॥ एक से भले दो ॥
पालक म्हणून घडताना
– डॉ. मेधा फणसळकर, माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
“मुले म्हणजे देवाघरची फुले”, “मुले म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी घडतात” असं बरंच काय काय वाचल्यामुळे पालकाच्या भूमिकेत शिरले तेव्हा अनेक स्वप्नं डोळ्यापुढे रंगवत होते. मिळतील तेवढी पालकत्वावरची पुस्तकं, व्याख्यानं यांचा फडशा पाडला होता. या सगळ्याचे खुमखुमीत आपले प्रयोग आपल्याच मुलांवर करायचं फक्त बाकी होतं.
आमच्या बाबतीत तर जुळी मुले!त्यातही एक मुलगा व मुलगी! दिसण्यापासून स्वभावापर्यंत त्यांचे सगळेच गुणधर्म वेगळे होते. जन्मल्यानंतर काही महिने केतकी रात्री जागणार आणि कैवल्य दिवसा जागणार! कैवल्य थोडा नाजूक, त्यामुळे स्तनपान करण्यापेक्षा बाटलीने दूध पिणे त्याला सोपे वाटत असे. याउलट केतकीला बाटलीचे दूध आवडत नसे. दुपट्यात पूर्ण गुंडाळून ठेवल्यावर त्याला सुरक्षित वाटत असे व तो शांत झोपत असे. तर तिला दुपट्यात गुंडाळले की ती अस्वस्थ होत असे आणि हात- पाय आदळून त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत असे. आता मोठे झाल्यावरही त्याला सर्व गोड पदार्थ आवडतात, तर तिला झणझणीत तिखट आवडते. तो अजूनही अतिशय हळवा आहे व ती मात्र व्यवहारी आहे. त्यामुळे आता वयाच्या 24 व्या वर्षी बऱ्याचदा त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आमच्यापेक्षा तीच चांगल्या पध्दतीने करते. अशाप्रकारे आम्हाला एकाच वेळी दोन दोन आघाड्या सांभाळाव्या लागत असल्यामुळे दोघांवर वेगवेगळे प्रयोगही करायला मिळत.
शाळेतून आल्यावर दप्तर एका बाजूला कसेबसे टाकणे, भराभरा हातपाय धुवून कपडे बदलणे आणि चहा व खाऊ खाऊन खेळायला पळणे ही केतकीची नेहमीची सवय! त्यामुळे शाळेतून आल्यावर 15 व्या मिनिटाला ती बाहेर पडे. पण या सर्व गडबडीत दप्तरातून डबा काढून घासायला टाकणे ती नेहमी विसरत असे. यावरुन आमची रोज वादावादी होत असे. शेवटी तिला तंबी दिली की “आजपासून मी तुला आठवण करुन देणार नाही. पण ज्या दिवशी डबा घासलेला नसेल त्या दिवशी शाळेत डबा मिळणार नाही.” हे जेव्हा सांगितले त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे दप्तरातून डबा काढायला विसरली होती. पण रात्री जेव्हा अभ्यास करायला तिने दप्तर उघडले त्यावेळी तिच्या ते लक्षात आले आणि मग तिने तो माझ्या नकळत आणून गुपचूप घासून ठेवला. दुसऱ्या दिवशी माझ्या ते लक्षात आले, पण मी आपल्याला काही कळले आहे हे दाखवलेच नाही. त्यानंतर दोन- तीन दिवस डबा इमाने- इतबारे शाळेतून आल्या आल्या काढला गेला. मला अतिशय आनंद झाला. मनात म्हटले, “चला, माझ्या लेकीला एक चांगली सवय लावण्यात मी यशस्वी ठरले.” पण माझा हा आनंद दोन दिवसच टिकला. कारण दोन दिवसांनी पुन्हा तिचा पहिला क्रम सुरु झाला- विसरण्याचा!
पण तिने आता रोज रात्री डबा घासून ठेवण्याचा क्रम सुरु केला. यावर तिची प्रतिक्रिया होती, “तुला डबा घासलेला मिळाल्यास बास ना?” तिचे तर्कशास्त्र योग्य असल्यामुळे मी निरुत्तर झाले. शिवाय हाही विचार केला की त्या निमित्ताने तिला आपल्या वस्तू स्वच्छ करायची सवय लागते आहे. ‛हेही नसे थोडके!’ पण आजतागायत तिच्या वस्तू जागेवर ठेवण्याची सवय मी तिला लावू शकले नाही. याउलट मुलगा मात्र पहिल्यापासूनच व्यवस्थित! त्याच्या सर्व वस्तू कायम व्यवस्थित जागेवर ठेवलेल्या असतात. अगदी बारीक खोडरबरापासून लॅपटॉपच्या बॅगेपर्यंत सर्व वस्तू टापटीप असतात.
दुसरा एक अनुभव असाच! मला स्वतःला वाचनाची आत्यंतिक आवड असल्यामुळे मुलांनीही भरपूर वाचावं असे मला कायम वाटायचं. त्यांच्यापुढे सतत पुस्तके दिसली पाहिजेत असं ऐकलं होतं. म्हणून मग मी सतत नवनवीन पुस्तके, गोष्टींच्या सीडी याचा खजिना कायम त्यांच्यासमोर ठेवत असे. जोपर्यंत त्यांना वाचता येत नव्हते तोपर्यंत स्वतः पुस्तकातील चित्रे दाखवत गोष्टी सांगत असे. त्याचा परिणाम मात्र केतकीवर उत्तम झाला. तिला वाचनाची गोडी लागली. मोठी झाल्यावर एखादी कविता, लेखन ती उत्तम प्रकारे करु लागली. पुस्तक प्रदर्शन असले की ती मागे लागून मला घेऊन जायला लावायची. आता बऱ्याचदा नेटवर पुस्तके उपलब्ध होत असल्याने तिला हवी असणारी पुस्तके तिथेच वाचायला मिळतात. आम्हीही तिला कधीच कोणत्याही प्रकारच्या पुस्तक वाचनापासून अडवले नाही. कारण काही वेळा काही पुस्तके मुलांनी वाचण्यासारखी नाहीत म्हणून बाजूला ठेवली तर कुतुहलाने ती तीच वाचायचा प्रयत्न करतात आणि कदाचित जो परिणाम त्यांच्यावर होऊ नये असे आपल्याला अपेक्षित असेल तोच परिणाम बुमरँगसारखा आपल्यावर आदळू शकतो.
इथंही पुन्हा दोन वेगवेगळे अनुभव आले. जोपर्यंत मी गोष्टी वाचून दाखवत असे तोपर्यंत कैवल्य आनंदाने ऐकत असे. पण जेव्हा स्वतः वाचू लागला त्यावेळी मात्र वाचनाचा कंटाळा करु लागला. आजही तो तितक्या आवडीने पुस्तके वाचत नाही. पण किमान दररोजचे वर्तमानपत्र मात्र नियमित वाचतो.
त्यामुळे अशा पद्धतीने एखादा प्रयोग एकाच्या बाबतीत यशस्वी ठरला तर दुसऱ्याच्या बाबतीत सपशेल अयशस्वी ठरत असे. मग आम्हाला वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढाव्या लागत. म्हणूनच मुले जशी वाढत होती, मोठी होत होती तसे पालक म्हणून आम्हीही काहीतरी नवीन शिकत होतो.
कैवल्यला जन्माच्या वेळीच मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे तो चालू शकत नाही(cerebral palsy with spasticity). त्यामुळे त्याच्या उपचारांसाठी मला वारंवार पुणे- मुंबई फेऱ्या आणि मुक्काम करावा लागत असे. अशावेळी एकत्र कुटुंब असल्यामुळे मी केतकीला त्यांच्यावर, तिच्या बाबांवर सोपवून बिनधास्त राहू शकत असे. केतकीलाही त्यामुळे खूप लहान वयातच याची जाणीव झाली आणि नकळत ती समजूतदार बनत गेली. कैवल्यलाही आपल्या शारीरिक क्षमतेची जाणीव असल्यामुळे उत्तम शिक्षण हाच आपल्यासाठी पर्याय आहे हे उमगले आहे. त्यामुळे त्याचेही त्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहेत.
या सर्वामध्ये पालक म्हणून भूमिका बजावताना आमची थोडी तारेवरची कसरत होत असे. ज्या गोष्टी केतकीला मिळणे आवश्यक आहेत त्या तिला वयानुरूप, क्षमतेनुसार मिळतील याची व्यवस्था करणे; पण त्याचबरोबर आपल्याला कुठे तरी डावलले जात आहे ही भावना कैवल्यच्या मनात निर्माण न होणे. कारण शारीरिक मर्यादा असल्याने काही गोष्टींना त्याला मुकावे लागते. त्यामुळे एका अर्थी पालक म्हणूनसुद्धा आमचे ते एक प्रकारे प्रशिक्षणच आहे असे मला वाटते.
म्हणूनच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मूल हे वेगळे आहे आणि त्यांना घडवताना प्रत्येक आई- बाबांना आलेले अनुभवही वेगवेगळेच असणार. आमच्या घरी एकाच वेळी वाढणारी ही दोन मुले, त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करणारी आम्ही घरातील माणसे तीच! पण दोघांच्या बाबतीतले अनुभव मात्र पूर्णपणे वेगळे!

Read more