूर लागलाय हे जाणवून आईसुद्धा बाहेर आली.
घरी कोणकोण असतं, काय वातावरण असतं, आई वडिलांचा स्वभाव, वागण्याची पद्धत सगळं सगळं त्यानं सांगून टाकलं. “काका, हे सगळं असं का आहे? मला तुमचं घर खूप आवडतं. इथंच राहावं असं वाटतंय.” हर्ष म्हणाला.
“हर्ष, तू आमच्या जयेश चा मित्र. जसा आम्हाला जयेश, तसाच तू. तुला कधीही वाटलं तरी हक्कानं ये, आम्हाला आवडेलच.” जयेश ची आई म्हणाली.
“हर्ष, अरे आपल्यापैकी प्रत्येकालाच त्याच्या जन्मानुसारच कुटुंबातून कुठला न कुठला तरी वारसा मिळालेला असतो. माणसं त्याच गोष्टींचं आचरण करत असतात. आम्ही ते करतो. पण या गोष्टी न करणारी कुटुंबं चुकीची असतात असं नाही. तुझे बाबा कंपनीचं काम किती प्रामाणिकपणे करतात, आई किती मुलांना शिकवते.. भलेही ते देवधर्म, कुळाचार, जपजाप्य करत नसतीलही, पण त्यांचं सगळं काम ते श्रद्धेनंच करतात ना.. तेच महत्वाचं असतं.” जयेश चे बाबा त्याला समजावून सांगत होते.
“तुमच्या घरी देवघर नाही म्हणतोस, आईबाबा नास्तिक आहेत म्हणतोस. पण तुझ्या बाबांनी कोविड काळात पीएम रिलीफ फंडाला पाच लाख रुपयांची रक्कम दिली, हे वर्तमानपत्रात वाचलंय आम्ही. आईनं जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी एक हजार झाडं लावली, हेही जयेशनं सांगितलं आम्हाला. सुट्टीच्या दिवशी अंधशाळेत आई शिकवायला जाते, बाबा नियमितपणे रक्तदान करतात, हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्यांच्या आणि आमच्या श्रद्धा वेगळ्या आहेत, पण ते त्यांच्या पद्धतीनं गरजू लोकांना, समाजाला मदतच करतायत ना.. आपल्या कामामध्येच देव पाहणारी माणसं आहेत ती. आपण त्यांच्या ह्या वृत्तीचा आदरच केला पाहिजे.” बाबा म्हणाले.
“ते सगळं बरोबर आहे काका. पण हे सगळं देवाचं करायला हरकत काय आहे? तेही करावं आणि हेही करावं ना.. प्रॉब्लेम काय आहे? बरं, त्यांना पटत नसेल तर त्यांनी करु नये, पण मला का बरं बंदी? हे चुकीचं नाहीय का? आमच्याकडे साधा गणपतीसुद्धा बसवत नाहीत आणि मलाही करु देत नाहीत. काल दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घरात पूजा- बिजा नव्हती. आई तर सकाळीच कुठेतरी बाहेर गेली होती. कसलातरी इव्हेंट होता म्हणे.” हर्ष कातावून म्हणाला.
“म्हणजे, तू आजचा पेपर वाचलेला दिसत नाही.” बाबा म्हणाले.
“नाही वाचला. सबमिशन च्या गडबडीत राहून गेलं.” हर्ष म्हणाला.
“ही बघ बातमी.” बाबांनी त्याला एक बातमी दाखवली.
हर्ष च्या आईच्या पुढाकाराने काही संस्थांनी दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी आपट्याची झाडं लावली असल्याची बातमी होती.
“अरे, बघ किती गैरसमज करून घेतलास. आई देवाचं च तर काम करतेय ना.” बाबा म्हणाले.
“ह्यात कसलं आलंय देवाचं काम?” हर्ष पुटपुटला.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे बाबा. तुला माहीत नाही? अरे, निसर्गाची पूजा करणं हीच खरी देवपूजा आहे असं ते म्हणतात. आपण मूर्तीमध्ये देव शोधतो, पण खरं तर तो निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत आहे, असं त्या अभंगात म्हटलंय.” जयेश मध्येच बोलला.
हर्ष विचार करत होता, त्याची चिडचिड, उदासीनता विरघळत चालली होती. आपले आईबाबा अगदीच चुकीचे नाहीयत, हे त्याला उमगायला लागलं होतं. कपाळावरच्या आठ्यांचं जाळं कमी व्हायला लागलं होतं.
“त्यामुळं, आईचं काही चुकलेलं नाही. आपला दृष्टिकोन चुकतोय. तू सगळ्या सणवार, उत्सवांना आमच्याकडेच येत जा. घरात त्यावरून आईबाबांशी वाद घालू नको. आलं का लक्षात?” जयेशची आई म्हणाली.
” हे बघ, सगळे प्रश्न लगेच एका रात्रीत सुटले पाहिजेत असं होत नसतं. वेळ तर लागणारच. माणसांचे विचार बदलणं ही मोठी प्रोसेस आहे राजा. आता तू ह्यावर फार विचार करत बसू नकोस. त्यापेक्षा छान एकत्र जेवायला बसूया. टेन्शन घेऊ नका. भरपूर अभ्यास करा. ते आत्ता जास्त महत्वाचं आहे ना..” बाबा म्हणाले.
“हो काका.”
“सबमिशन संपलं की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घरी जेवायलाच ये.” आई म्हणाली. हर्षनं मान डोलावली.
“पण आई बाबांचं मत बदलायचं कसं करायचं?” हर्ष नं पुन्हा शंका काढलीच.
“आपण असं करु, दिवाळीत तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला या. मग तेव्हा आईबाबांना काय आणि कसं सांगायचं हे आपण ठरवूया. चालेल का?” बाबा म्हणाले.
“हो चालेल काका. मी आई बाबांना आधीच सांगून ठेवतो तसं.” हर्ष चा चेहरा छान उजळला होता.
“चला, हातपाय धुवून घ्या. स्वयंपाक तयार आहे. मी पानं घेते.” आई हसत म्हणाली. आणि बराच वेळ जमलेली बैठक एकदाची समेवर येऊन पांगली.
सगळ्यात खूष होता तो जयेश. आपल्या आईबाबांच्या समजावून सांगण्यामुळे आपल्या मित्राचं बदललेलं नवं रुप पाहून..!
©मयुरेश उमाकांत डंके
मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.