c&p
एका जागेवर शांतपणो तासन्तास बसून राहिलेलं मूल कोणी पाहिलंय का? मुलं सतत चालत असतात, पळत असतात. दंगा करत असतात. उद्योग-उपद्व्याप करत असतात. अखंड बडबड करतात. कितीतरी मोठय़ा माणसांना या दंग्याचा फार त्रस होत असतो. ऑफिसमधून थकून घरी आलेल्या आईबाबांना हा उत्साहसुद्धा कधीकधी पेलवत नाही. आजी-आजोबांना तर हा प्रकार पेलवतच नाही. घरात दोन मुलं असली की या उद्योग आणि दंग्याच्या जोडीला भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी आणि दुप्पट दंगा चालतो. त्यामुळे घरची माणसं फारच जिकिरीला येतात. एकदा का मुलं झोपली की घर कसं शांत शांत होतं. वादळ उठेर्पयत सगळे लोक आपापली कामं करून घेतात. विश्रंती घेतात. कधी एकदा ही मुलं मोठी होतात, असं घरातल्यांना होतं. 

मुलं एवढी चळवळी का असतात?
मूल कुठेही असलं तरी शांत बसत नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण शास्रीय आहे. वयाच्या आठ वर्षार्पयत मुलांच्या मेंदूत एक महत्त्वाची घडामोड होत असते. ही घडामोड त्यांना आयुष्यभर पुरणारी असते. मेंदूच्या डाव्या आणि  उजव्या गोलार्धाना जोडणारा ‘कॉर्पस कलोझम’ नावाचा अवयव असतो. तो अवयव अजून विकसित झालेला नसतो. त्याची वाढ होत असते. वयाच्या साधारणपणो आठव्या वर्षाच्या आतबाहेर ही वाढ ब-यापैकी पूर्ण होते. त्यानंतर मुलांच्या शरीराला हळूहळू स्थिरता यायला लागते. दहा वर्षाच्या आसपास मुलं क्रमाक्रमानं स्थिर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी या वयात शारीरिक दंगा, भरपूर हालचाल केलीच पाहिजे. कारण तसं झालं नाही तर हा अवयव योग्य प्रकारे विकसित होणार नाही. तो विकसित झाला नाही तर पन्नाशी-साठीनंतर त्यांना शरीराचा समतोल साधून चालणं अवघड जाईल. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निरीक्षण. एवढा दंगा चाललेला असला तरी त्यातही मुलं वस्तू, व्यक्ती, एखादा प्रसंग, खेळ, खेळणी,  एखादी प्रक्रिया, लोकांचं बोलणं याचं संपूर्ण निरीक्षण करत असतात. हा तर संपूर्ण शिक्षणाचा पायाच. दुपटय़ातून बाहेर पडून ज्या क्षणी मूल हालचाल करायला लागतं त्याच क्षणापासून ते सतत, प्रत्येक क्षणी काहीना काही शिकत असतं. आपण म्हणजे मोठय़ांनी न सांगता- सवरता त्याचा मेंदू त्याला आज्ञा देत असतो. त्या आज्ञेनुसार तो कामाची यादी पार पाडत असतो. त्याला आपली मदत होवो किंवा न होवो तो ज्ञान मिळवत राहातो. या काळात तो खरा ज्ञानार्थी असतो. पहिल्या काही वर्षात मुलांच्या शिकण्याचा वेग प्रचंड असतो. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पाच ज्ञानेंद्रियं अतिशय महत्त्वाची असतात. या ज्ञानेंद्रियांमधून  अनेक प्रकारची माहिती सतत मेंदूकडे पोहोचत असते. या पाचही ज्ञानेंद्रियांतून मूल नित्यनवे अनुभव घेत असतं. हे मूल एखाद्या शहरातलं असो, गावातलं. कोणत्याही आर्थिक स्तरातलं असो- मुलांना या वयात निरीक्षण करायचंच असतं आणि नवीन काहीतरी शिकायचंच असतं. 

मुलांच्या मेंदूची जडणघडण होण्यासाठी

◆ छानसं, आल्हाददायक संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत, मंद संगीत ऐकवावं. आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. साधेसुधे नैसर्गिक आवाज त्याच्या कानावर पडायला हवेत.

◆ इतर भाषेतली गाणी, इतर भाषेतले शब्द ऐकवावेत. इतर भाषा बोलणारे शेजारी, नातेवाईक असतील तर त्यांना मुलांशी त्यांच्या भाषेतच बोलायला सांगावे. 

 ◆ मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या  भाषाविकासासाठी ते चांगलंच. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात. 

 ◆ मुलांना गोष्टी सांगाव्यात; पण मोबाइल/टॅब/ कॉम्प्युटरवर दाखवू नयेत. स्क्रीन मुळीच दाखवू नये.

◆ कौतुकाचा स्पर्श करणं, सतत बोलणं, गाणी म्हणणं- ऐकवणं, हे आपण अवश्य करावंच. त्यातही विविध भाषेतली गाणी ऐकवली तर जास्त चांगलं. 

◆ पावसाचे थेंब अनुभवणं, फूल- माती- दगड- मांजरासारखे प्राणी असे विविध स्पर्श देणं.

◆ जमतील तेवढे रंग, भरपूर आकार दाखवणं.

◆ मुलांना टेकडीवर, नदी- समुद्रावर,  घराच्या खिडकीत, गच्चीत नेऊन खाली-वर, डावीकडे- उजवीकडे त्यांची नजर जाईल असं करायला पाहिजे. मुला- मुलींची नजर लांबच्या वस्तूंवर जायला लागली की, समोरची टेकडी, ढग, उडणारे पक्षी, झाडावर विसावलेले पक्षी, झाडांवरची फुलं, हलणारी पानं अशा अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेणं. 

◆ दिवसा आणि रात्रीच्या वेळा दाखवल्या पाहिजेत.

◆ पहिल्या काही वर्षात मूल असं चैतन्यानं रसरसलेलं असतं. चळवळ, दंगा, हालचाली करणं ही त्यांच्यातली शारीरिक प्रेरणा असते. त्यांना थांबवण्यापेक्षा, त्रागा करण्यापेक्षा किंवा चिडचिड करून धपाटे घालण्याऐवजी मुलं असं का करतात, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ त्रस होणार आहे ही मनाची तयारी ठेवणंही आवश्यक आहे. तीव्र कुतूहल हीच प्रेरणा या वयातल्या मुलांच्या एकूण वर्तनामागे असते. कितीही झोप आली, दमलं तरी झोपण्याची तयारी नसते. कारण हेच. झोपण्यातला वेळ वाया कसा घालवायचा?