स्वत्व अधोरेखित करणारे ‘स्वराज्य@७५`

मूळ लेखक :जे. नंदकुमार

अनुवादक : डॉ. मोहिनी पाठक

प्रकाशक : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

पृष्ठसंख्या : १६८.

मूल्य : १५०₹ टपाल ३०₹ एकूण १८०₹

 

पुस्तक परिचय: पवन बोरस्ते

साभार मुंबई तरुण भारत

स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचा ‘स्वत्व` हा महत्त्वाचा ऊर्जास्रोत होता, ज्यामुळे त्यांना परकीय आक्रमणापुढे शरणागती न पत्करता हिमतीने लढण्याची प्रेरणा मिळाली. भारतातील विविध भागांसह अगदी काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभ्या केल्या. आणि यापैकीच काही महत्त्वाच्या चळवळींच्या घटनाक्रमाची माहिती ‘स्वराज्य@७५` या पुस्तकातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.

सध्या देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी अर्थात अमृतमहोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य ही काही सहजासहजी मिळालेली गोष्ट नाही. त्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात नररत्नांनी, रणरागिणींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याची लढाई अनेक मार्गांनी लढली गेली, ज्यामध्ये क्रांतिकारी, समाजसुधारणा, राजकीय आणि सेवेच्या माध्यमांतून स्वातंत्र्य अशा चार प्रमुख विचारधारा पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक घटकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला. या सर्व बिंदूंना समोर ठेवून यासंदर्भातील माहिती समोर आणण्याचे काम ‘भारतीय विचार साधना` करीत आहे. इतिहास वाचून तसाच सोडून द्यायचा नसतो, तर त्या इतिहासापासून धडा घेऊन भविष्यात सावध राहावे लागते आणि तेच काम या पुस्तकामार्फत करण्यात आले आहे. २०१९च्या विजयादशमीच्या दिवशी संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सामाजिक परिवर्तनासाठी ‘स्व-केंद्रित` सामूहिक दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला होता. भौतिक पातळीवर आपल्या प्रयत्नांची फळे आणि त्यांचे परिणाम ‘स्वत्व` या तत्वानुसार व्हायला हवेत. तेव्हाच भारत ‘आत्मनिर्भर` होण्यास पात्र होईल, असेही मोहनजी भागवत म्हणाले होते. स्वातंत्र्यलढ्यातील या योद्ध्यांचा ‘स्वत्व` हा महत्त्वाचा ऊर्जास्रोत होता, ज्यामुळे त्यांना परकीय आक्रमणापुढे शरणागती न पत्करता हिमतीने लढण्याची प्रेरणा मिळाली. भारतातील विविध भागांसह अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभ्या केल्या आणि यापैकीच काही महत्त्वाच्या चळवळींच्या घटनाक्रमांची माहिती ‘स्वराज्य@७५` या पुस्तकातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वैचारिक संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील भाषणाचे काही भागदेखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. पुस्तकात एकूण १० प्रकरणे असून पाच परिशिष्ट आहेत.

पहिल्या प्रकरणातून आपल्याला पुस्तकाची नेमकी ओळख अगदी थोडक्यात होते. दुसऱ्या प्रकरणात भारतीय स्वातंत्र्यचळवळीची ठळक अशी सहा वैशिष्ट्ये मांडण्यात आली आहेत. आजही अनेकजण स्वातंत्र्य चळवळीची सुरूवात १८८५ साली स्थापन झालेल्या काँग्रेसशी करतात, जे साफ चुकीचे आहे. अनेकजण स्वातंत्र्य चळवळीची वर्षे १५० ते २०० वर्षांपर्यंत ताणतात. १८५७च्या युद्धाला ब्रिटिशांनी ‘शिपायांचा विद्रोह `म्हणून संपवले खरे; पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला ‘भारताचे स्वातंत्र्य युद्ध` असे नाव दिले. मात्र, त्यांनी कधीही त्याला प्रथम युद्धाचा दर्जा दिला नाही. कारण, सावरकरांना ठाऊक होते की, याधीही भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. उदाहरणार्थ, त्यावेळचे त्रावणकोरचे (आताचे केरळ) सेनानी मार्तंड वर्मा यांनी बलवान डचांचा १७४१ साली संपूर्ण पाडाव केला. या प्रकरणात या उदाहरणावरून भारतीयांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी किती मोठा संघर्ष केला, हे समजते. म्हणूनच की काय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खूप काळ चाललेली चळवळ असे म्हटले जाते. ही चळवळ देशव्यापक, सर्वसमावेशक, बहुआयामी कशी होती, हे सांगत ‘स्वत्वा`च्या प्रकटीकरणावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, लोकमान्य टिळक, दयानंद सरस्वती, स्वामी श्रद्धानंद, अबनींन्द्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, राजा रवि वर्मा, नंदलाल बोस यांच्या चळवळींचा धावता आढावा घेऊन कालीघाट चित्रशैलीची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कम्युनिस्ट पार्टी आणि मुस्लीम लीगच्या संबंधांवर भाष्य करत फाळणी हा स्वातंत्र्य चळवळीचा दुःखद अंत कसा होता, हे अगदी मुद्देसूद पद्धतीने पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात मांडण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात धर्मप्रचार, पोपची योजना आणि टॉर्डेसिलसचा करार याविषयीच्या माहितीबरोबरच युरोपियन शक्तींचा प्रवेश कसा झाला आणि विस्तार कसा होत गेला, याविषयी माहिती मिळते. याच युरोपियन वसाहतवाद्यांचा भारतही बळी ठरला. यामध्ये प्रामुख्याने पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिशांनी भारताची लूट आणि शोषण कसे केले, हे सोदोहारण सांगितले आहे. याव्यतिरिक्तही इतर शक्ती जसे की ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्वीडन यांनीही भारतात बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात त्यांना अपयश आले, याविषयी मला प्रथमच माहिती मिळाली.

चौथ्या प्रकरणात तत्कालीन भारताची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारतात वसाहतींचे आगमन झाल्यानंतरची समकालीन परिस्थिती अतिशय सोप्या शब्दांत सांगितली असून काही आवश्यक तिथे तक्त्यांचाही समावेश आहे. लाला लजपतराय लिखित ‘इंग्लंडचे भारतावरील ऋण` या पुस्तकाच्या प्रस्तावनेचाही आधार घेऊन विषयाची मांडणी अधिक सखोल करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. भारतातील कापड उद्योग व हस्तकलांवरील परिणाम जाणून घेतल्यानंतर भारतीय शेतीचे व्यापारीकरण, सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती आणि ब्रिटिश ठसा त्याचप्रमाणे स्त्रियांची परिस्थिती आणि शिक्षणाच्या मुद्द्यालाही चौथ्या प्रकरणातून हात घालण्यात आला आहे. पाचव्या प्रकरणात भारतीय स्वातंत्र्याबाबतची मिथके, असत्ये आणि अपप्रचाराचा भांडाफोड करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते, पाश्चात्य लेखकांनी आपला इतिहास लिहिल्याने आपली मने कमकुवत होण्याखेरीज दुसरे काहीही होत नाही. त्यामुळे आता आपला इतिहास भारतीयांनीच लिहायला हवा, हे स्वामी विवेकनंदांचे आवाहनही मनाला भावते. भारतीयांना स्फुरण आणणारा इतिहास लिहिला खरा, मात्र तो दाबला गेला. तो कशाप्रकारे आणि का दाबण्यात आला, याची उकल या प्रकरणाच्या सुरूवातीलाच आपल्याला होते. विशेष म्हणजे, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याची थोडक्यात माहितीही या प्रकरणातून ज्ञात होते. वसाहतवादी शासक आणि त्यांच्या गुलामांनी लिहिलेला इतिहास, राष्ट्रीय नेतृत्वाला सोयीस्कररित्या डावलणे, याबरोबरच डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचा कसा विपर्यास केला, ही माहिती तर डोळ्यात अंजन घालणारी आहे.

सहाव्या प्रकरणाच्या सुरूवातीला भारतीय लढ्याची खरी प्रेरणा किंवा उत्तेजना नेमकी काय होती, याचे श्री अरविंद यांनी केलेले विश्लेषणही वाचकाला खिळवून ठेवते. हिंदुत्वाचे अनेक अवतार आणि पैलू उलगडताना काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला उल्लेखही महत्त्वपूर्ण आहे. कारण, भगतसिंगांचे राजकीय गुरू लाला लजपत राय यांनी सावरकरांच्या वीरता आणि निर्भयतेची प्रशंसा केली होती, हा मुद्दा प्रथमच ज्ञात झाला. यावरून सावरकरांचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान हिमालयाएवढे होते, याची प्रचिती येते. टिळकांच्या ‘श्रीमद्भगवद्गीता रहस्य` या ग्रंथाची निर्मिती आणि उद्देश या प्रकरणातून आपल्याला समजावून घेता येतो. महात्मा गांधी आणि भगवद्गीता याबद्दलही विस्तृत माहिती या प्रकरणातून मिळते. सातव्या प्रकरणात विस्तृत पण अतिशय मुद्देसूद असा स्वातंत्र्य चळवळीचा घटनाक्रम वाचायला मिळतो. सुरुवातीला वास्को-द-गामाच्या प्रवेशानंतर अँग्लो-डच चढाओढीची माहिती मिळते. १७५८ ते १८५५ पर्यंतच्या प्रादेशिक अस्मितेचा उदय मांडताना प्रादेशिक राज्यांच्या उदयाचीही माहिती दिली गेली आहे. ज्यात राजपूत, म्हैसूर, केरळ, जाट, शीख आणि मराठ्यांच्या साम्राज्याच्या उदयाची माहिती मिळते. १७७५ ते १८१९ या कालखंडात ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये झालेली तीन युद्धे, १८४५ ते १८४९ या दरम्यान झालेली इंग्रज आणि शिखांमधील दोन युद्धांची माहिती थोडक्यात सांगितली आहे. तसेच संन्यासी, कुंभमेळा, विजयनगर राजा, बिदनूरच्या घोड्यांची क्रांती, केरळचा वर्मा पळहस्सी राजा व वेलुत्तम्पी दलावचे बंड, पाळेगार आणि भिल्ल क्रांती, पाईक, खासी, संथाळ आणि आहोमांचा विद्रोह, सिंगफोस, खोंडचे बंड, पागल पंथी आणि कुका चळवळ, रामोशी आणि लष्करी उठाव, १८५७चे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध, राणीचा जाहीरनामा याविषयीची माहिती अतिशय संक्षिप्त स्वरूपात मिळते. १८६० ते १९०५ दरम्यान ‘हिंदू मेळा`, ‘अभिनव भारत`, ‘इंडियन नॅशनल काँग्रेस`, ‘अनुशिलन समिती`, ‘युगांतर` या राष्ट्रवादी संस्थांचा परिचय आपल्याला होतो. वंगभंग आंदोलनाच्या यशानंतर १९४७ची फाळणी थांबवण्यात आपल्याला यश का आले नाही, याची प्रमुख सहा कारणे आपल्याला अंतर्मुख करून सोडतात. त्यातील प्रमुख कारण म्हणजे हळूहळू भारतीय स्वत्वाचे झालेले खच्चीकरण. यानंतर ‘होमरूल`पासून काकोरी हत्याकांड ते देशातील विविध भागातील चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला असला तरीही तो पूर्ण स्वतंत्र झालेला नव्हता. कारण, ५६५ संस्थाने स्वतंत्र होती. त्यामुळे या सर्वांना एकत्र आणणे महत्त्वपूर्ण होते. यामागील प्रयत्नांचा मागोवा आठव्या प्रकरणात घेण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने जुनागड, हैदराबाद, काश्मीर, गोवा, पुद्दुचेरी हे प्रदेश भारतात विलीन करण्यासाठीचा संघर्ष विशद करण्यात आला आहे. अनेक कारणांनी भारताबाहेर गेलेल्या लोकांचाही स्वातंत्र्यलढाईत मोलाचा वाटा होता. कारण, त्यांच्यामुळेही ‘स्वत्वा`च्या संकल्पनेला खतपाणी मिळाले. नवव्या प्रकरणात स्वातंत्र्याच्या लढाईत परदेशी लोकांची भूमिका कशी होती, याविषयी विस्तृतपणे माहिती मिळते. दहाव्या आणि शेवटच्या प्रकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांची उदाहरणे समोर ठेवून विचारधारेच्या विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच नेहरूंमुळे देशाला कशाप्रकारे विविध पातळ्यांवर नुकसान आणि मानहानी सहन करावी लागली, याची प्रचिती या प्रकरणातून वाचकाला येते. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा उंचावली असून ‘स्वत्वा`च्या दिव्याला चेतवण्यासाठीची लढाई आता सुरू झाली आहे, हे शेवटचे वाक्य काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाही. दहा प्रकरणांनंतर पहिल्या आणि दुसऱ्या परिशिष्टात अनुक्रमे वेलू थम्पी दलवा यांची कुंदारा उद्घोषणा व जंबूद्वीप उद्घोषणा देण्यात आली आहे. मेवाडचे महाराणा फत्तेह सिंह दिल्ली दरबारासाठी निघाले तेव्हा केसरीसिंह बारहट यांनी एक व्यंगकृती पाठवली. ज्याचे नाव होते, ‘चेतवानी रा चुंगट्या` ज्या आपल्याला तिसऱ्या परिशिष्टात मराठी भाषेत समजून घेता येतात. चौथ्या परिशिष्टामध्ये १९३६ साली लखनौत महात्मा गांधींच्या ‘हिंद स्वराज` आणि ‘ग्राम स्वराज` या मुद्द्यांशी फारकत घेऊन नेहरूंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला उद्देशून केलेल्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. पाचव्या आणि अखेरच्या परिशिष्टामध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने ‘स्व` कसा गमावला, हे गांधीजी आणि नेहरू यांच्यातील संवादामुळे लक्षात येते. एकूणच ‘स्वत्वा`चे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकात अगदी युरोपियन वसाहतवादापासून अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंतचा भारत या कालातील भारतातील चळवळ, बंड, विद्रोह, परिस्थिती व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यात आला आहे. पुस्तक वाचण्याबरोबरच लवकर समजणेदेखील अवघड आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच मुद्द्यांची सांगड घालत वाचनास सुरूवात केली, तर भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि भारलाला मारक ठरणाऱ्या गोष्टी आणि व्यक्तींची उकल आपल्याला पुसत्काच्या साहाय्याने होते.

मुखपृष्ठावर अमृतमहोत्सवी ७५ आकडा अतिशय कल्पकतेने साकारण्यात आला असून पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम आहे. अचूक संपादनासह प्रकाशकाचे मनोगत आणि प्रस्तावनाही तितकीच हृदयस्पर्शी आहे. विशेष बाब म्हणजे, इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद कसा असावा, याचे हे पुस्तक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. आवश्यक त्या ठिकाणी संदर्भांचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. पुस्तकाची किंमतही अगदी सामान्यातील सामान्य वाचकाच्या खिशाला झेपेल अशी असून संग्रही ठेवावे, असे हे पुस्तक आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा फारसा समोर न आलेला इतिहास वाचण्यासाठी ‘स्वराज्य@७५` हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होवो व भारतीय नागरिक जागरूक होवोत, या अपेक्षेसह या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांना शुभेच्छा…