“हो.. माहितीये मला..”

महाराष्ट्रात सध्या जे काय चाललंय ते आपण सगळेच बघतोय. मला राजकारणातलं काही कळत नाही पण या सगळ्यामागे जे मूळ कारण आहे ते म्हणजे “संवादाचा” अभाव. ट्विटर / फेसबुक असूनही संवाद काही झाला नाहीये. आपलं तरी रोजच्या जीवनात काय झालंय? हल्ली माझ्या असं लक्षात आलंय कि कोणीही कोणाशीही बोलायला गेलं कि बोलणंच खुंटत कारण पहिल्या एक -दोन वाक्यानंतर प्रतिसाद असतो ” हो.. माहितीये मला.. ” आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असो , पालक – बालक असो, आजी-आजोबा – नातवंड असो. मित्र असोत. गुरु -शिष्य असोत, तज्ञ-जाणकार आणि शिकाऊ असोत. पण हाच अनुभव.

परवा घरी आलो आणि बायकोला सांगायला लागलो कि चांदणी चौकात ट्रॅफिक जाम जॅम होता..पुढे सांगणार होतो कि कसे हाल झाले…. त्यात आज नेमका ऑफिसला कसा उशीर झाला.. ती ऐनवेळची मिटींग … साहेबांनी केलेलं कौतुक ..प्रमोशन चा चान्स .. वगैरे,वगैरे पण माझं वाक्य कट करून ती म्हणाली “कि हो माहितीये मला..” , मला व्हाट्स ऍप वर व्हिडिओ आलाय..हा बघ .” माझी पुढे बोलायची इच्छाच नाही झाली.

IPL बघत होतो. मुलगा खाली खेळून आला. आल्या -आल्या त्याला आनंदाची बातमी सांगितली कि कोहोली आउट झाला (तो मुंबई फॅन आहे). तो म्हणाला “हो.. माहितीये मला.. . त्यावरचे इन्स्टा वर मिम्स पण आले आहेत कि तो अनुष्काच्या पदरा मागे लपलाय वगैरे.” तो कसा आउट झाला, त्याचा कोणी कॅच कसा अफलातून घेतला, नवीन बॉलरचा गुगली कसला भारी होता वगैरे सांगायचं राहून गेलं.

मुलगी शिकायला अमेरिकेला जायची होती. तिला म्हंटलं चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो..तो तिथे ४ वर्षे होता. तो तुला सांगेल तिकडे कसं असतं. ती म्हणाली बाबा “हो.. सगळं माहितीये मला.” …मुलगी अमेरिकेला जायच्या आधी मित्राकडे जायच्या निमित्ताने तिच्याबरोबर तास दोन तास घालवायचे ठरवले होते. जरा तिकडच्या कल्चर बद्दल तिच्याशी बोलू ठरवलं होतं ते राहून गेलं.

बाबांना ऐकू कमी येतं. म्हणून परवा म्हंटल त्यांना “मन कि बात” मधे मोदी काय बोलले ते सांगावं . जरा त्यांच्या बरोबर वेळ घालवता येईल. मी सुरवात केली तर तेच म्हणाले “हो.. माहितीये मला..” .. त्यांच्या जेष्ठांच्या ग्रुप वर आल्रेडी भाषण टाईप करून आलं होतं.

बऱ्याच दिवसांनी ४ दिवसासाठी माहेरी गेले होते. आईशी खूप गप्पा मारायच्या होत्या. आईला म्हंटलं “आमच्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलंय”. आई म्हणाली “हो.. माहितीये मला.. त्यांच्या ट्रक आला तेव्हाच तू फोन करून सांगितलं होतंस कि बहुदा तुमच्या शेजारचेच आले असावेत. मग आर्ध्यातासाने फोन करून तूच नाही का सांगितलंस कि कुलकर्णी म्हणून नगरचे आहेत. स्टेट बँकेत आहेत. दोन मुलं आहेत म्हणून. इ. इ . इ. ” चार दिवसांसाठी गेलेली मी दोन दिवसांनीच परत आले.

परवा नातू धावत धावत आजी कडे गेला. आजी -आजी रिझल्ट लागला. पण पहिल्या वाक्यानंतर आजीचं म्हणाली “हो.. माहितीये मला.. आईने व्हाट्स ऍप केला होता.. गणितात ९४, शास्त्रात ९० … वगैरे वगैरे. नातवाला काय काय सांगायचं होतं, मी कितवा आलो, मित्रांपेक्षा कसे छान मार्क्स पडले, टीचर्स कशा गुड म्हणाल्या , पण त्याच्या फ्लोच एकदम कट झाला आणि नातू मोबाईल खेळायला पळाला.

मला माझं बालपण आठवलं. चौथीत असताना इतिहासात शिवाजी महाराज आले. मी रोज शाळेतून आल्या आल्या इतिहासाच्या तासाला काय झाले ते आजी-आजोबांना , मग संध्याकाळी आई-बाबांना सांगायचो. मला आठवतंय कि मी एक दिवस आल्या आल्या आजीला सांगितलं कि शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोटे छाटली.

आजीने विचारलं “हो का ? का छाटली पण”

मग मी का ,कसं ,कुठे सांगितलं… आजी प्रश्न विचारत राहिली आणि आम्ही थेट स्वराज्याची शप्पथ पर्यंत पोहोचलो. आता हसू येतं कि आजीला काय हे माहित नसेल? पण ती इतक्या निरागसपणे विचारात राहिली कि त्यावेळी मला वाटत होत मी आजीच्या ज्ञानात भर घालतोय.

शेवटी आजोबांनी एक प्रश्न विचारला “का रे पण उजव्या हाताची छाटली का डाव्या ?”

पुढे २ वर्षे मी याचा शोध घेत होतो. त्यादरम्यानच मग बाबांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल सांगितलं. मग मी त्यांच्या पत्ता शोधून हा प्रश्न पोस्टाने त्यांना विचारल्याचं पण आठवतंय. त्यावेळी माहित नव्हतं यालाच ध्यास म्हणतात.

२ आठवडयांनी आजीनी विचारलं “मग शिवाजी महाराजांनी पुढची कुठली मोहीम हाती घेतली?”

“अंग इतिहासाचा तासच झाला नाही ..भूगोल शिकवला”

“काय शिकवलं भूगोलात” – आजोबा

“गोदावरी नदी बद्दल”

“हा ते भाक्रानांगल धरण धरण बांधलंय ना पैठणजवळ”

“आजोबा तुम्हाला काहीच माहित नाही…ते जायकवाडी धरण” पहिलं मातीच धरण , मग गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात .. गंगा , यमुना , सिंधू ..सिंधूच्या पार अटकेपर्यंत मराठे कसे गेले..पेशवे .. राजाराम महाराज , संभाजी महाराज ते परत शिवाजी महाराज … आता गंमत वाटते कि आम्ही कुठूनही कुठेही पोहोचायचो.”

“छोटू बाबा ..आम्ही तुझ्या एवढे होते तेव्हा हे धरणच नव्हतं त्यामुळे माहित नाही मला”….. आजोबा

आता माझ्या आजोबांना काय हे माहित नसेल पण आव तर असा आणायचे आणि माझ्याकडून माहिती काढून घ्यायचे..पाहायचे मला किती माहित आहे. नंतर आई -बाबांना सांगत असावेत कारण काही दिवसांनी आमची एक दिवसाची ट्रिप भाटघर धरणावर झाली. आईचा एक चुलत भाऊ तिथे इंजिनिअर होता. मग त्याने धरण , पाणी कसं मोजतात, कॅचमेंट एरिया , धरणाची दारं , वीज कशी बनते , धरणाचं अर्थशास्त्र असं काय काय सांगितलं. कदाचित पुढे मागे नुसतं वाचून माहिती झालं असतही पण कळलं कधीच नसतं. ते धरणावर कळलं. माझा आवाका वाढला हे निश्चित.

आता असं वाटतं कि आजी -आजोबा जर म्हणाले असते कि “हो.. माहितीये मला..” तर कदाचित हे सगळं कळलंच नसतं किंवा कधी तरी मी नुसतं वाचलं असत पण अनुभवलं नसतं. आजी-आजोबांना शिवाजी समजून सांगताना माझ्यात तो चढायचा असं आजोबा म्हणायचे. ते सगळं आता आठवतंय. खरंच ते म्हणले नाहीत “हो.. माहितीये मला..” आणि मी समृद्ध होत गेलो.

माणूस हा मुळात संवादशील प्राणी आहे. संवाद हि त्याची गरज आहे. बऱ्याचवेळा त्याला त्याचा अनुभव शेअर करून दुसऱ्याच्या जाणिवेत व्हॅल्यू ऍड करायची असते. दुसऱ्याला सांगताना आपला अनुभव पडताळून पहायचा असतो. तो बोलतो तेव्हा माहिती सांगतो पण भावना शेअर करतो. पण “हो.. माहितीये मला..” या वाक्याने त्याच्या उत्साहाच्या धबधब्याच्या रूपांतर झऱ्यात होत आणि मग तो आटूनच जातो. आणि मग भावनांचा दुष्काळ वगैरे निर्माण होतो. मग चिडचिड. त्यापासून दूर राहण्यासाठी परत डिव्हाईस ला जवळ करायचं.. मग आहेतच लाईक्स, मिम्स , इन्स्टा स्टोरीज .त्यातून कळलेली अर्धवट माहिती (हे अर्धवट माहिती प्रकरण फार डेंजर आहे ..अफवा, दुस्वास , असहिष्णुता येथेच जन्म घेतात) आणि मग परत “हो.. माहितीये मला..”

एका विचित्र चक्रात आडकतोय आपण. चक्र कसलं ..समाज स्वास्थ्य बिघवडणारा चक्रव्यूव्हच तो. ठेवायचं का आपण “हो.. माहितीये मला..” ला जरा दूर. समोरचा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकण्या एवढा वेळ काढू ना आपण. “हो.. माहितीये मला..” ऐवजी “हो का..माहित नव्हतं ..मग पुढे काय झालं” असं म्हणून पाहू ना काही दिवस. नक्की फरक पडेल. मला खात्री आहे. (प्लीज यावर हो.. माहितीये मला..म्हणू नका).

जरूर करून बघा. शेअर करून बघा.

योगिया