अगोदर…..
……………………………………………………………………………..
अगोदर शिकवा मुलांना सांजा, मैदा आणि पिठातला फरक ओळखायला.

शिकवा त्यांना मूग, मसूर, उडीद, हरभरा आणि तूर ओळखायला.

अगोदर शिकवा मुलांना लोणी, तूप, पनीर आणि चीज यांमधला फरक ओळखायला
आणि त्यांना तयार करायलाही.

सुंठ-आलं, द्राक्षे-बेदाणे, खजूर-खारीक यांच्यातला भेद शिकवा

.

अगोदर शिकवा त्यांना दालचिनी, कोकम, मोहरी, जीरा आणि बडीशेप ओळखायला.

दाखवा त्यांना आलं, बटाटं, हळद, कांदा आणि लसणाची रोपं.

शिकवा त्यांना मेथी, पालक, तांदूळसा, चुका-चाकवत, शेपू आणि हरभऱ्याच्या भाजीतला फरक ओळखायला.

अगोदर दाखवा मुलांना,
फळांनी लगडलेली झाडं,
फुलांनी डवरलेल्या बागा
आणि हुंगु द्या रानमेव्याच्या सुगंधाने चिंब झालेली रानं.

दाखवा त्यांना काय फरक असतो
गाय-बैल, म्हैस-रेडा, घोडा-गाढव आणि खेचरात.

अनुभवू द्या त्यांना गाय, म्हैस, मेंढी आणि शेळीची धार काढणं.

चिखला-मातीत लोळून हुंगू द्या त्यांना मातीचा अवीट गंध,
समरसून अनुभवू द्या-
झिम्मड पावसात भिजणं आणि
घामाच्या धारांत न्हाऊन निघणं.

अगोदर अनुभवू द्या त्यांना,
वडीलधाऱ्यांच्या सहवासात रमणं,
त्यांच्याशी गप्पा मारणं,
त्यांच्यासोबत खेळणं आणि
मर्यादांचं कोंदण जपत मस्ती करणं.

शिकवा त्यांना
वडीलधाऱ्यांशी नम्रतेनं वागायला
आणि
आई-बाबांना घरातील कामांत मदत करायला.

हे सर्व सोडून तुम्ही जर
त्या चिमुरड्यांना कोडिंग शिकवू पाहत असाल,
तर तुमची मुलं बनतील ATM,
समस्यांची…..

मुलांना एकदम मोठं करण्याची एवढी घाई का आहे?
कोडिंग पण शिकून घेतील.
आधी डिकोडिंग तर शिकू द्या,
आपल्या भवतालाचं!
नात्यांचं आणि माणूसपणाचं!

बहरत राहू द्या त्यांचं बालपण,
कोमेजू देऊ नका.
कधीही फिरून परत न येणाऱ्या
त्या अल्लड लहानपणाला
मरून जाऊ देऊ नका.
हात जोडून हेच एक मागणं!
…………………………………………………………………….
मूळ हिंदी कविता- डॉ. अतुल अग्रवाल, बालरोगतज्ञ.

मराठी स्वैर अनुवाद- फारूक एस. काझी, प्रयोगशील प्राथमिक शिक्षक