आपल्याला आपल्या मुलांचा राग का येतो?
प्रत्येकाची स्वतःची एक प्रतिमा असते. आपण स्वतःबद्दल जो विचार करतो ती आपली प्रतिमा बनते. आपण आपली प्रतिमा एकटेच नाही बनवत. अनेक बाहयघटक त्यासाठी कारणीभूत असतात. आपली प्रतिमा ही बऱ्याच अंशी आपल्या बालपणीच्या अनुभवांवर अवलंबून असते. आपल्या आईवडिलांची आपल्याविषयीची मतं, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारलेले टोमणे, मित्रमैत्रिणींची आपल्याविषयीची मतं, शाळेतील अनुभव; या आणि अशा अनेक घटकांनी प्रेरित होऊन आपण स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो. आपल्या मनाला आपण सांगतो की हा मी असा आहे किंवा ही मी अशी आहे.
मोठेपणी देखील आपण या प्रतिमेला घट्ट धरून असतो. आपली विचारसरणी देखील काही अंशी या प्रतिमेशी निगडीत असते. अशाच प्रकारे पालक म्हणजे काय आणि पालकाची मुलाच्या जीवनातील भूमिका काय असावी याबद्दल देखील आपण एक मत बनवलेले असते. ते देखील बऱ्याच अंशी आपल्या बालपणीच्या अनुभवांवर अवलंबून असते. आपल्याला आपल्या पालकांकडून जे मिळालेले असते किंवा नसते या घटकाचा आपल्या मनावर खूप खोल परिणाम झालेला असतो. त्यावरून आपण एका आदर्श पालकाचे चित्र रंगवतो. मुळात पालक म्हणजे ज्याचा आपल्या पाल्यावर पूर्ण अधिकार आहे अशी व्यक्ति असा आपला समज असतो. मुलांना काही कळत नाही आणि आईवडिलांना जास्त कळतं हा मुख्य मुद्दा असतो.
आपल्या मुलांनी कसं वागावं हे देखील आपणच ठरवत असतो. आदर्श पालक आणि आदर्श मूल ही दोन्ही चित्र आपण रंगवलेली असतात आणि आपण आपल्या मतावर ठाम असतो. आता जेव्हा मुलांची वागण्याची पद्धत आणि आपली आदर्श मुलाची चित्रं यामध्ये विसंगती निर्माण होते तेव्हा मात्र आपण हादरतो. मूल चुकतंय आणि आईवडिलांनी त्याला वेळीच योग्य मार्ग दाखवला पाहिजे, असं मेंदू सांगू लागतो. आपण लगेच तयारीला लागतो. मुलाच्या चुका शोधून त्याला एक नियमावली बनवून देतो. आता मुलाने ही नियमावली तंतोतंत पाळली तर त्याचे वागणे सुधारेल आणि तो योग्य मार्गी लागेल अशी आपण मनाची समजूत घालतो. समस्येचा तोडगा निघाला.
खरी मजा तर आता आहे. मूल ती नियमावली झुगारून देतं. आपण परत एकदा हादरतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आपले प्रयत्न फसले हे काही आपल्याला पचत नाही. यामुळे कुठेतरी आपल्या प्रतिमेला धक्का बसतो. मुलाची इच्छा आणि आपली आदर्शत्वाची मतं या दोन भिन्न गोष्टींचा मेळ घालून आपण उगाच त्रागा करून घेतो आणि मुलांवर ओरडतो. आपण आपल्या प्रतिमेला घट्ट धरून बसल्यामुळे वर्तमानातील आनंदाचे क्षण अनुभवू शकत नाही. साध्यासुध्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊन नसलेले प्रश्न निर्माण केले जातात.
आईवडिलांची भूमिका आणि आपली स्व-प्रतिमा या दोन गोष्टी जर आपण वेगळ्या ठेवल्या तर जीवनातले असे अनेक छोटे प्रसंग आपण सहजपणे हाताळू शकतो.
- पूनम हिंदूपूर – सत्तिगेरी