शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!” विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाही..मी मठ्ठ आहे.. इत्यादी.

असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही.

लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे.

तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’

वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने २४०० वर्षापूर्वी म्हणाले, “माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे.

लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक रुजू होतील तेव्हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने हुशार बनायला सुरुवात होतील.. त्यांना असं वाटणार नाही की मी विसरभोळे आहे.