खेळणं

लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. खेळण्यांशी मुलं खूप आनंदाने खेळतात अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना विकत आणलेली खेळणी आवडतातच असं नाही, तर मोठी माणसं ज्या ज्या वस्तू हाताळतात, त्या वस्तूंशी ते जास्त काळ घालवतात. त्या सर्व वस्तू मुलांना हव्या असतात आणि हे नैसर्गिक आहे. अतिशय हौसेने आणलेल्या महागडय़ा खेळण्यांकडे अनेकदा मुलं ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्याऐवजी आई-बाबांच्या हातातला मोबाइल मुलांना जास्त हवाहवासा वाटतो.

मुलांच्या मेंदूचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू ही वस्तूच असते. ‘खास आपल्यासाठी तयार केलेलं खेळणं’ असं काही नसतं. एखादी वस्तू रंगीबेरंगी दिसते, वाजते, हलते, पुढे सरकते, झोके घेते, गाते, नाचते, म्हणून मुलं काही काळ त्याच्यामध्ये रमतात. परंतु त्यांच्या दृष्टीने घरातलं लाटणं, पोळपाट, चपला, मोबाइल, लॅपटॉप, गरगर फिरणारा पंखा आणि खेळण्यातल्या ससा-बाहुल्या हे सर्व सुरुवातीच्या काळात तरी सारखंच असतात. मुलांना चेंडू खेळायला विशेष आवडतो. कारण तो सतत हालचाल करत असतो.

वयाच्या याच टप्प्यावर मुलांच्या हातात अत्यंत घातक पद्धतीने मोबाइल दिला जातो. लहानगी मुलंही त्यात गुंततात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते त्यातली चित्रं हलती असतात. त्याला वेग असतो. ते रंगीत-संगीत असतं. मात्र मोबाइल हे मुलांचं खेळणं कोणत्याही परिस्थितीत असू शकत नाही.

मुलांच्या हातात खेळणी दिलीच नाहीत तरी ती नक्कीच स्वत:च्या डोक्याने काही तरी शोधून काढतात. प्रकाश नारायण संत यांच्या कथेत मुलांनी एका पडक्या घराच्या मोडलेल्या दरवाजाचं खेळणं म्हणून वापर केला होता आणि त्यांचे काही दिवस त्या दरवाजाशी विविध प्रकारे खेळण्यात गेले होते. त्यात स्वत:च्या कल्पना वापरून मजा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. लहान मुलं-मुली अशाच प्रकारे टाळ्यांचे भरपूर खेळ आणि त्यावरची असंबद्ध गाणी शोधून काढतात. स्वत:ला छान रमवतात. एकामागोमाग कितीही वेळ खेळू शकतात. कमीत कमी साधनांच्या साह्याने खेळले जाणारे टिक्करबिल्ला, डबा ऐसपस, विटीदांडू, लपाछपी, जोडसाखळी असे प्रकार अशा डोकेबाज मुलांनीच शोधून काढलेले आहेत.

🖋 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com