समुपदेशनाची गरज आणि महत्व

अगदी सहा महिन्याचे बाळ सुद्धा आपल्या नैसर्गिक मनमोहक हालचाली करून जवळच्या व्यक्तीचे मन आपल्याकडे आकर्षित करते, वाढत्या वयानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्याला जवळ घ्यावे, आपल्यावर खूप प्रेम करावे, आपल्यासोबत खूप गप्पा माराव्यात, आपल्यासोबत भरपूर खेळावे अशी अपेक्षा ठेवते, दोन वर्षाच्या मुलाची याच अपेक्षेतून सतत बडबड सुरूच असते. पुढे शाळेत जायला सुरुवात झाली की कितीतरी गोष्टीची खटाटोप सुरु असते, किशोरावस्थेत मित्र, शिक्षक, कुटुंब यांच्याकडून अपेक्षा या असतातच.

परंतु या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर मुल चिडचिड करते, रडके बनते, आक्रमक किंवा भावनिक होते, कुठेतरी स्वतःला कुटुंब, शाळा आणि मित्र यांच्याकडून आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचे वाटते. मग त्याच्यामध्ये एकटेपणाची आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. साहजिकच अशा मानसिकतेचा परिणाम त्याच्या मेंदूवर होतो. मेंदूच्या कार्यपद्धतीत हळूहळू अडथळा निर्माण होतो, मेंदूतून स्त्रावणाऱ्या जैवरसायनांचा समतोल बिघडतो. येथूनच त्याच्या व्यक्तिमत्वाला चुकीच्या सवयी लागण्याची सुरुवात होते.

आपल्यावर इतरांनी रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे हे कोणालाच आवडत नाही. मग मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुटुंब आणि शाळा येथे सतत रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे असेच होत असेल तर याचा परिणाम सुद्धा मुलांच्या मेंदूवर होतो.

मुलांच्या मेंदूच्या खालच्या भागात असलेला भावनिक भाग (एमिग्डला) सतत कार्यन्वित होतो. याउलट मेंदूच्या वरच्या भागात कॉर्टेक्स एरिया मध्ये असलेल्या उच्च बौद्धिक भागात पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि ऑक्सिजन पोहचू शकत नाही, त्याचा परिणाम मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यावर होतो. म्हणजेच याचा परिणाम मुलांच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा पडतो.

मुलांच्या मेंदूचा भावनिक भाग (एमिग्डला) सतत एक्टिव्ह राहिला तर मुलांची समजून घेणे, लक्षात ठेवणे, आठवणे, अचूकता, वैचारिक आणि निर्णयक्षमता, समयसूचकता ही बौद्धिक कौशल्य कमी होतात. तर याउलट आळस, दुर्लक्ष, खोडया करणे, नको त्या गोष्टी करणे, अशा विविध कृती सुरु होतात. यामुळे हळूहळू अशा मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत जाते.

मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची सुरुवात त्याच्या सभोवताली असलेल्या कौटुंबिक, शेजारील, शाळेतील वातवरणातून झालेली असते. म्हणूनच अशावेळी बालक आणि पालक सर्वांनाच समुपदेशन घेण्याची आवशकता असते. प्रशिक्षित आणि कौशल्य असलेला समुपदेशक अशा मानसिकतेतून काही उपचारात्मक पद्धतीच्या साह्याने मुलांना अशा मानसिकतेतून सहज बाहेर काढू शकतो