कडक उन्हाळ्याच्या शेवटी आमच्या घराच्या, व्हिडियो डोअर फोनच्या वरती, एका बुलबुलने, नेटाने आजूबाजूच्या काड्या, जुने कापडाचे तुकडे वगैरे गोळा करून एक टुमदार घरटे बनवले होते. एकीकडॆ बेभान वारा, मधूनच येणारा मृदुगंध असे पावसाची चाहूल देणारे, मुग्ध करणारे वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे एक दिवस अचानक त्या टुमदार घरट्यातून पिल्लांचा किलकिलाट ऐकू लागला.
न राहवून, मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने घरट्यात डोकावून बघितले आणि अहाहा, नुकतीच जन्माला आलेली दोन सुंदर पिल्ले दिसली! पिल्लू कुणाचेही असो, दिसते मात्र गोडच!
जवळपास मिस्टर आणि मिसेस बुलबुल यांची पिल्लांना भरवणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांचं हवं नको ते बघणे अशी लगबग सुरु होती.
साधारण दोन आठवड्याने मी दरवाजातून बाहेर पडताना सवयीने त्या घरट्याकडे बघितले आणि मला एकदम शांतता जाणवली. म्हणून पुन्हा एकदा घरट्यात डोकावून बघितले तर पिल्ले चक्क उडून गेली होती. मिस्टर आणि मिसेस बुलबुल पिल्लं जन्म देऊन केवळ दोन ते तीन आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले होते!
ते बघितल्यावर माझ्या डोक्यात काही विचार घोळू लागले. बुलबुलचे पालकत्व म्हणजे साधारण घरटे बांधणे, अंडी घालणे, ती उबवणे आणि काही दिवस पिल्लं सक्षम होईपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे, एवढे मर्यादित होते. त्यासाठी त्याला आणि तिला वर्षातून केवळ दोन महिने द्यायचे होते.
पिल्लांच्या संगोपनाचा असाच काळ, जर आपण चिमण्या, कावळे, गाई, हरणं, वाघ आणि हत्तींचा बघितला, तर तो वेगवेगळा असल्याचेमाझ्या लक्षात आले. मला असेही जाणवले की जे प्राणी एकटे किंवा जोडीने राहतात त्यांना निसर्गाने पालकत्वाची कमीत कमी जबाबदारी दिली आहे. त्यांची पिल्ले तुलनेने लवकर सक्षम होतात.
मात्र कळपात राहणारे, सामाजिक जीवन जगणारे जे प्राणी आहेत त्यांच्यात मात्र कळपाच्या संख्येप्रमाणे पिल्लांच्या संगोपनाचा कालावधी हा वाढत जातो. आपण माणसं देखील निसर्गतः: कळपात राहणारे, सामाजिक प्राणी आहोत. त्यामुळे आपल्या पिल्लांचा सक्षम होण्याचा कालावधी देखील थोडा किंबहुना बराच जास्त आहे.
मात्र निसर्गात जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर कळपात असलेल्या पण अजून सक्षम न झालेल्या पिल्लांची जबाबदारी कळप कधीच एकट्या आईवर, किंवा दुकट्या आई वडिलांवर टाकून मोकळा होत नाही. त्या पिल्लांची जबादारी संपूर्ण कळप घेतो. त्याचबरोबर पिल्ले सक्षम झाली की कळप त्या पिल्लांच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही, त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.
जोपर्यत आपण “उत्तम आयुष्य” जगण्याच्या नावाखाली एकामागे एक “अनैसर्गिक व्यवस्था” उभ्या करण्याच्या मागे लागलो नव्हतो, तोपर्यंत माणसांच्या कळपाचे जगणे पण असेच होते. मात्र हळहळू या अनैर्सगिक सामाजिक व्यवस्थांचा माणसाच्या जीवनावर अत्यंत वेगाने भलाबुरा परिणाम होऊ लागला.
हा परिणाम म्हणून, आज बहुतेक कुटुंबे छोटी होत चालली आहेत, त्रिकोणी होत आहेत. आई वडील दोघेही नोकरी करत आहेत. घरांची दारे बंद राहत आहेत, मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्तीत जास्त वेळ चार भिंतीच्या आत कोंबली जात आहेत.
माणसाच्या पिल्लांचे हे जग अनुभवण्यासाठी, त्यांनी वापरायच्या साधनांचे, पद्धतींचे, वेळेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन, मोठी माणसे स्वतःची साधने, पद्धती, वेळापत्रक आणि जगाविषयीचे आकलन मुलांवर नकळतपणे लादत आहेत.
गंमत म्हणजे या सगळ्या परिस्थितीत, आपल्या पिल्लांचा आई, वडिलांवर, कळपावर अवलंबून राहण्याचा कालावधी मात्र कुठेच कमी झालेला नाही उलटा तो वाढतच चालला आहे आणि इथेच सगळी गोची झाली आहे.
मुलांची जबाबदारी ज्यांनी घायची ती माणसे स्वतःच्याच जबाबदारीत जास्तीत जास्त गुंतत चालली आहेत मुलांच्या आजूबाजूला मुलांवर “निरपेक्ष” प्रेम करणाऱ्या, निरपेक्षपणे एकत्र येऊन मायेची उब देणाऱ्या कळपातील माणसांची संख्या वेगाने कमी होत आहे. माणसांच्या कळपाने आता कळपातील पिल्लांची जबाबदारी घेण्याचा सुद्धा व्यवसाय करून टाकला आहे!
ज्या वयात फक्त उबदार स्पर्श हवा आहे, ऐकणारे कान हवे आहेत, गाणी गोष्टी सांगणारी माणसे हवी आहेत, त्या वयात “तासावर पैसे” घेणारी माणसे मुलांना जास्तीत जास्त वेळ “शांत” बसवून एक “भावनिकदृष्ट्या कुपोषित” पिढी घडवत आहेत!
यात पालकांचा दोष आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. पालकांवर देखील विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रचंड जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र पालकांनी अशा परिस्थितीत स्वतःला “आयसोलेट” करणे, समाजापासून फटकून राहणे तडतोब कमी करण्याची गरज आहे.
आपल्याला आता जुनी वाडा संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती परत आणणे तर शक्य नाही. मात्र आपण एकत्र येऊन आपल्या मुलांना शक्य तितकी भावनिक सुरक्षितता, निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या माणसांचा सहवास, आजूबाजूचे चांगले जग, त्या जगात उद्दात्त आणि उमेदीने काम करणारी माणसाने, संस्था दाखवून मुलांच्या जगण्याचा उत्साह तर वाढवू शकतोच की!
अशा प्रकारच्या घुसळणीतून मुलांना या जगातील जे वैविध्य अनुभवता येईल त्यातून आपल्या पिल्लांना हळूहळू जगण्याचा अर्थ समजू लागेल. हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्याला पालकांचे छोटे छोटे “सामूहिक पालकत्व” या संकल्पनेवर काम करणारे गट हवेत.
आपली पिल्लं कधीतरी त्या बुलबुलाच्या पिल्लांसारखी उंच भरारी घेत उडून जाणारच आहेत पण ती उडून जाण्याआधी, पालकांचे हे गट या पिल्लांना जे अनुभव देणार आहेत, तेच अनुभव पुढील काळात वृद्धाश्रमांची संख्या कमी करणार आहेत, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही..
चेतन एरंडे.
View insights
291 post reach
Like
Comment
Send
Share