आषाढी एकादशी साठी काही उपवासाच्या कृती
उपवासाची सोलकढी

साहित्य :- खवलेला अर्धा खवलेला नारळ, कोकम आगळ, जिरेपूड, आले, हिरवी मिरची–याची बारीक चटणी.
कृती :- चटणी एक कप कोमट पाण्यात मिक्स करून कुस्करून घ्या / ब्लेंडर मध्ये घुसळून घ्या आणि गाळून घ्या. उरलेली चटणीचा चव परत एक कप कोमट पाण्यात मिक्स करून कुस्करून किवा ब्लेंड करून नंतर गाळून घ्या –या गाळलेल्या सोल कढी वर तूप जिरे फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा.

उपवासाचे थालिपीठ
साहित्य : एक वाटी राजगिरा, एक वाटी साबुदाणा, एक वाटी वरीचे तांदूळ, 2-3 मिरच्यांची पेस्ट किंवा लाल तिखट, 3 उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, मीठ, रिफाइंड तेल किंवा तूप.
कृती : राजगिरा, साबुदाणा, वरीचे तांदूळ मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. हे गार करून मिक्स रमध्ये बारीक करावे. ही थालिपिठाची भाजणी तयार झाली. या भाजणीत उकडलेले बटाटे मिसळून घ्यावेत. त्यात दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, तिखट किंवा मिरची पेस्ट घालावी. पाण्याचा वापर करून पीठ भिजवावे व त्याची छोटी छोटी थालिपिठे बनवून घ्यावीत. तव्यावर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप सोडून खमंग भाजावेत

जिरा आलू
साहित्य : पाव किलो उकडलेले बटाटे, एक चमचा जिरे, एक चमचा साजूक तूप, 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, खवलेले खोबरे, दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : बटाटे सोलून त्याचे मध्यम आकारात चौकोनी तुकडे कापावेत. साजूक तूप गरम करून त्यात जिरे तडतडू द्यावे. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतवून घ्यावेत. बट्याट्याच्या फोडींना मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर मिक्स करून लावावे. हे मिश्रण फोडणीत घालून मंद आचेवर परतावे. सर्व्ह करताना खवलेले खोबरे घालावे
बटाटे कचोरी
पारीसाठी साहित्य : पाव किलो उकडलेले बटाटे, दोन चमचे साबुदाण्याचे पीठ, मीठ.
सारणाचे साहित्य : एक वाटी खवलेले खोबरे, मीठ, साखर, एक चमचा लिंबाचा रस, काजू तुकडे व बेदाणे, चिरलेली कोथिंबीर (ऐच्छिक), रिफाइंड तेल.
कृती : बटाटे किसून नीट मळून मऊसर गोळा तयार करून घ्यावा. त्यात मीठ व साबुदाण्याचे पीठ मिसळून पुन्हा मळून घ्यावे. सारणासाठी खोबऱ्यात मीठ, साखर, लिंबाचा रस, काजूचे तुकडे व बेदाणे मिसळून घ्यावेत. बटाट्याचे मध्यमसर गोळे करावेत. तळहाताला तेल लावून या गोळ्यांच्या वाट्या बनवाव्यात. त्यात सारण भरून वाट्या बंद करून गोल बॉल्स तयार करावेत. तेल गरम करून त्यात मंद आचेवर हे बॉल्स (कचोरी) तांबूस रंगावर तळून घ्यावेत
दाण्याची आमटी
साहित्य : अर्धी वाटी दाण्याचे कूट, एक वाटी पाणी किंवा ताक, एक चमचा खवलेले खोबरे, अर्धा चमचा जिरे, २-३ हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दोन चमचे साजूक तूप, एक चमचा जिरे, 2-3 आमसुले, कोथिंबीर (ऐच्छिक).
कृती : दाण्याचे कूट, पाणी, खोबरे, जिरे, हिरव्या मिरच्या, मीठ एकत्र करून मिक्सतरमधून एकजीव करावे. हे मिश्रण उकळत ठेवावे. छोट्या कढईत साजूक तूप गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करावी. ती वरील मिश्रणात वरून घालावी. मग त्यात आमसूल, साखर घालून उकळून घट्टसर आमटी बनवावी
काकडीचे थालिपीठ
साहित्य : एक वाटी काकडी किसून, अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, एक उकडलेला बटाटा किसून, एक वाटी उपवासाची भाजणी, दोन मिरच्यांची पेस्ट, मीठ, साखर, कोथिंबीर (ऐच्छिक), रिफाइंड तेल.
कृती : किसलेली काकडी, बटाटा, उपवासाची भाजणी, साबुदाणा हे सर्व एकत्र करून नीट मळून घ्यावे. त्यात दाण्याचे कूट, मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून पीठ नीट मळून एकजीव करावे. लागल्यास पाणी घालावे. छोटी छोटी थालिपीठे थापून तव्यावर दोन्ही बाजूनी तेल सोडून झाकण ठेवून खमंग भाजावीत.
लाह्यांचे चविष्ट पीठ
साहित्य : एक वाटी लाह्यांचे किंवा राजगिऱ्याचे पीठ, दीड वाटी गोड ताक, एका मिरचीची पेस्ट, मीठ, साखर, पाव वाटी दाण्याचे कूट, अर्धा चमचा जिरेपूड, कोथिंबीर (ऐच्छिक).
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून नीट कालवून घ्यावे. सर्व्ह करताना तुपाची जिऱ्याची फोडणी घालावी व कोथिंबीर पसरावी
साबुदाणा लिची पुडिंग
साहित्य : अर्धी वाटी साबुदाणा, अर्धा कप साखर, एक लिटर घट्ट दूध, 5-6 लिची बिया काढून, दोन चमचे बदामाचे काप (भाजून), अर्धा चमचा वेलचीपूड.
कृती : साबुदाणा धुऊन भिजवत ठेवावा. लिची साखरेत शिजवून घ्यावी व गार करावी. दूध आटवत ठेवावे. त्यातच साबुदाणा घालून घट्ट खीर बनवावी व गार करावी. आता त्यात लिची घालावी व वेलचीपूडही घालावी. हे मिश्रण बाऊलमध्ये सेट करायला ठेवावे. वरून भाजलेले बदामाचे काप घालून सजवावे
फिंगर चिप्स भाजी
साहित्य : ५-६ बटाटे फिंगर चिप्सप्रमाणे कापून, तेल, ५-६ मिरे, …