ओव्याची भजी/पराठे
🫐🍒🥦🍇🍇🍎🍎🥬
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
भजी – ओव्याची पाने, डाळीचे पीठ, मीठ, हळद, तिखट, चिमूटभर सोडा, पीठ भिजवायला पाणी, तळण्यासाठी तेल
पराठे – कणिक, डाळीचे पीठ, तांदुळाची पिठी, तेल, हळद, तिखट, मीठ, तीळ

क्रमवार पाककृती:
गोळवलकरकाकूंकडे गेले होते. डवरलेला हिरवागार बगीचा! रमाशी गप्पा मारत बसले होते. ‘जाताना ओव्याची पानं घेऊन जाशील गं भजी करायला’ काकूंचा प्रेमळ आदेश. पाने तर खुडली पण भजी कशी करायची हे कुठे माहित होते अर्थात काकुंनाच पाकृ विचारली. अगदी सोप्पी कृती. घरी येऊन लगेच करायची ठरवलं. वरूणराजालाही मनापासून साथ द्यावीशी वटली म्हणूनच की काय सतत दोन दिवस पडूनही त्याला विश्रांती घ्यावाशी वाटली नाही. मनात ठरवल्याप्रमाणे घरी येऊन लगेच केली. घरच्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याऐवजी भजी घातली. असो! भजी अप्रतिम लागतात.

कृतीः नेहमीप्रमाणे डाळीच्या पीठात पाने घोळवून भजी तळून गरमागरम सॉस बरोबर खावी
उरलेली पाने व मिरच्या वाटून पीठांमध्ये मिसळून पालकपराठ्याप्रमाणे पराठे तीळावर लाटून शेकावे. वेगळ्या पण छान चवीचे पराठे!