पपईचे धपाटे

🍒🍑🍐🥬🍏🍏
प्रत्येश लागणारा वेळ

३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठया वाट्या
पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ
२ चमचे डाळीचे पीठ
१ चमचा ओव्याची पूड
२-३ चमचे तीळ
१-२ चमचे धने जीरे पूड
हव्या त्या प्रमाणात तिखट
मीठ
हळद
आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर

क्रमवार पाककृती:
पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमधे रस करून घ्या.
ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही.
भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या.
भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीनं टाका.
दोन्ही बाजूनं तेलाचा हात लावून भाजून घ्या.
खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दूध, दही-दूध घ्या. मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी, जवसाची चटणी वगैरे बरोबर मस्त लागतो.

 

वाढणी/प्रमाण:
५ ते ६ मोठे धपाटे होतील.
अधिक टिपा:
भाजताना पाणी लावायचे नाही. तसेच थेट आचेवर न भाजता तव्यावरच भाजायचे.
धपाटे २-३ दिवस (भारतातल्या हवामानात) सहज टिकतात. इथे ४ दिवस तरी टिकायला हरकत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरीकांसाठी प्रवासाला जाताना खाण्याच्या पदार्थांसाठी उत्तम पर्याय आहे. लाल भोपळा घालूनही सुरेख होतात. पपई, भोपळा नसेल तर नुसता कच्चा मसाला, भरपूर तीळ, ओवा घालूनही छान होतात.